शंकराच्या उपासकांवर का यावी ही वेळ? वाचा संपूर्ण प्रकार...

अतुल मेहेरे
Friday, 17 July 2020

मागच्या वर्षी सप्टेंबर महिन्यात दशनाम गोसावी समाजाची राष्ट्रीय स्तरावरची गोलमेज परिषद "सकाळ' आणि सनातन दशनाम गोसावी समाजाच्या संयुक्त वतीने नागपूर येथे घेण्यात आली.  यामध्ये देवधर्म या विषयावर चर्चा झाली असेल, असे कुणालाही वाटेल. पण तसे अजिबात झाले नाही. "युपीएससी-एमपीएससी' परीक्षा आणि अद्ययावत स्टडी सेंटर उभारण्यावर चर्चा झाली. 

नागपूर : साधू, संत, महंतावर हल्ला होण्याची घटना पालघर ही पहिली नाही. यापूर्वीही महंतांवर पिसाळलेल्या हिंस्त्र झुंडांनी हल्ले केले, त्यांना ठेचून मारले आहेत. पालघर मॉब लिंचिंगच्या घटनेनंतर काल त्या प्रकरणाचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल झाल्यानंतर दशनाम गोसावी (गोस्वामी) समाज पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. या समाजातील सामान्य माणूस आजही पालात आणि झोपडीत हलाखीचे जीवन जगत आहेत. हा सामान्य माणूस शिक्षणाच्या प्रवाहात आला तरच अशा मॉब लिंचिंगच्या घटना थांबवता येतील. 

नऊ मे 2012 रोजी नागपूरच्या कळमना-नेताजीनगर परिसरात संशयातून तीन भिक्षेकऱ्यांना ठेचून मारले होते. त्यानंतर नाथजोगी समाज चर्चेत आला. पालात आणि झोपडीत जीवन व्यतिथ करणारा हा समाज बेष बदलून भीक्षा मागून उदरनिर्वाह करतो. थोडक्‍यात बहुरुपींसारखे यांचे काम आहे. मे महिन्यातील नागपूरचे ते उन्ह... त्यावेळी बाईच्या वेषात काही लोक फिरून महिला आणि मुलींवर अत्याचार करतात. अंगाला ग्रिस लावून येतात. यामुळे हाती सापडत नाहीत. अशा अफवा उडाल्या होत्या. नेताजीनगरातील लोक दिवसभर भटकंती आणि रात्री जागल करून पहारा द्यायचे. अशा स्थितीत एक बाई घरी एकटीच असताना हे भिक्षेकरी तेथे गेले लोकांना वाटले की "त्या' टोळीतील लोक आहेत. पाहता-पाहता जमाव एकत्र झाला आणि हल्ला चढवला. यात तीन जण ठार झाले.

हेही वाचा - मोबाईलसाठी रुसली आणि जीव गमावून बसली...

जुलै 2018 मध्ये धुळे जिल्ह्याच्या राईनपाडा येथे नाथपंथी डवरी समाजातील पाच जण अशाच पागल जमावाच्या संशयाचे शिकार ठरले. अशा कित्येक घटना येथे नमूद करता येतील. मॉब लिंचिंगच्या घटनांमध्ये गुन्हेगार ठरलेल्यांना फाशी किंवा आजीवन कारावास (25 वर्षे) अशी कठोर शिक्षा झाल्याची उदाहरणे सापडत नाहीत. त्यामुळे या घटना टाळणे अद्याप शक्‍य झाले नाही. गड चिंचले गावात नुकत्याच घडलेल्या घटनेनंतर या गुन्ह्यासाठीचे कायदे कठोर करण्याची गरज अधोरेखीत झाली आहे. असे म्हटले जाते की, नदीचे मुळ आणि संतांचे कुळ विचारू नये. परंतु, देशातील दशनाम गोसावी समाजामध्ये या हत्याकांडामुळे प्रचंड असंतोष खदखदत आहे. 

मागच्या वर्षी सप्टेंबर महिन्यात दशनाम गोसावी समाजाची राष्ट्रीय स्तरावरची गोलमेज परिषद "सकाळ' आणि सनातन दशनाम गोसावी समाजाच्या संयुक्त वतीने नागपूर येथे घेण्यात आली. यात देशभरातील मंदिरे, मठ आणि आखाड्यांचे संत, महंत आणि पुजारी सहभागी झाले. सोबतच दशनाम गोसावी समाजातील सामाजिक कार्यकर्ते, अभ्यासक, लेखक, पत्रकार, आंदोलक आणि विविध राजकीय पक्षांत काम करणारे समाजाचे नेते, कार्यकर्ते सहभागी झाले होते. यामध्ये देवधर्म या विषयावर चर्चा झाली असेल, असे कुणालाही वाटेल. पण तसे अजिबात झाले नाही. "युपीएससी-एमपीएससी' परीक्षा आणि अद्ययावत स्टडी सेंटर उभारण्यावर चर्चा झाली.

अधिक माहितीसाठी - राजकारण तापले : दयाशंकर तिवारी म्हणतात, कारवाईसाठी गुंडाला सोबत नेण्याचे कारण काय?

सरकारलाही या समाजाकडे बघण्याची उसंत नाही

या समाजाला केवळ अडीच टक्के आरक्षण आहे. केंद्राच्या यादीत तर ओबीसी प्रवर्गामध्ये समावेश आहे. कोणतीही सरकारी योजना या समाजापर्यंत पोहोचत नाही. समाजाचा सामान्यातला सामान्य माणूस शिक्षणाच्या प्रवाहात आल्याशिवाय सद्यस्थिती बदलता येणार नाही. ही बाब समाजातील महंतांनी हेरली आणि त्यादृष्टीने पावलेदेखील उचलली आहेत. लोकसंख्येने कमी आणि सतत भटकंती करीत असलेल्या या समाजाची व्होट बॅंक नाही. त्यामुळे सरकारलाही या समाजाकडे बघण्याची उसंत नाही, असा आरोप परिषदेत करण्यात आला. 

...तर "मॉब लिंचिंग'च्या घटनांना थारा राहणार नाही

मंदिर आणि मठाची दारे समाजाच्या प्रगतीसाठी खुली करू, अशी आश्‍वासने परिषदेत महंतांनी दिली. या कामी देशातील सर्व समाज संतांनी पुढे आले पाहीजे, असे आवाहनही करण्यात आले. दशनाम गोसावी समाजाच्या गोलमेज परिषदेतील हे आवाहन सर्वच समाज संतांनी अंगिकारले तर एका सुंदर आणि सुदृढ समाजाची निर्मिती झाल्याशिवाय राहणार नाही आणि पालघर, धुळे असो की नागपूर "मॉब लिंचिंग'च्या घटनांना थारा राहणार नाही.

सविस्तर वाचा - 'मैं कैसा बाप हुँ, अपने बच्ची के दुध का भी खर्चा नहीं उठा सकता', अस म्हणत तो मुलीला घेऊन घराबाहेर पडला अन्‌...

शिक्षणाचा अभाव अन्‌ कठोर कायदे नसणे

एक समाज जो शंकराचा उपासक आहे. त्यांच्याकडे शेकडो मंदिरे आणि मठांची जबाबदारी आहे. परंतु, या समाजातील सामान्य माणूस कित्येक वर्षांपासून "मॉब लिंचिंग'चा शिकार ठरतो आहे. पालघरमधील डहाणूच्या गड चिंचले गावाजवळ केवळ संशयातून दोन साधू आणि त्यांच्या वाहनचालकाला तीन महिन्यांपूर्वी ठार मारले होते. होय... दशनाम गोसावी (गोस्वामी) या समाजातील ते महंत होते. यापूर्वी नागपुरातील कळमना येथे आणि त्यानंतर धुळे जिल्ह्यातील राईनपाडा येथे अशाच पिसाळलेल्या झुंडांनी एकूण आठ लोकांना ठार मारले. या समाजावर अशी वेळ का यावी, या प्रश्‍नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला असता, या समाजात शिक्षणाचा अभाव आणि अशा गुन्ह्यांसाठी कठोर कायदे नसणे, ही बाब पुढे आली. 

संपादन - नीलेश डाखोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dashnam Gosavi Samaj once again in discussion