धोका वाढला, शहरानंतर आता ग्रामीण भागात कोरोनाची "एंट्री'

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 27 मे 2020

आता ग्रामीण भागातही कोरोनाचा शिरकाव सुरू झाला आहे. आत्तापर्यंत शहरी भागापेक्षा ग्रामीण भागातील नागरिकांनी गावातील रस्ते बंद करून स्वतःची सुरक्षा चोख बजावली. आता मात्र शासनाने लॉकडाउनमध्ये ढील दिल्याने बाहेरगावी राहणारे लोक मोठ्या प्रमाणात घरी परतू लागले आहेत. यामुळे आता खऱ्या अर्थाने कोरोनाचा धोका वाढला आहे.

हिंगणा (जि.नागपूर) : सदया चौथा लॉकडाउन सुरू आहे. बाजारपेठा सुरू केल्याने सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडवून नागरिक गर्दी करीत आहेत. कामकाजाच्या नावाखाली फिरणाऱ्या लोकांची गर्दी वाढू लागली आहे. ग्रामीण भागात आता कोरोनाची "एंट्री' सुरू झाली असताना पोलिस बंदोबस्त सैल करण्यात आला आहे. यामुळे आता कोरोना रुग्णांची संख्या वाढण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे.

नक्‍की वाचा : ग्रामस्थांना वाटतो वाघ, वनविभागाचे कर्मचारी म्हणतात, लांडगा आला रे आला...

पोलिस बंदोबस्तात ढील; रस्त्यावरील पोलिसांचे बॅरिकेड्‌स हटविले
नागपूर शहरात कोरोना रुग्णांची संख्या चारशेच्या घरात पोहोचली आहे. चौथ्या लॉकडाउनमध्ये राज्य शासनाने काही अंशी सूट दिल्याने बाजारपेठा सुरू करण्यात आल्या आहे. हिंगणा, रायपूर, वानाडोंगरी नीलडोह, डिगडोह, गुमगाव, कान्होलीबारा, अडेगाव, टाकळघाट येथे बाजारात खरेदीसाठी नागरिकांची गर्दी उसळत आहे. बुटीबोरी, हिंगणा, कळमेश्वर एमआयडीसीमधील कंपन्यासुद्धा आता बऱ्यापैकी सुरू झाल्या आहेत. मुंबई, पुण्यासारख्या शहरातून विद्यार्थी आता घरी परतू लागले आहेत. अशा परिस्थितीत कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. नागपूर ग्रामीणमधील कोंढाळी, बुटीबोरी, दहेगाव येथे कोरोनाचे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. यामुळे आता ग्रामीण भागातही कोरोनाचा शिरकाव सुरू झाला आहे. आत्तापर्यंत शहरी भागापेक्षा ग्रामीण भागातील नागरिकांनी गावातील रस्ते बंद करून स्वतःची सुरक्षा चोख बजावली. आता मात्र शासनाने लॉकडाउनमध्ये ढील दिल्याने बाहेरगावी राहणारे लोक मोठ्या प्रमाणात घरी परतू लागले आहेत. यामुळे आता खऱ्या अर्थाने कोरोनाचा धोका वाढला आहे.

हेही वाचा : पैसेवारी काढताच कशाला?

कुठल्याही उपाययोजना नाही
गृहविभागाने पोलिस विभागाला लॉकडाउनच्या काळात सतत दोन महिने बंदोबस्तात तैनात केले होते. बंदोबस्तातील काही पोलिस कर्मचाऱ्यांनाही कोरोना झाला. एसआरपीएफ जवानांना कोरोना झाल्याचे दिसून आले. हिंगणा तालुक्‍यातही आता पोलिसांचा बंदोबस्त सैल करण्यात आला आहे. हिंगणा मार्गावरील व ग्रामीण भागातील पोलिसांचे बॅरिकेड्‌स हटविले आहे. यामुळे वाहतुकीची वर्दळ सुरू झाली आहे. पोलिसबांधव केवळ चौकात एका कोपऱ्यात बंदोबस्तासाठी बसलेले दिसून येतात. यामुळे रस्त्यावरून कोण येत आहे आणि कोण जात आहे याचे भानही राहिले नाही. परिणामी कोरोनाचे रुग्ण आता वाढण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. जिल्हाधिकारी महोदयांनी आता खऱ्या अर्थाने ग्रामीण भागात बंदोबस्तात वाढ करण्याची गरज आहे. याबाबतचे आदेश पोलिस प्रशासनाला देण्याची आवश्‍यकता आहे. मात्र, याबाबत कुठल्याही उपाययोजना होत नसल्याचे दिसून येत आहे.

हेही वाचा : आंतरराष्ट्रीय हॉलीबॉलपटू म्हणते खेळावर "फोकस' करण्यासाठी नोकरी हवीच

ग्रामपंचायतीत क्वारंटाइन सेंटर उभारण्याचे आदेश
हिंगणा तालुक्‍यातील ग्रामपंचायतीसह वानाडोंगरी नगर परिषद व हिंगणा नगरपंचायतमध्ये बाहेरगावावरून गावात येणाऱ्या व्यक्तींना क्वारंटाइन करण्यासाठी क्वारंटाइन सेंटर उभारण्याचे आदेश आज मंगळवारी पार पडलेल्या बैठकीत जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी दिले. होमक्वारंटाइन म्हणून कुणीही घरी राहणार नाही, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. सेंटरवर केवळ निवासाची व्यवस्था राहणार आहे. रुग्णांच्या नातेवाइकांना घरून भोजनाची व्यवस्था करावी, लागणार आहे. सेंटरची सर्व जबाबदारी पंचायत समितीचे खंडविकास अधिकारी महेंद्र जुवारे यांच्यावर सोपविण्यात आली आहे. याचे कितपत पालन स्थानिक स्वराज्य संस्था करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.  
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona's "entry" into rural areas after the city