धक्‍कादायक...साडेसात कोटी भारतीय मधुमेहाच्या उंबरठ्यावर 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 डिसेंबर 2019

उशिरा निदान झाल्याने 93 टक्के रुग्णांना तत्काळ औषधे सुरू करावी लागतात. त्यापैकी 48 टक्के मधुमेही औषधे घ्यायला विसरतात.

नागपूर : टाइप वन प्रकारातील मधुमेह अनुवंशिकरीत्या होण्याची जोखीम असते. मात्र, दुसऱ्या प्रकारातला मधुमेह जीवनशैलीमुळे अकालीच विळख्यात घेतो. मधुमेह आजार उच्च रक्तदाब, हृदयविकार, मस्तिष्कघात, अंधत्व आणि अपंगत्वाला सोबत घेऊन येतो. भारतात मधुमेहींचा आकडा साडेसात कोटींवर पोहोचला असून तितकीच लोकसंख्या या आजाराच्या उंबरठ्यावर आहे. त्यांना वाचविण्याचे आव्हान भविष्यात उभे ठाकले आहे, असे जागतिक मधुमेह फेडरेशनतर्फे प्रकाशित अहवालातून पुढे आले आहे. 

डिसेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात दरवर्षी फेडरेशनतर्फे मधुमेहावर अभ्यासपूर्ण संशोधन प्रकाशित केले जाते. भविष्यात मधुमेहाच्या उंबरठ्यावरील व्यक्तींनी जीवनशैलीत बदल करून त्यांना मधुमेहाच्या विळख्यापासून वाचविण्याचा प्रयत्न केला जातो, असे प्रसिद्ध मधुमेहीतज्ज्ञ डॉ. सुनील गुप्ता यांनी सांगितले.

अधिक माहितीसाठी - आता चिअर्सला नों लिमिट, या अल्कोहलचा लागला शोध
 

उशिरा निदान झाल्याने 93 टक्के रुग्णांना तत्काळ औषधे सुरू करावी लागतात. त्यापैकी 48 टक्के मधुमेही औषधे घ्यायला विसरतात. आणखी चिंतेची बाब म्हणजे पूर्वी पन्नाशीनंतर येणाऱ्या या आजाराचे वय आता कमी झाले आहे. त्यामुळे अवघ्या 15 व्या वर्षीदेखील आता मधुमेह दार ठोठावू लागला आहे. 
 

किडनीवर परिणाम

 सात वर्षांपेक्षा अधिक कालावधीपासून मधुमेह व्यवस्थापनात हलगर्जी झाल्यास किडनी निकामी होण्याची भीती असते. तसेच नसांची हानी झाल्याचे दिसून येते. अंधत्व आणि हृदयविकार तसेच स्ट्रोकची जोखीम असते. दीर्घ काळ मधुमेहानंतर हृदयविकाराने दगावणाऱ्यांचे प्रमाण 70 टक्के आहे. अकाली अपंगत्व येणाऱ्यांपैकी 85 टक्के व्यक्ती या मधुमेही असतात. याकडे दुर्लक्ष केल्याने सरासरी 35 टक्के जणांना अकाली अंधत्वदेखील येते. जीवनशैलीशी निगडित मधुमेहाच्या उंबरठ्यावरील 54 टक्के लोकांना या आजारापासून वाचविता येते, असे डॉ. गुप्ता म्हणाले.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: diabetes news about Indians