नागपूरकरांनो सावधान! कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढतोय; आज तब्बल २० रुग्णांचा मृत्यू  

Corona patients are increasing again in nagpur
Corona patients are increasing again in nagpur

नागपूर ः दिवाळीनंतर कोरोनाबाधित तसेच बळींच्या संख्येतही वाढ होण्याचा तज्ज्ञांनी व्यक्त केलेली भीती खरी ठरताना दिसून येत आहे. आज उपचार घेत असलेल्या २० बाधितांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. यात जिल्ह्यातील नऊ तर जिल्ह्याबाहेरचे शहरात उपचार घेत असलेल्या ११ जणांचा समावेश आहे. गेल्या दोन दिवसांच्या तुलनेत आज बाधितांची संख्या कमी असली तरी कोरोनाने धोक्याची घंटा दिल्याचे दिसून येत आहे. 

शुक्रवारी ३४४ नवे बाधित आढळून आल्याने आरोग्य यंत्रणेच्या चिंतेत भर पडली. शहरात उपचार घेणाऱ्या १२ बाधितांचा काल, गुरुवारी मृत्यू झाला होता. बुधवारी सात मृत्यूची नोंद झाली होती. आज शहरात उपचार घेणाऱ्या २० बाधितांचा मृत्यू झाला. शहरात उपचार घेणाऱ्या बाधितांचा आलेख गेल्या तीन दिवसांत वाढल्याचे आकडेवारीतून दिसून येत आहे. त्यामुळे नागपूरकरांना सावध होण्याची वेळ आली असून आरोग्य यंत्रणा, महापालिकेसोबतच नागरिकांच्या जबाबदारीत भर पडली आहे. 

आज आलेल्या कोरोनाबळींच्या संख्येसह एकूण ३ हजार ५७० मृत्यूची नोंद झाली. यात २ हजार ४९१ शहरातील असून ६०६ ग्रामीण भागातील आहेत. जिल्ह्याबाहेरील ४७४ जणांनी उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला. गेल्या दोन दिवसांत बाधितांची संख्या चारशेवर गेली होती. शुक्रवारी ६ हजार ९९७ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. यातून ३४४ नवे बाधित आढळून आले. 

यात शहरातील २७७ तर ग्रामीण भागातील ५६ जणांचा समावेश आहे. ११ जिल्ह्याबाहेरील आहेत. मागील आठवड्यात दररोज सरासरी अडीचशेच्या जवळपास बाधितांची संख्या होती. यात आता शंभर ते पावणे दोनशेनी वाढ होत आहे. आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या १ लाख आठ हजारांपर्यंत पोहोचली. 

शहरातील बाधितांची एकूण संख्या ८५ हजारांवर पोहोचली असून ग्रामीण भागातील संख्या २२ हजारांवर पोहोचली. ६५५ शहराबाहेरील बाधितांचा समावेश आहे. बाधित व बळींच्या संख्येत सातत्याने वाढ होत असल्याने शहरात कोरोनाची दुसरी लाट तर नाही ना? असा प्रश्न आरोग्य अधिकाऱ्यांसह नागरिकांत चर्चिला जात आहे.

कोरोनामुक्तांच्या संख्येत घट

तीन दिवसांत उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असून कोरोनामुक्त झालेल्यांच्या संख्येत घट होताना दिसून येत आहे. बुधवारी उपचार घेणाऱ्यांची संख्या ३ हजार ३०१ होती. काल, गुरुवारी यात वाढ होऊन ३ हजार ५०८ पर्यंत पोहोचली. आज जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या ३ हजार ६२९ पर्यंत पोहोचली. बुधवारी कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या १७५ होती, गुरुवारी २२४ जण कोरोनामुक्त झाले. आज २०३ जण कोरोनामुक्त झाले. आतापर्यंत जिल्ह्यात १ लाख ८०१ जण कोरोनामुक्त झाले आहेत.

संपादन - अथर्व महांकाळ 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com