घरातील बाधितांवरही आता चांगले उपचार, उपचारासाठी मनपाचा कंपनीसोबत करार

राजेश प्रायकर
Friday, 2 October 2020

शहरात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. सौम्य लक्षणे असलेल्या किंवा लक्षणे नसलेल्या रुग्णांना गृह विलगीकरणात ठेवले जात आहे. अशा रुग्णांच्या प्रकृतीची वेळेवर विचारपूस व्हावी, त्यांना त्रास असल्यास योग्यवेळी डॉक्टरांचा सल्ला मिळावा, यासाठी महापालिकेने ‘स्टेप वन’ कंपनीसोबत करार केला.

नागपूर : शहरात जवळपास सात ते आठ हजार बाधित गृहविलगीकरणात आहेत. त्यांची विचारपूस कुणीही करीत नसल्याने त्यांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे महापालिकेने त्यांनाही डॉक्टरांचा योग्य सल्ला मिळावा, यासाठी ‘इंटरेक्टिव्ह व्हायस रिस्पॉन्स’ (आयव्‍हीआर) प्रणालीचा वापर सुरू केला. या प्रणालीद्वारे गृहविलगीकरणातील बाधितांशी संपर्क साधून त्यांना योग्य उपचार उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

शहरात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. सौम्य लक्षणे असलेल्या किंवा लक्षणे नसलेल्या रुग्णांना गृह विलगीकरणात ठेवले जात आहे. अशा रुग्णांच्या प्रकृतीची वेळेवर विचारपूस व्हावी, त्यांना त्रास असल्यास योग्यवेळी डॉक्टरांचा सल्ला मिळावा, यासाठी महापालिकेने ‘स्टेप वन’ कंपनीसोबत करार केला. या करारानुसार शहरातील कोरोना रुग्णांना ‘इंटरेक्टिव्ह व्हायस रिस्पॉन्स' प्रणालीद्वारे दूरध्वनीवरुन संपर्क करण्यात येईल. 

सविस्तर वाचा - अचानक का कमी झाली कोरोना बाधितांची संख्या? अतिशय धक्कादायक कारण आले समोर
 

शहरात दररोज हजारापर्यंत रुग्ण आढळून येत आहे. या रुग्णांना व्यक्तिगतरित्या दूरध्वनीव्दारे संपर्क करणे अवघड होत आहे. या समस्येवर उपाय म्हणून आयव्हीआर प्रणालीद्वारे संपर्क केला जाईल. यासंबंधी मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. आणि ‘स्टेप वन’ कंपनी यांच्यात नुकताच सामंजस्य करार करण्यात आला. या कंपनीच्या माध्यमातून देशात अनेक शहरांमध्ये कोव्हिड रुग्णांशी संपर्क साधण्यात यश आले आहे.

 गृह विलगीकरणात राहण्यासाठी रुग्णाच्या घरी व्यवस्था नसल्यास मनपाद्वारे कोव्हिड केअर सेंटरमध्ये रुग्णांची नि:शुल्क व्यवस्था करण्यात येत आहे. गृह विलगीकरणातील रुग्णांकरीता आयव्हीआर प्रणाली अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. या सिस्टीममुळे गृह विलगीकरणातील रुग्ण स्वत:च प्रकृतीची काळजी घेउ शकतील. त्यांना काही त्रास जाणवल्यास तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घेता येईल.
 

अशी आहे प्रणाली

या प्रणालीद्वारे गृह विलगीकरणातील रुग्णाला फोन केला जाईल. फोन आल्यानंतर रुग्णाला फोनवर सांगण्यात येणारे नंबर दाबून प्रकृतीची माहिती द्यावी लागणार आहे. प्रकृती खालावलेली आढल्यास त्या रुग्णाचा मोबाईल क्रमांक तज्ज्ञ डॉक्टरांना दिला जाईल. तज्ज्ञ डॉक्टर त्यांना संपर्क करुन आवश्यक सल्ला देतील.

रुग्णांना होणार फायदा 
या सेवेचा गृह विलगीकरणातील कोरोना रुग्णांना फायदा होईल. त्यांची प्रकृती बरी नसल्यास तज्ज्ञ डॉक्टर त्यांना वेळेत उपचार करण्यास मदत करतील. या सिस्टीममुळे गृह विलगीकरणातील रुग्ण स्वत:च प्रकृतीची काळजी घेउ शकतील.
- जलज शर्मा, अतिरिक्त आयुक्त, महापालिका. 

संपादन  : अतुल मांगे  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona patients at home are now being treated with an IVR system