एकीकडे गर्लफ्रेंड दुसरीकडे पत्नी, वाचा नागपुरातून पळून गेलेल्या कुख्यात कैद्याची लिला

prince
prince

नागपूर : मध्यवर्ती कारागृहातील कैदी सिजो चंद्रन उर्फ प्रिन्स नाडार याने रूग्णालयात उपचार घेत असताना पोलिसांना गुंगारा देऊन पळ काढला होता. मात्र, तब्बल नऊ दिवसांनंतर दिल्ली पोलिसांनी त्याला घरातून अटक केली. गुन्हे शाखेने त्याला ताब्यात घेतले असून पुन्हा कारागृहात डांबणार आहेत. त्याने दिल्ली कशी गाठली याबाबत मात्र मोठे तर्कवितर्क लावण्यात येत आहेत.
 प्रिन्स नाडार याच्याविरुद्ध प्रेयसीवर गोळीबार, फसवणूक, अपहरणासह अनेक गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. नडार व त्याच्याविरुद्ध मोकोकाअंतर्गत कारवाई करण्यात आली होती.

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मध्यवर्ती कारागृहात मूळचा दिल्ली येथील रहिवासी असलेला प्रिन्स हा कुख्यात कैदी गेल्या काही वर्षापासून शिक्षा भोगत होता. त्याला टीबीचा आजार जडला असून गेल्या काही दिवसापूर्वी मेडिकल हॉस्पिटल अंतर्गत येत असलेल्या टीबी वार्डात उपचारासाठी मध्यवर्ती कारागृह प्रशासनाने पोलिस सुरक्षा व्यवस्थेसह भरती केले होते.16 मे ला पहाटेच्या सुमारास तो त्याच्या वॉर्डातून पोलिसांना गुंगारा देऊन पळून गेला होता. घटना उघडकीस येताच खळबळ उडाली होती.

इमामवाडा आणि क्राईम ब्रॅंचचे चार पथके आरोपीच्या शोधासाठी रवाना झाले होते. मात्र, मूळचा दिल्लीचा असलेला प्रिन्स हा घराकडे नक्‍की जाणार याची कल्पना नागपूर पोलिसांना होती. त्यांनी दिल्ली पोलिसांना याबाबत माहिती दिली होती. फोटो पाठविला होता. त्यावरून दिल्ली पोलिसांनी प्रिन्सवर पाळत ठेवली आणि त्याला सापळ्यात अडकताच अटक केली. तो घरात पत्नीसोबत जेवण करीत होता. दरम्यान पोलिस घरात धडकले. त्याला सध्या नागपूर गुन्हे शाखेने ताब्यात घेतले असून बुधवारी सायंकाळपर्यंत त्याला नागपुरात आणण्यात येणार आहे.
 
प्रिन्स आहे चतूर कैदी
कुख्यात कैदी प्रिन्स याच्यावर अपहरण, खंडणी, प्रेयसीवर गोळीबार आणि फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत. तो मूळचा दिल्ली राज्यातील आहे. 7 जुलै 2019 ला त्याने सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असताना पळ काढला होता. तेव्हा क्राइम ब्रांचने प्रिन्सला केरळ राज्यातील त्याच्या एका मित्राच्या शेतातून अटक केली होती. त्यामुळे पोलिसांना गुंगारा कसा द्यावा यामध्ये तो पटाईत आहे.
 
प्रिन्सने केला गर्लफ्रेंडवर गोळीबार
प्रिन्स चंद्रन यांची गर्लफ्रेंड होती. फेसबूकवरून तिची ओळख झाली होती. त्यानंतर दोघे प्रेमात अडकले होते. त्या महिलेला त्याने पैसा, सोन्याचे दागिने दिले होते. परंतु, तिचा अन्य एकाशी अनैतिक संबंध होते. त्याबाबत प्रिन्सला माहिती मिळाली. त्यामुळे त्याने 2012 मध्ये अमरावती मार्गावरील धामना भागात प्रेयसीला गोळी घालून ठार करण्याचा प्रयत्न केला. त्याची प्रेयसी जखमी झाली होती. याप्रकरणी हिंगणा पोलिसांनी प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली होती. प्रेयसीच्या तक्रारीवरून पाचपावली पोलिस स्टेशनमध्येही त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता.
 
कसा पोहचला दिल्ली
सिजो चंद्रन याने मेडिकल चौकातून थेट अमरावती रोड गाठला. तेथून एका ट्रकला हात दाखवून काही अंतर गाठले. तो ट्रक एका ठिकाणी थांबल्यानंतर चंद्रनने ट्रक सोडला आणि अन्य एका टॅंकरला हात दाखवून मध्यप्रदेशातील छिंदवाडा शहर गाठले. तेथून एका व्यक्‍तीच्या मदतीने तो स्वतःच्या घरी दिल्लीला पोहचला. ट्रक आणि खासगी वाहनांना लिफ्ट मागून तो दिल्ली शहरात पोहचला असावा, अशी माहिती पोलिसांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com