वीज वापरली पसाभर, बिल आले सूपभर, काय म्हणतात वीजग्राहक 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 जुलै 2020

नागपूर परिमंडळातर्फे मंगळवारी घेण्यात आलेल्या वेबिनारमध्ये नागपूर व वर्धा जिल्ह्यातील 515 ग्राहकांनी सहभाग नोंदवित तक्रारी मांडल्या. वापरलेल्या वीजेच्या तुलनेत पाठविलेले बिल फारच अधिक असल्याच्या सर्वाधिक तक्रारी मांडण्यात आल्या.

नागपूर : भरमसाठ वीजबिलामुळे ग्राहकांमध्ये पसरलेला असंतोष दूर करण्यासाठी महावितरणकडून प्रयत्नांची पराकाष्ठ सुरू आहे. ग्राहकांना बिल समजावून सांगता यावे, यादृष्टीने मंगळवारी वेबीनारचे आयोजन करण्यात आले होते. त्यात ग्राहकांकडून तक्रारींचा पाऊस पाडण्यात आला. मोजका वीजपावर करूनही बिल मात्र फुगवून पाठविण्यात आल्याच्या संतप्त भावना ग्राहकांनी व्यक्त केला. अधिकाऱ्यांनी संयमितपणे ग्राहकांना बिलाची माहिती देत त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. 

नागपूर परिमंडळातर्फे मंगळवारी घेण्यात आलेल्या वेबिनारमध्ये नागपूर व वर्धा जिल्ह्यातील 515 ग्राहकांनी सहभाग नोंदवित तक्रारी मांडल्या. वापरलेल्या वीजेच्या तुलनेत पाठविलेले बिल फारच अधिक असल्याच्या सर्वाधिक तक्रारी मांडण्यात आल्या. प्रादेशिक संचालक सुहास रंगारी, प्रभारी मुख्य अभियंता दिलीप दोडके, महाव्यस्थपाक (वित्त व लेखा) शरद दाहेदार, नागपूर ग्रामीण मंडळ कार्यालयाचे अधीक्षक अभियंता नारायण आमझरे, उप महाव्यस्थपाक (माहिती तंत्रज्ञान) प्रमोद खुळे, कार्यकारी अभियंता दीपाली माडेलवर यांनी ग्राहकांची समजूत काढण्याचे प्रयत्न केले. प्रारंभी व्यवस्थापक (वित्त व लेखा) विकास बांबल यांनी ग्राहकांना जून महिन्यातील देयकाची वस्तुस्थिती समजावून सांगितली. 

हेही वाचा - 'माया भाई' म्हणून मिरवायचा, विरोधकांना खटकायचे, त्यातूनच घडला हा प्रकार...
 

लॉकडाऊनच्या काळात बाहेरगावी असतानाही अमाप बिल आल्याची तक्रार बऱ्याच ग्राहकांची होती. याशिवाय बिलाची रक्कम फार अधिक आहे, त्यात हाताला काम नाही, बिल भरायचे तरी कसे, बिलात सवलत मिळेल काय? आदी प्रश्‍नांचीच संख्या अधिक होती. 

लॉकडाऊनच्या काळात सरासरी बिल पाठविण्यात आले. ही देयके हिवाळ्यातील डिसेंबर, जानेवारी व फेब्रुवारी महिन्यांवर आधारित असल्याने उन्हाळ्याच्या तुलनेत कमी युनिटची होती. दुसरीकडे नागरिक घरीच असल्याने दरवेळच्या उन्हाळ्यापेक्षा यंदा वीजेचा वापरही वाढला. अनेकांनी वर्क फ्रॉम होम केल्याने वीजवापरही अधिक झाला. यामुळेच गत वर्षीच्या तुलनेत यंदाच्या उन्हाळ्यातील वीजवापर वाढ झालेली दिसून येत असल्याचा दावा अधिकाऱ्यांकडून करण्यात आला. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Consumer dissatisfaction due to high electricity bills