गुन्हेशाखा पोलिसांना प्रीतीचे 'दास' सापडेना; न्यायालयाने दिला हा निर्णय... 

अनिल कांबळे
बुधवार, 24 जून 2020

प्रीती पोलिस कोठडीत असली तरी गुन्हेशाखा पोलिस अद्याप मात्र तिचे "दास' शोधू शकले नाहीत. भरोसा सेलच्या नावे प्रीती दासने मुलाविरुद्ध गुन्हा दाखल न करण्यासाठी पूर्णाबाई गिरधर सडमाके (वय 55) यांच्याकडून 25 हजार रुपये उकळले होते.

नागपूर : प्रीतीने जरीपटका व सीताबर्डी पोलिस ठाण्यामध्ये दाखल गुन्ह्यात जामीन मिळावा, यासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. मंगळवारी या अर्जावर सुनावणी झाली. प्रीतीच्या जामीनाला गुन्हेशाखा पोलिसांनी कडाडून विरोध केला. दोन्ही पक्षांकडील युक्तिवादानंतर न्यायालयाने प्रीतीचा जामीन अर्ज फेटाळून लावला. प्रीती दासवर लकडगंज, जरीपटका, पाचपावली व सीताबर्डी पोलिस ठाण्यामध्ये चार गुन्हे दाखल आहेत. 

जरीपटक्‍यातील खंडणी प्रकरणात गुन्हेशाखेच्या विशेष तपास पथकाने प्रीतीला अटक केली. ती 24 जूनपर्यंत पोलिस कोठडीत आहे. पोलिस प्रीतीची कसून चौकशी करीत आहेत. खंडणी व फसवणूक करून उकळलेली रक्कम तिने कुठे लपवून ठेवली, याचा शोध गुन्हे शाखा पोलिस घेत आहेत.

हेही वाचा - पत्नीच्या जळत्या चितेवर पतीची उडी, सुखी जीवनाचा दुर्दैवी अंत

गुन्हेशाखा पोलिसांच्या कोठडीत असलेली "लुटेरी दुल्हन' प्रीती दासच्या घराची मंगळवारी झाडाझडती घेण्यात आली. पोलिसांनी तिच्या मुलाकडून 10 हजार रुपयांची रोख जप्त केली आहे. गुन्हेशाखा पोलिसांच्या या कारवाईमुळे तपासाला आता गती मिळाल्याची चर्चा आहे. 

प्रीती पोलिस कोठडीत असली तरी गुन्हेशाखा पोलिस अद्याप मात्र तिचे "दास' शोधू शकले नाहीत. भरोसा सेलच्या नावे प्रीती दासने मुलाविरुद्ध गुन्हा दाखल न करण्यासाठी पूर्णाबाई गिरधर सडमाके (वय 55) यांच्याकडून 25 हजार रुपये उकळले होते. याप्रकरणी जरीपटका पोलिसांनी प्रीती दासविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात प्रीतीने उकळलेल्या 25 हजार रुपयांपैकी 10 हजार रुपये पोलिसांनी जप्त केले, अशी माहिती समोर येत आहे.

अधिक माहितीसाठी - दुर्दैवी ! खेळण्या-बागडण्याच्या वयात केतेश्‍वरीचे जाणे मनाला हूरहूर लावणारे...

'तुमचे काम करून देतो' 25 हजार द्या

जरीपटका हद्दीतील इंदिरा माता टेकडी गोंड मोहल्ला, नागपूर येथे राहणाऱ्या पूर्णाबाई समाके यांचा मुलगा वायुसेनेत नोकरीवर आहे. नवविवाहित सुनेसोबत वाद झाल्यानंतर तिने भरोसा सेलमध्ये पती व सासूविरुद्ध तक्रार केली. तक्रार करताच टपून बसलेल्या प्रीती दासने पूर्णाबाई यांचे घर गाठले. आरोपी प्रीती दासने पूर्णाबाई यांना "तुमचे काम करून देतो.' असे म्हणून त्यांना 25 हजार रुपयांची खंडणी मागितली. खंडणी न दिल्यास मुलाची वायुसेनेतील नोकरी गमविणार, अशी धमकी दिली. प्रीतीच्या धमकीला घाबरून पूर्णाबाई यांनी प्रीतीला 25 हजार रुपये दिले. जरीपटका पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The court rejected the bail of Preeti Das