आता महाविद्यालयांमध्ये पदवी प्रवेश होणार ऑनलाइन

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जून 2020

दोन वर्षांपूर्वी विद्यापीठाकडून पदवी अभ्यासक्रमाचे ऑनलाइन प्रवेश करण्यावर बरीच चर्चा रंगली होती. मात्र, त्या वेळी महाविद्यालयांचा विरोध आणि इतक्‍या प्रमाणात असलेल्या विषयांमुळे ही प्रक्रिया थंडबस्त्यात पडली. 

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर प्रवेशाप्रमाणेच आता महाविद्यालयांमध्ये होणारे पदवी प्रवेश ऑनलाइन पद्धतीने करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आल्याचे समजते. विशेष म्हणजे, ऑनलाइन प्रवेशासाठी विद्यापीठाने आराखडा तयार केला आहे. 

दरवर्षी विद्यापीठाच्या विविध विभागांतील प्रवेश ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येतात. यासाठी विद्यापीठस्तरावर समिती तयार करण्यात येते. विद्यापीठाशी 504 महाविद्यालये संलग्नित आहेत. यामध्ये विविध शाखा आणि अभ्यासक्रमांचा समावेश आहे. गेल्या दोन वर्षांपूर्वी विद्यापीठाकडून पदवी अभ्यासक्रमाचे ऑनलाइन प्रवेश करण्यावर बरीच चर्चा रंगली होती. मात्र, त्या वेळी महाविद्यालयांचा विरोध आणि इतक्‍या प्रमाणात असलेल्या विषयांमुळे ही प्रक्रिया थंडबस्त्यात पडली. 

दरम्यान, आता प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. एस. आर. चौधरी यांनी याबाबत आराखडा तयार केला आहे. मात्र, अद्याप यावर निर्णय व्हायचा असून व्यवस्थापन आणि विद्वत परिषदेची परवानगी मिळायची आहे. मात्र, ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविल्यास कमी प्रमाणात कर्मचारी वापरता येणे शक्‍य होणार आहे. 

अशी होईल प्रवेश प्रक्रिया 
बारावीचा निकाल लागताच पदवी प्रवेश सुरू होतात. यासाठी विद्यापीठाच्या पोर्टलवर विद्यार्थ्यांना नोंदणी करावी लागणार आहे. पंधरा दिवस विद्यार्थ्यांना नोंदणी करता येईल. नोंदणी करताना विद्यार्थ्यांना त्यासाठी लागणारी सर्वच कागदपत्रे अपलोड करावी लागणार आहे. नोंदणी होताच विद्यार्थ्यांना एक नोंदणी क्रमांक मिळेल. नोंदणी संपल्यावर दोन दिवसांनी गुणवत्ता यादी प्रकाशित करण्यात येईल.

या यादीनुसार त्या-त्या महाविद्यालयात विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यावयाचा आहे. तत्पूर्वी, महाविद्यालयात विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष आणि ऑनलाइन पद्धतीने कागदपत्राची तपासणी करावी लागणार आहे. तपासणी होताच, विद्यार्थ्याचा प्रवेश निश्‍चित होऊन त्याला प्रवेश देण्यात येईल. यासाठी फेरीची पद्धतही विद्यापीठाकडून राबविण्यात येईल. 

हेही वाचा : अगर जिंदा छोडा तो तेरा गेम कर दूंगा...आणि नंतर घडले हे... 

असा होईल फायदा 
विद्यापीठाद्वारे राबविण्यात येणाऱ्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत बराच वेळ वाचणार असून कमी प्रमाणात मनुष्यबळाचा उपयोग होईल. याशिवाय प्रवेशाचे लाइव्ह अपडेट विद्यापीठाला मिळेल. तसेच एका महिन्यात इनरॉलमेंटची प्रक्रिया होईल. 
     


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Degree admission will be online