अखेर कोरोना चाचणी केंद्र सुरू, मध्य रेल्वेतील कर्मचारी व कुटुंबीयांना दिलासा

योगेश बरवड
Saturday, 3 October 2020

कोरोनाची बाधा झाल्यास कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांना शासकीय रुग्णालयात पाठवले जात होते. इतकेच नाहीतर कोरोनाची लक्षणे आढळल्यास तपासणीची सुविधाही नव्हती. यामुळे कर्मचारी व त्यांचे कुटुंबीय चिंतेत होते. यासाठी कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारले. अलिकडेच संविधान चौकात धरणे आंदोलन करण्यात आले.

नागपूर : कर्मचाऱ्यांच्या मागणीनुसार अखेर मध्य रेल्वेने अजनीतील कम्युनिटी हॉलमध्ये कोरोना चाचणी केंद्र सुरू केले आहे. यामुळे रेल्वे कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांना दिलासा मिळाला आहे. 

पहिल्या दिवशी १० आणि दुसऱ्या दिवशी २७ जणांची तपासणी करण्यात आली. मध्य रेल्वे तसेच दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात अनेक अधिकारी आणि कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. काही कोरोनाबाधित कर्मचाऱ्यांना जीवही गमवावा लागला आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण होते. कठीण परिस्थितीतही रेल्वे कर्मचारी जोखीम पत्करून सेवा देत आहेत. पण, त्यांच्यासाठी कोणतीही वेगळी व्यवस्था करण्यात आली नव्हती. आजारी रेल्वे कर्मचाऱ्यांवर उपचारासाठी रेल्वे रुग्णालय असले तरी तिथे कोरोना रुग्णावर उपचार होत नाही. कोरोनाच्या सुरुवातीच्या काळातच संशयितांवर उपचाराची सुविधा असलेले डबे तयार करून ठेवले. अजनीत आयसोलेशन सेंटरही तयार करून ठेवले. पण, महापालिकेकडून त्याचा उपयोगच करण्यात आला नाही. 

हेही वाचा - नागपुरातील सिताबर्डी मुख्य रस्ता होणार 'व्हेईकल फ्री झोन', लवकरच प्रस्तावावर शिक्कामोर्तब

कोरोनाची बाधा झाल्यास कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांना शासकीय रुग्णालयात रेफर केले जात होते. इतकेच नाहीतर कोरोनाची लक्षणे आढळल्यास तपासणीची सुविधाही नव्हती. यामुळे कर्मचारी व त्यांचे कुटुंबीय चिंतेत होते. यासाठी कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारले. अलिकडेच संविधान चौकात धरणे आंदोलन करण्यात आले. 

हेही वाचा - जेवताना पोळी कधी आणि किती खावी? जाणून घ्या आहारतज्ज्ञ डॉ. कविता गुप्ता यांच सल्ला

रेल्वे रुग्णालयात कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करावी, रेल्वे रुग्णालयात आयसोलेशन वॉर्ड तयार करावा, पॉझिटिव्ह कर्मचाऱ्यांसाठी वेगळा वॉर्ड तयार करावा, रेल्वे रुग्णालय तसेच रेल्वेच्या प्रत्येक विभागात कर्मचाऱ्यांसाठी ऑक्सिमीटरची सुविधा उपलब्ध करून द्यावी, रेल्वे रुग्णालयात कर्मचाऱ्यांची गर्दी होऊ नये म्हणून लोकोशेड, रेल्वे क्वॉर्टर आणि प्रत्येक विभागात कोरोना चाचणी शिबिर आयोजित करण्यात यावे, पॉझिटिव्ह कर्मचाऱ्यांसाठी ऑनलाइन मार्गदर्शनाची व्यवस्था करावी, रेल्वे कर्मचाऱ्यांना ५० लाखाचा विमा द्यावा आदी मागण्या कर्मचाऱ्यांनी लावून धरल्या होत्या. या मागणीची दखल घेत मध्य रेल्वेने अजनी येथील कम्युनिटी हॉलमध्ये कोविड चाचणी केंद्र सुरू केले आहे.

संपादन - भाग्यश्री राऊत


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: corona testing center starts in central railway in nagpur