खासगी केंद्रातील कोरोना चाचणी अहवाल नकोच; शाळांची शिक्षकांना तंबी 

मंगेश गोमासे 
Friday, 20 November 2020

राज्यात शाळा सुरू करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहे. मात्र, हा निर्णय घेताना स्थानिक प्रशासनालाही अधिकार देण्यात आले आहे. याशिवाय शाळा सुरू करण्यासाठी राज्याने काही नियम घालून दिले आहेत. या नियमांमध्ये शिक्षकांना कोरोना चाचणी अनिवार्य करण्यात आलेली आहे. 

नागपूर ः राज्यात २३ नोव्हेंबरपासून नववी ते बारावीच्या शाळा सुरू होणार आहेत. त्यामुळे शिक्षकांना शाळेत येण्यापूर्वी कोरोना चाचणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र, बरेच शिक्षक कोरोना चाचणी निगेटीव्ह यावी यासाठी खासगी तपासणी केंद्रातून आणलेला अहवाल शाळांमध्ये सादर करीत आहेत. त्यामुळे शाळांनी केवळ सरकारी कोरोना तपासणी केंद्रांतून आणलेला अहवालाच ग्राह्य धरण्यात येणार असल्याची तंबी शिक्षकांना दिली आहे.

राज्यात शाळा सुरू करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहे. मात्र, हा निर्णय घेताना स्थानिक प्रशासनालाही अधिकार देण्यात आले आहे. याशिवाय शाळा सुरू करण्यासाठी राज्याने काही नियम घालून दिले आहेत. या नियमांमध्ये शिक्षकांना कोरोना चाचणी अनिवार्य करण्यात आलेली आहे. 

जाणून घ्या - दुर्दैवी! शेतात कामासाठी गेला शेतकरी; सापाने तब्बल तीन वेळा दंश केल्याने गेला जीव

मात्र, यापैकी काही शिक्षक खासगी तपासणी केंद्रात जाऊन तपासणी करीत आहे आणि स्वतःच्या अहवालात बदल करण्याचे काम करीत आहेत. त्यामुळे अशा प्रकारावर आळा घालण्याच्या दृष्टीने शाळांकडून आता केवळ सरकारी तपासणी केंद्रातील कोरोना तपासणी अहवाल ग्राह्य धरण्यात येणार आहे. 

याशिवाय ‘ॲन्टीजेन' तपासणी ऐवजी ‘आरटीपीसीआर' चाचणीच करण्यात यावी असे स्पष्ट निर्देश शाळांकडून देण्यात आले आहेत. कोरोना चाचणीचा अहवाल शाळेतील मुख्याध्यापकांनी लवकरात लवकर पाठवायचा असल्याने शहर आणि ग्रामीण भागातील सरकारी कोरोना तपासणी केंद्रांवर तपासणीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी उसळली आहे.

संपादन - अथर्व महांकाळ 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: corona report from private labs are not allowed to teachers