नागपूर ब्रेकिंग : नगरसेवक, डागाचा सहायक अधीक्षक जुगार खेळताना सापडला

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 जून 2020

प्रवीण भिसीकर प्रभाग-5 मधून नगरसेवक असून यापूर्वी ते महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष, परिवहन समितीचे उपसभापती या पदावर कार्यरत होते. संजय कुराडे डागा रुग्णालयात वरिष्ठ सहायक अधीक्षक, सुरेश भोयर शिपाई पदावर कार्यरत आहेत. तर नरेंद्र मेश्राम जिल्हा हिवताप कार्यालयात लिपिक आहेत. आनंदनगर अत्रे लेआऊट येथील संजय लाटकर नावाच्या व्यक्‍तीच्या घरी जुगार सुरू असल्याची गोपनीय माहिती गुन्हे शाखेला मिळाली.

नागपूर : बजाजनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अत्रे ले-आऊट परिसरात सुरू असलेल्या आलिशान जुगार अड्डयावर मंगळवारी रात्री गुन्हे शाखा पोलिसांनी छापा टाकून नगरसेवक, डागा रुग्णालयाचे सहायक अधीक्षक, आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांसह आठ जणांना अटक केली. त्यांच्याकडून 19 लाख 80 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

प्रवीण विलासराव भिसीकर (40) रा. तीन नल चौक, कसारपुरा, संजय भाऊराव कुराडे (54), नरेंद्र व्यंकटराव मेश्राम (46) रा. जोगीनगर, प्रवीण मनोहर पराते (33) रा. विणकर कॉलनी, मानेवाडा, सुरेश महादेवराव भोयर (54) रा. धोटे लेआऊट, नीलेश केशवराव मोहाडीकर (34) रा. विणकर कॉलनी, रमेश रूपलाल जाधव (54) रा. एचबी इस्टेट, सोनेगाव आणि ज्ञानराव नत्थुजी धार्मिक (42) रा. साईनगर, जयताळा अशी अटक करण्यात आलेल्या जुगाऱ्यांची नावे आहेत.

प्रवीण भिसीकर प्रभाग-5 मधून नगरसेवक असून यापूर्वी ते महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष, परिवहन समितीचे उपसभापती या पदावर कार्यरत होते. संजय कुराडे डागा रुग्णालयात वरिष्ठ सहायक अधीक्षक, सुरेश भोयर शिपाई पदावर कार्यरत आहेत. तर नरेंद्र मेश्राम जिल्हा हिवताप कार्यालयात लिपिक आहेत. आनंदनगर अत्रे लेआऊट येथील संजय लाटकर नावाच्या व्यक्‍तीच्या घरी जुगार सुरू असल्याची गोपनीय माहिती गुन्हे शाखेला मिळाली.

या माहितीच्या आधारावर पोलिस निरीक्षक विनोद चौधरी, सहाय्यक निरीक्षक पंकज धाडगे, फौजदार रफीक खान, प्रशांत लाडे, अनिल दुबे, शैलेश पाटील, अरुण धर्मे, श्‍याम कडू, अमित पात्रे, प्रवीण गोरटे, मोहम्मद रफीक व राजू पोतदार यांनी मंगळवारी रात्री 7.10 ते 8.40 वाजेदरम्यान छापा टाकला. त्यावेळी आरोपी तासपत्त्यावर जुगार खेळत होते. पोलिसांनी कारवाई करून त्यांना अटक केली. त्यांच्याकडून 19 लाख 80 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. संजय लाटकर फरार असून, तो वाहतूक व्यावसायिक असल्याची माहिती आहे.

कोरोना ब्रेकिंग : विदर्भात रुग्णांची वाढ थांबता थांबेना, एका दिवशी वाढले इतके रुग्ण

बजाजनगर पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्‍नचिन्ह

संजय लाटकर याच्या बंगल्यात अनेक दिवसांपासून जुगार अड्डा सुरू आहे. मात्र बजाजनगर पोलिसांनी या अड्ड्याबाबत कोणतीही माहिती नसल्याने आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत आहे. गुन्हेशाखेच्या युनिट तीनने या बंगल्यावर छापा टाकल्याने बजाजनगर पोलिसांची भूमिकेवर संशय व्यक्‍त केला जात आहे. आता पोलिस आयुक्त डॉ.भूषणकुमार उपाध्याय काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The corporator, Daga's assistant superintendent, was found gambling