व्हीएनआयटीत उभारणार तंत्रज्ञान संशोधन व उत्कृष्टता केंद्र

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 20 जानेवारी 2020

व्हीएनआयटीच्या मदतीने तंत्रज्ञान संशोधन व उत्कृष्टता केंद्र उभारण्यात येणार आहे. या केंद्राच्या माध्यमातून लघु उद्योगांना प्रोत्साहन देणे, संशोधनाला मदत करणे तसेच नवउद्योजकांना मदत केली जाणार आहे. या केंद्राच्या स्थापनेमुळे नागपूर आणि विदर्भातील लघु उद्योगांना चालना मिळेल, असा विश्‍वास गडकरी यांनी व्यक्त केला.

नागपूर : राष्ट्रीय अग्निशमन महाविद्यालयाची 14 एकर जागा आहे. या जागेचे केंद्रीय सूक्ष्म लघु मंत्रालयामार्फत संपादन करून तिथे तंत्रज्ञान संशोधन व उत्कृष्टता केंद्र स्थापन करण्यात येणार आहे. त्यासाठी 200 कोटी रुपयांची तरतूद करणार असल्याची घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली. यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र दिले असल्याची माहिती त्यांनी दिली.

विश्‍वेश्‍वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेच्या (व्हीएनआयटी) हीरक महोत्सवाच्या उद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमात संस्थेचे संचालक डॉ. पडोळे, प्रशासकीय मंडळाचे संचालक डॉ. विश्राम जामदार, संस्थेचे माजी प्राचार्य डॉ. एम. बसोले उपस्थित होते.
अग्निशमन महाविद्यालयाचा नवीन शैक्षणिक परिसर मानकापूर येथे झाला आहे. त्यामुळे राष्ट्रीय अग्निशमन महाविद्यालयाची व्हीएनआयटीसमोरील 14 एकर जागा व्हीएनआयटीला देण्यासंदर्भात विश्राम जामदार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना नुकताच प्रस्ताव दिला. मात्र, व्हीएनआयटीला जागा देताना अनेक अडचणी येऊ शकतात. त्यामुळे नितीन गडकरी यांनी यामध्ये स्वत: हस्तक्षेप करीत ही जागा केंद्रीय सूक्ष्म लघु मंत्रालयाकडे मागून घेतली. या जागेवर व्हीएनआयटीच्या मदतीने तंत्रज्ञान संशोधन व उत्कृष्टता केंद्र उभारण्यात येणार आहे. या केंद्राच्या माध्यमातून लघु उद्योगांना प्रोत्साहन देणे, संशोधनाला मदत करणे तसेच नवउद्योजकांना मदत केली जाणार आहे. या केंद्राच्या स्थापनेमुळे नागपूर आणि विदर्भातील लघु उद्योगांना चालना मिळेल, असा विश्‍वास गडकरी यांनी व्यक्त केला. हीरक महोत्सवानिमित्त गडकरींच्या हस्ते सर विश्‍वेश्‍वरय्या यांचा 10 फूट उंच कांस्य पुतळा, "चंद्रमा प्लाझा', फुटबॉल ग्राउंड, दोन टेनिस कोर्टचे उद्‌घाटन करण्यात आले.

सविस्तर वाचा - आईने बाळाला वॉकरमध्ये ठेवले अन झाला घात
व्हीएनआयटीमध्ये हीरक महोत्सवाप्रसंगी वर्षभर शैक्षणिक उपक्रम, कार्यशाळा, अतिथी व्याख्याने, संशोधन व विस्तार उपक्रम राबवले जाणार आहेत, अशी माहिती संचालक डॉ. पडोळे यांनी प्रास्ताविकातून दिली. संस्थेच्या विकासकामात मदत करणाऱ्या माजी विद्यार्थ्यांच्या बॅचचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

कच्च्या मालावर संशोधनास संस्थांचे साहाय्य हवे
विदर्भात वनोपज, कोळसा यासारख्या साधनसंपत्तीचा मुबलक साठा आहे. या कच्च्या मालावर संशोधन करण्यासाठी नागपुरातील व्हीएनआयटी आणि एलआयटी (लक्ष्मीनारायण तंत्रज्ञान संस्था) यासारख्या संशोधन संस्थांनी साहाय्य करणे आवश्‍यक आहे. मात्र, स्थानिक संस्थाचे या विकासकार्यात सहकार्य मिळत नाही, अशी खंत गडकरींनी व्यक्त केली. येत्या काळात भारताला ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था उभी करायची आहे. त्यासाठी आयात कमी करून निर्यात वाढवावी लागेल. त्यामुळे देशाच्या विकासासाठी स्थानिक संस्थांनी योगदान द्यावे, असे आवाहनही गडकरींनी केले.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Diamond jubilly of VNIT Nagpur