आता तज्ज्ञांच्या नियुक्तीचे आव्हान, 'सुपर'च्या हृदय प्रत्यारोपण केंद्राचा मार्ग मोकळा

director of health give permission to heart transplant unit in super specialty hospital nagpur
director of health give permission to heart transplant unit in super specialty hospital nagpur

नागपूर : सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलला आरोग्य विभागाच्या संचालक कार्यालयातून हृदयरोग प्रत्यारोपण युनिट उभारण्याची परवानगी मंगळवारी(ता.१९) प्राप्त झाली आहे. यामुळे हे केंद्र उभारण्याचा मार्ग मोकळा झाला असला तरी हृदयरोग प्रत्यारोपण तज्ज्ञांच्या नियुक्तीचे आव्हान आता उभे ठाकले आहे. मात्र, यावर मात करण्याचा दावा सुपर प्रशासनाने केला आहे. 

राज्यात पुणे, मुंबई, औरंगाबाद आणि नागपूर येथील खासगी रुग्णालयात ह्रदय प्रत्यारोपणाच्या सुविधा उपलब्ध आहेत. नुकतेच मेडिकल-सुपरचे अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा यांनी अधिष्ठाता पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर हृदय प्रत्यारोपण युनिट उभारण्याचा संकल्प केला. त्यानुसार त्यांनी परवानगीसाठी अर्ज केला. त्यावेळी ह्रदय शल्यक्रिया विभागाचे प्रमुख डॉ. निकुंज पवार यांची मदत झाली होती. आरोग्य संचालक कार्यालयाकडे प्रस्ताव सादर केला होता. त्यावेळी नागपुरातील ह्रदय प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉ. आनंद संचेती आणि सुपरमध्ये कार्यरत डॉ. निकुंज पवार यांनी सेवा देणार असल्याचे दर्शविले होते. दरम्यान, डॉ. निकुंज पवार कंत्राटी पद्धतीवर सुपरमध्ये सेवा देत होते. मात्र, तीन वर्षांपासून शासकीय सेवेतून दूर असलेले डॉ. सतीश दास यांची बदली सुपरमध्ये झाली. त्यानंतर डॉ. पवार यांनी सुपर सोडले. मात्र, मंगळवारी आरोग्य विभागाकडून युनिट उभारण्यास मंजुरी मिळाली असल्याचे पत्र प्राप्त झाले. यामुळे अधिष्ठाता डॉ. मित्रा यांनी तज्ज्ञांशी संवाद सुरू केला आहे. 

तज्ज्ञ डॉक्टरांचा पेच -
प्रस्ताव सादर करताना सुपरमध्ये हृदय शल्य चिकित्सक डॉ. निकुंज पवार कार्यरत होते. ते सोडून गेले असले तरी डॉ. पवार यांना नियुक्तीचे आदेश देण्यास प्रशासन तयार आहे. याशिवाय सुपर स्पेशालिटीला त्यावेळी हृदय प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉ. आनंद संचेती यांनी सेवा देण्याचा शब्द दिला होता. अधिष्ठाता डॉ. मित्रा यांच्यासमोर खरे आव्हान हृदय प्रत्यारोपण तज्ज्ञांची नियुक्ती करण्याचे आहे. प्रत्यारोपणासाठी आवश्यक यंत्र सामग्रीचा निधी हाफकिनकडे वळता केला होता. डायलिसीस यंत्रासह हृदयाच्या ठोक्यांचा अचूक वेध घेणारे 'इग्मो', नायट्रिक ऑक्‍साइड व्हेंटिलेटर अद्यापही हाफकिनने खरेदी केले नाही. 

सुपरमध्ये ह्रदय प्रत्यारोपण युनिट उभारण्याची परवानगी मिळाली आहे. आता हृदय प्रत्यारोपण तज्ज्ञांच्या नियुक्तीसंदर्भात विचार करण्यात येत असून नियुक्ती लवकरच होईल. डॉ. निकुंज पवार हे देखील रुजू होतील. या केंद्रामुळे मध्य भारतातील गरीब रुग्णांना लाभ होईल. तसेच हृदयरोग विभागात तज्ज्ञ डॉक्टरही तयार होतील. 
- डॉ. सजल मित्रा, अधिष्ठाता, मेडिकल 


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com