तीन महिन्यांत वाढले ६३ हजार ६०४ रुग्ण, २४ तासांमध्ये ४८ जणांचा मृत्यू

तीन महिन्यांत वाढले ६३ हजार ६०४ रुग्ण, २४ तासांमध्ये ४८ जणांचा मृत्यू

नागपूर : कोरोनाचा नागपुरात हैदोस सुरू असून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यांत ८० दिवसांमध्ये नागूपर जिल्हा हॉस्टस्पॉट बनला आहे. नागपुरात ३० जूनपर्यंत अवघे १५०३ रुग्ण होते. नंतरच्या ८० दिवसांत तब्बल ६३ हजार ६०४ रुग्ण वाढले आहेत. ३० जूनपर्यंत नागपुरात अवघे २५ मृत्यू होते. गेल्या ८० दिवसांमध्ये २ हजार ६९ मृत्यू झाले आहेत. सोमवारी (ता.२१) नव्याने १३५० बाधितांची भर पडली असून २४ तासांमध्ये ४८ जणांचा बळी गेला आहे.

मागील तीन दिवसांपासून नागपुरातील प्रयोगशाळांमधील चाचण्यांचा टक्का घसरत आहे. सोमवारी ७० टक्के चाचण्या कमी झाल्या. मेयो-मेडिकलसह खासगी प्रयोगशाळेत अवघ्या ३८८८ चाचण्या झाल्या असून त्यात १३५० बाधितांची नोंद झाली. ४८ कोरोनाने बळी घेतल्यामुळे नागपुरात दगावलेल्यांची संख्या २०९४ झाली आहे. तर बाधितांची संख्या ६५ हजार १०७ वर पोहोचली आहे. यातील ५३ हजार ५५० बाधितांनी कोरोनावर मात केली आहे. शहरातील ४४ हजार १५ तर ग्रामीण भागातील ९९ हजार ५३५ रुग्णांनी कोरोनाला हरवले आहे.

मेडिकलमध्ये सहा महिन्यांत ९६२ जणांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. तर मेयोत बाधितांच्या मृत्यूचा आकडा ८२६ वर पोहोचला आहे. खासगी रुग्णालयातही मोठ्या प्रमाणात मृत्यू होत असून ३२४ मृत्यू नोंदवले गेले आहेत. कोरोनाच्या बाधेने दगावलेल्या रुग्णांना प्रामुख्याने फफ्फुसाचा संसर्ग झाल्याने श्वसनाचा त्रास झाला. याशिवाय विविध व्याधी असल्याने अनेक अवयव निकामी होत गेल्याची माहिती डॉक्टरांकडून मिळाली. विशेष असे की, नागपूर जिल्ह्यात झालेल्या २०९४ मृत्यूंमध्ये नागपूर शहरातील मृत्यू १५५८ आहेत. तर ग्रामीण भागात ३४७ मृत्यू झाले आहेत. इतर जिल्ह्यांतून रेफर झालेल्या रुग्णांपैकी १८९ मृत्यू झाले आहेत.

मात करणाऱ्यांचा वाढला टक्का

कोरोनाचा प्रसार वाढला असताना मागील तीन दिवसांपासून बाधितांपेक्षा मात करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. ही बाब दिलासादायक आहे. विशेष असे की, महिनाभरपूर्वी कोरोनावर मात करणाऱ्यांचा टक्का ४६ वर आला होता. आता यात दुपटीच्या जवळपास वाढ झाली आहे. सध्या बरे होण्याचा टक्का ८२ एवढा आहे. सोमवारी १९९४ जणांनी कोरोनावर मात केली. यामुळे कोरोनामुक्तांचा नागपुरातील आकडा ५३ हजार ५५० वर पोहोचला आहे.

  • नागपुरात आतापर्यंत कोरोनाचे २०९४ मृत्यू
  • मेडिकलमध्ये ९६२ तर मेयोत ८२६ मृत्यू
  • एम्समध्ये १२, खासगीत ३२४ मृत्यू

संपादन : अतुल मांगे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com