सावधान ! ग्रामीण भागात होत आहे "कोरोनास्फोट'

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 31 मे 2020

कोरोनाने आता हळूहळू पाय पसरविणे सुरू केले असून शनिवारी नरखेड तालुक्‍यातील मन्नात खेडी येथे दोन, तर हिंगणा तालुक्‍यातील गुमगाव येथे एक रूग्ण पॉजिटिव्ह आढळला आहे. एमआयडीसीतील लोकमान्यनगरातील एका रूग्णाचा मृत्यू झाला आहे.

नागपूर (ग्रामीण) : आजपर्यंत सुरक्षित असलेल्या नागपूर ग्रामीणमध्येही आता "कोरोनास्फोट' होण्याचे संकेत बळावले आहेत. कोरोनाने आता हळूहळू पाय पसरविणे सुरू केले असून शनिवारी नरखेड तालुक्‍यातील मन्नात खेडी येथे दोन, तर हिंगणा तालुक्‍यातील गुमगाव येथे एक रूग्ण पॉजिटिव्ह आढळला आहे. एमआयडीसीतील लोकमान्यनगरातील एका रूग्णाचा मृत्यू झाला आहे. पोलिस व जिल्हा प्रशासनाने रूग्ण आढळलेला परिसर सिल केला असून संपर्कात आलेल्यांना क्‍वॉरंटाइन करण्यात आले आहे.
हे नक्‍कीच वाचाः तिच्या असहय वेदनाही झाल्या "लॉक'

हिंगणा एमआयडीसीत एका रुग्णाचा मृत्यू
हिंगणा एमआयडीसी :  परिसरात काल पॉझिटिव्ह आढळलेल्या 75 वर्षीय रुग्णाचा शनिवारी सकाळी मृत्यू झाला. जळगाव या मूळ गावी गेले असता, लॉकडाउन शिथिल झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना लोकमान्यनगरात परत आणले होते. येथे आणल्यानंतर त्यांना श्‍वास घेण्यात अडथळा निर्माण झाला होता. त्यामुळे त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. शनिवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला.
 

हेही वाचा : ऑनलाईन जुगार खेळणे पडले महागात,पडल्या बेडया

नरखेड तालुक्‍यात दोघे "पॉजिटिव्ह'
सावरगाव : नरखेड तालुक्‍यातील खेडी(मन्नाथ) येथे मुंबईवरून परत आलेल्या नऊ लोकांपैकी दोन रुग्ण पॉझिटिव्ह निघाल्याने आज एकच खळबळ उडाली. दोन रुग्णांची टेस्ट आज पॉझिटिव्ह आल्यावर संपूर्ण गाव सील करण्यात आले. तसेच नऊ जनांसोबत परिवारातील एकूण 30 लोकांना क्वॉरंटाइनसाठी नागपूर येथे पाठविण्यात आले. खेडी(मन्नाथ) येथील नऊ लोक 27 मे रोजी मुंबईवरून गावाला परत आले होते. ते मुंबईच्या एका शॉपिंग मॉलमध्ये काम करत होते. त्यांना त्याच दिवशी राऊत विद्यालय खेडी येथे क्वॉरंटाइन करण्यात आले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी 28 मे रोजी सावरगाव प्राथमिक आरोग्य केंद्र सावरगाव येथे नेण्यात आले. तेथून त्यांना ग्रामीण रुग्णालय नरखेड येथे कोरोना चाचणीकरिता नेण्यात आले. नरखेड येथे नऊ जणांचे नमूने तपासणीसाठी घेतल्यावर तालुका वैद्यकीय अधिकारी देवानंद गायकवाड यांनी त्यांना क्वॉरंटाइन न करता घरी पाठवून दिले. दोन दिवस घरी राहिल्यानंतर आज 28 मे रोजी दोन जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने एकच खळबळ उडाली. याबाबतची माहिती मिळताच तालुक्‍यामध्ये दहशतीचे वातावरण आहे. आतापर्यंत नरखेड तालुक्‍यात एकही पॉझिटिव्ह रुग्ण नव्हता. शनिवारी सकाळी खेडी (मन्नाथ) येथील माहिती मिळताच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे युवा नेते जिल्हा परिषद सदस्य सलील देशमुख यांनी खेडी गावात जाऊन आढावा घेतला व संपूर्ण गाव चौदा दिवसांपर्यंत सील करण्याचा निर्णय घेण्यात आला. परिवारातील सर्व सदस्य क्वारंटाइन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: "Corona blast" happening in rural areas