नागपूरकरांनो, दिलासादायक बातमी! जिल्ह्यात केवळ १० टक्के कोरोना रुग्ण; बाधित आणि मृतांची संख्या घटतेय 

राजेश प्रायकर  
Tuesday, 13 October 2020

मागील महिन्यात दररोज दोन हजारांवर बाधित आणि साठपेक्षा अधिक मृत्यूमुळे नागरिकांनी स्वतःहून जीवनशैलीत बदल केल्याचे चांगले परिणाम दिसून येत आहेत. प्रत्येकालाच मास्क आता अंगवळणी पडले असून व्यायाम, पौष्टिक आहारावर भर दिला जात आहे.

नागपूर ः मागील महिन्यात दररोज दोन हजारांबाधित आणि साठावर बळींमुळे तणावात असलेल्या प्रशासनाला आता दररोज कमी होत असलेल्या बाधित व बळींच्या संख्येमुळे दिलासा मिळत आहे. मंगळवारी विविध रुग्णालयांत उपचार घेत असलेल्या २० जणांचा मृत्यू झाला. यात जिल्ह्यातील १२ जणांचा समावेश आहे. याशिवाय एकूण चाचण्यांच्या तुलनेत केवळ दहा टक्के नागरिक बाधित आढळून आले. बाधित व बळी संख्येचा वेग मंदावला असला तरी अजूनही कोरोनाचे संकट कायम असल्याने नागरिकांनी काळजी घेण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

मागील महिन्यात दररोज दोन हजारांवर बाधित आणि साठपेक्षा अधिक मृत्यूमुळे नागरिकांनी स्वतःहून जीवनशैलीत बदल केल्याचे चांगले परिणाम दिसून येत आहेत. प्रत्येकालाच मास्क आता अंगवळणी पडले असून व्यायाम, पौष्टिक आहारावर भर दिला जात आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांत बाधित व बळींचा आलेख खाली आला आहे. 

ठळक बातमी - जीवनसाथी गमावलेल्यांच्या कोरोनामध्येही जुळल्या मनाच्या तारा

मंगळवारी सायंकाळपर्यंत एकूण २० बाधितांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. यात शहरातील सात तर ग्रामीण भागातील पाच जणांचा समावेश आहे. जिल्ह्याबाहेरील आठ जणांनी शेवटचा श्वास घेतला. या मृत्यूसह एकूण बळींची संख्या २८४० वर पोहोचली आहे. आज एम्स, मेडिकल, मेयो, माफ्सू, नीरी, खाजगी लॅब आदीतील ६ हजार ७४१ चाचण्यांचे अहवाल आले. यातील यातून ६६० जण बाधित आढळून आले. यात शहरातील ४३२ तर ग्रामीणमधील २२० जणांचा समावेश आहे. 

चाचण्यांच्या तुलनेत बाधितांची टक्केवारी दहापेक्षाही कमी आहे. ६६० बाधितांसह बाधितांची एकूण संख्या ८७ हजार ८९० वर पोहोचली. सातत्याने बाधित व बळींचा आलेख खाली येत असल्याने प्रशासनाला काही प्रमाणात दिलासा मिळाला. मात्र, अद्यापही कोरोनाचा धोका टळला नसल्याचे चित्र असल्याने यात सुविधांवर आणखी लक्ष केंद्रीत करावे लागणार असल्याचे दिसून येत आहे.

ठळक बातमी -  मुलाला असलेले मोबाईलचे वेड बेतले वडिलांच्या जीवावर; कुटुंबातील कर्त्या पुरुषाने उचलले टोकाच पाऊल

७७ हजारांवर बाधित कोरोनामुक्त

कोरोनावर मात करणाऱ्यांच्या टक्केवारीतही दररोज सुधारणा होत आहे. आज ९३३ बाधित कोरोनामुक्त झाले. बरे होणाऱ्यांची संख्या ७७ हजार ४७१ वर पोहोचली. सध्या शहरातील विविध रुग्णालयांसह घरी उपचार घेत असलेले ७ हजार ५७९ रुग्ण आहेत. यात ग्रामीणमध्ये २५७६ तर शहरातील ५ हजार तीन रुग्णांचा समावेश आहे. 

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: corona patients are only 10 percent in Nagpur