गादा ग्रामपंचायत उपसरपंचाच्या पुतण्याचा संशयास्पद मृत्यू 

सतीश डहाट
Monday, 21 December 2020

नागपूर जबलपूर राष्ट्रीय महामार्गावरील गादा शिवारातील रंगारी धाब्याच्या मागच्या बाजूला सर्विस रोडला लागून गादा येथील येथील उपसरपंच मधुकर ठाकरे यांचा पुतण्या मंगेश आनंदराव ठाकरे (30) हा संशयास्पद स्थितीत मृत अवस्थेत पडून होता.

कामठी (जि. नागपूर) : स्थानिक नवीन कामठी पोलिस स्टेशन हद्दीत येणाऱ्या गादा ग्रामपंचायतीचे उपसरपंच मधुकर ठाकरे यांच्या पुतण्याचा गत मध्यरात्री नागपूर जबलपूर राष्ट्रीय महामार्गावरील रिंगरोडवर सर्विस रोडच्या बाजूला मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली. मृत्यूचे कारण कळू शकले नसल्याने सदर मृत्यू प्रकरण संशयाच्या भोवऱ्यात आहे. 

मृत अविवाहित असून त्याचे नाव मंगेश आनंदराव ठाकरे (वय 30, रा. गादा, तालुका कामठी) असे आहे. ही घटना सोमवार (ता. २१) च्या पहाटे दोनच्या सुमारास उघडकीस आली.  नवीन कामठी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नागपूर जबलपूर राष्ट्रीय महामार्गावरील गादा शिवारातील रंगारी धाब्याच्या मागच्या बाजूला सर्विस रोडला लागून गादा येथील येथील उपसरपंच मधुकर ठाकरे यांचा पुतण्या मंगेश आनंदराव ठाकरे (30) हा संशयास्पद स्थितीत मृत अवस्थेत पडून होता.

त्याच्या शेजारी त्याची  हिरो होंडा मोटारसायकल क्रमांक एम एच 40 बीडी 7161 उभी होती. मध्यरात्री दोन वाजता सुमारास मार्गाने जाणाऱ्या व्यक्तीने नागपूर पोलिस आयुक्त कंट्रोल रूमला गादा शिवारात तरुण मृत अवस्थेत पडून असल्याची माहिती दिली असता त्यांनी लगेच नवीन कामठी पोलिस स्टेशनला माहिती दिली.

जाणून घ्या - "जीवनाला कंटाळलो आहे" असं म्हणत युवक थेट चढला रेल्वेच्या डब्यावर अन् घडला अंगावर काटे आणणारा थरार
 

त्यानुसार नवीन कामठी पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक एस. नरोटे व सहकारी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला असता त्याच्या खिशात आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स व मोटारसायकल घटनास्थळी दिसून आल्याने लगेच पोलिसांनी गादा गावात येऊन माहिती दिली. 

मंगेश ठाकरे यांचे प्रेत असल्याचे माहीत होताच गादा गावात शोककळा पसरली. मंगेश सिमेंट मिक्सर कंपनीमध्ये गाडी चालवण्याचे काम करीत होता रविवारी सकाळी कामावर जात असल्याचे घरच्यांना सांगून निघून गेला होता रात्र झाली तरी तो घरी परत न आल्याने  घरच्यांना वाटले की तो कामावर असेल असे समजून दुसऱ्या दिवशी घरी परत येईल असे वाटत असताना मध्यरात्री पोलिस त्यांचे घरी धडकल्याने खळबळ उडाली.

लगेच त्याच्या कुटुंबातील सदस्यांनी घटनास्थळी जाऊन त्याची ओळख पटविली. पोलिसांनी पंचनामा करून प्रेत उत्तरीय तपासणीसाठी
नागपूरच्या मेडिकल कॉलेज रुग्णालयात  पाठवण्यात आले. नवीन कामठी पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद केली असून, पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक एस. नरोटे करीत आहेत.

संपादन : अतुल मांगे 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Death of a young man in Kamathi area