धानला आरोग्य केंद्राच्या उद्घाटनाचा मुहूर्त निघेना, टेकचंद सावरकरांच्या गावात आरोग्यसेवेविना रुग्णांचे हाल

dhanla primary health center building still not inaugurated in kodamendhi of nagpur
dhanla primary health center building still not inaugurated in kodamendhi of nagpur

कोदामेंढी (जि. नागपूर): परिसरातील रुग्णांच्या सोईसाठी कोट्यवधी रुपये खर्च करून धानला येथे प्रशस्त अशी इमारत तयार करण्यात आली. आरोग्य इमारतीचे बांधकाम होऊन दोन वर्षांचा कालावधी झाला. बांधकामात असलेले दोष देखील दुरुस्त करण्यात आले. कोरोना महामारीच्या काळात देखील आरोग्य विभागाला मुहूर्त सापडला नाही. गावात आमदार आहेत. जिल्हा परिषदेचे कृषी सभापती त्याचबरोबर निशा सावरकर या जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष होत्या. त्याच काळात बांधकाम पूर्णत्वास आले. मात्र, अद्याप येथे आरोग्याच्या सुविधा सुरू न झाल्याची खंत ग्रामस्थ व्यक्त करत आहेत. 

करोडो रुपये खर्च करून आरोग्य केंद्राची इमारत तयार झाली. दोन वर्ष होऊन देखील येथे आरोग्याची सुविधा मिळत नसेल तर काय म्हणावे. मौदा तालुक्यातील धानला गाव. राजकीय वारसा आणि मोठमोठया पदावर आरूढ असेलेले नेते या गावात आहेत. विशेष म्हणजे आमदार टेकचंद सावरकर देखील ह्याच गावातील. परिसरातील पंधरा वीस गावातील रुग्णांना येथे उपचार आणि औषोधोपचार मिळेल, असे वाटले होते. मात्र, दोन वर्षांपासून येथील आरोग्याची इमारत उभी आहे. कोरोनाच्या महामारीत तर या भागातील रुग्णांना चांगलीच कसरत करावी लागली. आरोग्याची सुविधा आता तरी मिळेल, असे वाटले होते. मात्र, आड येते येथील राजकारण असे म्हणणे वावगे ठरणार नाही. 

धानला येथील आरोग्य केंद्र सुरू होऊन आरोग्याची सुविधा मिळावी, यासाठी किसान अधिकार मंचच्या कार्यकर्त्यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे, जिल्हा आरोग्य अधिकारी याबरोबरच मुख्यमंत्री कक्षात देखील पाठपुरावा केला. मात्र, त्यामधून काहीच निष्पन्न झाले नाही. अखेर तहसीलदार आणि मौदा पोलीस ठाणे यांना आंदोलनाबाबत निवेदन देऊन मंगळवारी आंदोलन करण्यात आले. घोषणाबाजी करत शासनाचा निषेध करण्यात आला. आंदोलनस्थळी पोलिसही तैनात करण्यात आले होते. अडीच तासानंतर तालुका आरोग्य अधिकारी रुपेश नारनवरे यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन ग्रामस्थ आणि किसान अधिकार मंचच्या मागण्या ऐकून घेतल्या. यावेळी किसान अधिकार मंचचे मुख्य संयोजक राम वाडीभस्मे, शेखर घाटोळे, राजेश राजगिरे, दिनेश ठोंबरे, चेतन मेश्राम, तुषार कीरपान, अविरत तिरबुडे, सुरज डहाके, राहुल कुंभारे, ईश्वर सावरकर, सुखदेव पत्रे, संजय वंजारी, गौतम मेश्राम, भास्कर पत्रे, किरण धांडे आदीसह बरेच उपस्थित होते. 

डोळ्यात जाळं तयार झालंय, पण गावात दवाखानाच नाही -
७५ वर्षीय वृद्ध देखील या आंदोलनात सहभागी होते. डोळ्यात जाळं तयार झालं आहे. दवाखाना सुरू झाला असता तर दाखवले असते. आजारी पडलो तर आम्हाला भंडारा आणि मौद्याला जावे लागते. पोरांनो लवकर दवाखाना सुरू करा. 
- महादेव वैद्य, धानला 

आमच्याकडे इमारत हस्तांतरण झालेली नाही. काही काम बाकी आहे. तुमच्या मागण्या वरिष्ठांकडे कळवितो. काय तोडगा काढता येईल बघतो, असे तालुका आरोग्य अधिकारी रुपेश नारनवरे म्हणाले.

फर्निचरचे काम न झाल्याने विलंब -

मौदा येथील ग्रामीण रुग्णालय बनल्याने तेथील प्राथमिक आरोग्य केंद्र चिरव्हा येथे स्थलांतरित करण्यात आले. नव्याने आरोग्य केंद्र मंजुरीसाठी शासनाकडे पाठपुरावा केला आहे. सध्या कंत्राटी पद्धतीने पदभरती करून सुरू करण्यात येईल. फर्निचरचे काम कंत्राटदाराने अद्याप केले नसल्याने विलंब होत आहे. 
- तापेश्वर वैध, कृषी सभापती जि. प. नागपूर 

संपादन - भाग्यश्री राऊत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com