#GoodNews : काकडीची साल करेल धमाल; बायो-डिग्रेडेबल पॅकेजिंगसाठी उपयुक्त

Cucumber peel is suitable for bio degradable packaging
Cucumber peel is suitable for bio degradable packaging

नागपूर : काकडी खायची व त्याची साल फेकून द्यायची हे जवळपास सगळीकडचे चित्र आहे. परंतु, काकडीच्या सालपासून बायो-डिग्रेडेबल पॅकिंग (जैवअपघटनीय) विकसित करण्यात संशोधकांना यश आले आहे. यामुळे प्लॅस्टिकला पर्याय मिळेल व शेतकरी, व्यापाऱ्यांना उत्पन्नाचा आणखी एक स्रोत खुला होणार असल्याचा दावा करण्यात येत आहे.

भारतासह देशभरात काकडीचा वापर कोशिंबिरी, सलाद, लोणचे तसेच पेय उद्योगातही होतो. कच्च्या काकडीचेही मोठ्या प्रमाणात सेवन केले जाते व काकडीची साल फेकून देण्यात येते. या काकडीच्या सालमध्ये महत्त्वपूर्ण असा सेल्यूलोज घटक असतो. संपूर्ण काकडी किंवा काकडीची साल यावर प्रक्रिया केल्यानंतर सेल्युलोज, हेमिसेल्युलोज, पेक्टिन मिळवण्यात येते.

यापासून नॅनो-फिलर म्हणून उपयुक्त नवीन बायो-मटेरियल मिळविण्यात यश आले आहे. सेल्युलोज नॅनोक्रिस्टल्सपासून तयार या बायो मटेरिअलपासून फूड पॅकेजिंगचे साहित्य, सामग्री तयार करता येणार असल्याचा दावा खरगपूर येथील आयआयटीच्या संशोधकांनी केला आहे.

पर्यावरण ऱ्हासाला प्लॅस्टिक कारणीभूत असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. प्लॅस्टिकमुळे मानवी आरोग्य, जनावरांचे आरोग्य तसेच निसर्गालाही खूप मोठा धोका निर्माण झाला आहे. जगभरात प्लॅस्टिकविरोधात जनजागृती होत असूनही सबळ पर्याय न सापडल्यामुळे प्लॅस्टिकचा वापर सुरूचं आहे.

खाद्यपदार्थांच्या पॅकेजिंगसाठीही प्लॅस्टिकच वापरले जाते. याविषयी खरगपूर येथील आयआयटी संस्थेच्या कृषी, अन्न व इंजिनिअरिंग विभागात विविध प्रयोग करण्यात आले. प्रयोगांमध्ये काकडी व काकडीची साल याचा प्रामुख्याने वापर करण्यात आला. यावर प्रक्रिया केल्यानंतर जे बायो मटेरिअल मिळते त्यापासून खाद्य पदार्थांच्या पॅकेजिंगचा प्रश्न सुटू शकतो असे लक्षात आले. याविषयीचा अभ्यास अहवाल संशोधकांनी प्रसिद्ध केला आहे.

प्लॅस्टिकला पर्याय, शेतकऱ्यांना संधी

काकडीच्या सालपासून मिळणाऱ्या सेल्युलोज नॅनोक्रिस्टल्समध्ये मोठ्या प्रमाणात हायड्रॉक्सिल ग्रुपचे घटक असतात. या गुणधर्मामुळे मिळणारे बायो मटेरिअल हे अधिक मजबूत, पुनर्वापरायोग्य आणि आर्थिक दृष्टीने लाभाचे आहे. अन्न प्रक्रिया उद्योगासाठी पॅकेजिंगची मोठी समस्या आहे. प्लॅस्टिक वापराची ही समस्या काकडीच्या सालपासून तयार केलेल्या बायो-डिग्रेडेबल पॅकिंगमुळे बऱ्याच अंशी कमी होईल. शिवाय काकडी उत्पादक व व्यापाऱ्यांनाही यातून संधी मिळेल, असा विश्वास संशोधक प्रा. जयिता मित्र आणि एन. साई प्रसन्ना यांनी व्यक्त केला.

संपादन - नीलेश डाखोरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com