एका क्‍लिकवर मिळवा जॉब... बेरोजगारांना जाळ्यात ओढताहेत सायबर क्रिमिनल्स 

अनिल कांबळे 
शुक्रवार, 19 जून 2020

सध्या नोकरी किंवा हाताला कामाच्या शोध असलेले शेकडो बेरोजगार आहेत. पगार आणि सुविधा बघता अनेक जण लिंकवर किंवा दिलेल्या मोबाईल नंबरवर फोन करतात. चौकशी करतात आणि त्यांच्या जाळ्यात अलगद फसतात. 

नागपूर : कोरोनाच्या महामारीमुळे सर्व व्यवसाय ठप्प झाले आहेत. अनेक कंपन्यांनी कामगार, नोकरदार, मजुरांना कामावरून कमी केले. तर परप्रांतीय कामगार घराकडे परतले. त्यामुळे सध्या अनेक कंपन्यांमध्ये जागा रिक्‍त आहेत. सध्या बेरोजगारांची संख्या पाहता सायबर क्रिमिनल्सची गॅंग सक्रिय झाली आहे. गलेलठ्ठ पगार, जॉब सिक्‍युरिटी, पीएफ आणि निवास यांसारख्या सुविधा देण्याचे आमिष दाखवून ऑनलाईन नोंदणीच्या नावावर सावज टिपत आहेत. त्यासाठी फेसबुक, वॉट्‌सऍप, इंस्टाग्राम, ट्विटर आणि एसएमएसवरून बेरोजगारांना जाळे टाकण्याचा प्रयत्न सायबर किमिनल्स करीत आहेत. 

आठवी, दहावी आणि बारावीपासून ते इंजिनिअर्सपर्यंत नोकरी उपलब्ध आहे. नोकरीची सुवर्ण संधी... लॉकडाऊनमुळे त्वरित नोकरी देणे आहे... हॅंडसम सॅलरी, पॅकेज.. प्रॉव्हिडंट फंड, राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था तसेच कंपनीतून घरापर्यंत प्रवासासाठी स्टाफबस... त्वरित नोंदणी करा किंवा त्वरित लिंकवर क्‍लिक करा... तुमचा एक फॉरवर्ड मॅसेज तुमच्या मित्रांना नोकरी मिळवून देऊ शकतो... असे असंख्य मॅसेज सध्या सोशल मीडियावर फिरत आहेत.

अधिक माहितीसाठी - नागपूरच्या या 'लेडी डॉन'ने केली अनेक पोलिस अधिकाऱ्यांची "शिकार"
 

तसेच अनेकांना एसएमएसच्या स्वरूपातही जाळे पसरविले जात आहे. सध्या नोकरी किंवा हाताला कामाच्या शोध असलेले शेकडो बेरोजगार आहेत. पगार आणि सुविधा बघता अनेक जण लिंकवर किंवा दिलेल्या मोबाईल नंबरवर फोन करतात. चौकशी करतात आणि त्यांच्या जाळ्यात अलगद फसतात. 

असे अडकवितात जाळ्यात 

सायबर गुन्हेगारांनी पाठविलेल्या लिंकवर क्‍लिक केल्यानंतर एक फॉर्म येतो. त्यावर आपली स्वतःची माहिती भरावी लागते. त्यामध्ये बॅंकेला सलग्न असलेला मोबाईल क्रमांक आणि ई-मेल आयडीसुद्धा आपण टाकतो. ही सर्व माहिती गोळा केल्यानंतर 500 ते हजार रुपये नोंदणी शुल्क भरण्यास सांगितले जाते. गरजवंत असल्याने 20 ते 30 हजार रुपये महिन्याच्या नोकरीसाठी तो पैसे टाकतो. 

असा करतात गेम 

जॉब कन्सल्टन्सी कंपनीतून बोलत असल्याचे सांगून पाच ते सहा ठिकाणी जॉब असल्याचे सांगितले जाते. पगार 30 हजार ते 40 हजार रुपये देण्याची तयारी दर्शविली जाते. आमिषाला बळी पडल्यानंतर पुन्हा 2 ते 5 हजार रुपये "जॉब सर्चिंग चार्ज' म्हणून भरण्यास सांगितले जाते. पगाराचा आकडा पाहता तेवढे पैसे बॅंक खात्यात भरून अपॉइंटमेंट लेटरची वाट पाहण्यास सांगितले जाते. अशाप्रकारे दर आठ दिवसात कॉल करून असे शुल्क आकारतात. शेवटपर्यंत नोकरी मात्र मिळत नाही. 

अशी घ्या काळजी 

  • "नोकरीची सुवर्ण संधी' अशा सोशल मीडियावर व्हायरल मॅसेजवर विश्‍वास ठेवू नका 
  • स्वतःची शैक्षणिक पात्रता, कौशल्य पहा, त्यानुसार किती पगार आणि कोणते काम मिळू शकते, यावर विचार करा 
  • थेट कंपनीची वेबसाईट बघा, तेथील एचआर विभागाशी संपर्क करा 
  •  कोणत्याही दलालाच्या माध्यमातून नोकरी मिळविण्याचा प्रयत्न करू नका 
  •   नोकरी मिळविण्यासाठी कुणालाही पैशाचा व्यवहार करू नका 

 

ओटीपी शेअर करू नका 
बेरोजगारांनी मोबाईल क्रमांकावर कॉल करू नका. कोणत्याही लिंकवर क्‍लिक करू नका. नव्याने बनावट बेवसाईट बनवू शकतात. वेबसाईट बनविल्याच्या तारखेवर लक्ष द्या. नुकताच बनविलेली असेल तर विश्‍वास ठेवू नका. शक्‍यतो बॅंक ट्रॅंझॅक्‍शन करू नका. ओटीपी किंवा बॅंक टिडेल्स शेअर करू नका. 
- डॉ. अर्जुन माने, सायबर एक्‍सपर्ट 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Cyber ​​criminals are trapping the unemployed