देवेंद्र फडणवीस शहरात ठोकणार तळ; कोरोनाचा आढावा की पदवीधर मतदारसंघ निवडणुकीवर लक्ष?

राजेश प्रायकर
Monday, 21 September 2020

महापौर संदीप जोशी यांनी वाढदिवसाला महापालिकेची निवडणूक यापुढे लढणार नसल्याची घोषणा करीत उमेदवारीचे संकेत दिले होते. त्यामुळे या निवडणुकीच्या रणनीतीवरही चर्चा होण्याची शक्यता आहे.

नागपूर : विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सोमवारी शहरात येण्याची शक्यता असून, पुढील चार दिवस ते येथे तळ ठोकणार आहे. शहरातील कोरोना स्थितीच्या आढाव्यानिमित्त ते शहरात येत असले तरी पदवीधर मतदारसंघातील पक्षाच्या उमेदवार ते पक्ष पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करणार असल्याचे समजते.

मागील ऑगस्टमध्ये त्यांनी महापालिकेत शहरातील कोरोना स्थितीचा आढावा घेतला होता. त्या बैठकीत त्यांनी सप्टेंबरमध्ये बाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढण्याचे भाकीत करीत महापालिकेला चाचण्या वाढविण्याची सूचना केली होती. महिनाभराने पुन्हा ते कोरोना स्थितीचा आढावा घेणार आहेत. ते चार दिवस शहरात राहणार असल्याचे भाजपच्या एका पदाधिकाऱ्याने नमूद केले.

अधिक वाचा - रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी औषधे विकत घेऊ नका; आहारतज्ज्ञ डॉ. जयश्री पेंढारकर यांचा सल्ला

आढावा बैठकीसोबतच ते येणाऱ्या पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसंदर्भातही भाजप पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करणार असल्याचे सूत्राने सांगितले. प्रा. अनिल सोले यांचा कार्यकाळ संपुष्टात आल्यानंतर कुणाला उमेदवारी मिळणार, याबाबत उत्सुकता आहे. यात महापौर संदीप जोशी यांचे नाव आघाडीवर आहे. महापौर संदीप जोशी यांनीही वाढदिवसाला महापालिकेची निवडणूक यापुढे लढणार नसल्याची घोषणा करीत उमेदवारीचे संकेत दिले होते. त्यामुळे या निवडणुकीच्या रणनीतीवरही चर्चा होण्याची शक्यता आहे.

भाजपची डागाळलेली प्रतिमा सुधारणार?

ऐन कोरोनाच्या काळात तुकाराम मुंढे यांची आयुक्तपदावरून बदली झाल्याने शहरातील बहुसंख्य नागरिक महापालिकेतील सत्ताधाऱ्यांवर नाराज आहेत. ही नाराजी सोशल मीडियावरून स्पष्टपणे दिसून येत आहे. नेटकरी उघडपणे पदाधिकाऱ्यांवर संताप व्यक्त करीत आहेत. या प्रकरणात भाजपची प्रतिमा चांगलीच डागाळली आहे. पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीवर नाराजीचा परिणाम होऊ नये, यासाठी भाजपची डागाळलेली प्रतिमा सावरण्यावर फडणवीस भर देतात काय, याकडेही अनेकांचे लक्ष लागले आहे.

संपादन - नीलेश डाखोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Devendra Fadnavis will review the Corona situation