जगण्या, जगवण्याचा ध्यास : पायात नाही बळ; मात्र, हाती घेतले ई-रिक्षाचे स्टेअरिंग

The disabled woman took the steering wheel of the e-rickshaw
The disabled woman took the steering wheel of the e-rickshaw

नागपूर : अवघ्या सहा वर्षांची असताना पोलिओने पायातील शक्ती हिरावली. आयुष्यभराचे दिव्यांगत्व नशिबी आले. पायाच्या बळावर सरळ चालता येत नाही. यामुळे जगण्याला अर्थ नाही, हा न्युनगंड मनात आला. परंतु, आयुष्य जगताना गुणी माणसं भेटत गेली आणि मनातील हताशपणा कायमचा दूर गेला. आता स्वतःचा संसार सुरू झाला. स्वतःला आता अपंग समजत नाही. पती आणि लेकरांचा सांभाळ करण्यासाठी तिने हातात ई-रिक्षा घेतली. आता पायात बळ नसल्याने कोणतेच काम अडत नाही, असे घरातील खुद्द आरसाच सांगतो.

फक्त ई-रिक्षा घेऊन निघाल्यानंतर सवारी भेटावी ही एकच इच्छा मनात असते. दिव्यांगापुढे लाचार न होता जिद्द आणि चिकाटीची दिव्यदृष्टी घेऊन जगण्याचा खडतर प्रवास करणारी ही माय कुटुंबासाठी स्वयंसिद्धा ठरली. वयाच्या पन्नाशीजवळ पोहोचलेल्या या स्वयंसिद्ध महिलेचे नाव योगीता राजू डोंगरे. त्या धंतोली येथे राहतात.

पती राजू डोंगरे अपंग. नोकरी नाही. कोणाला शपथपत्र, उत्पन्नाचे प्रमाणपत्र लागत असल्यास जिल्ह्यातून काढून देण्यासाठी मदत करतात. रोज काम मिळेल असेही नाही. त्यातच संसारवेलीवर उमलेला गोड रियांक सात वर्षांचा झाला आहे. त्याला शिकवून मोठे करणे हेच या दाम्पत्याचे ध्येय. कोरोनाच्या या बिकट परिस्थितीत सहा महिने ई-रिक्षा बंद होती. आताही सवारी मिळत नाही. परंतु, जगण्या आणि जगवण्याचा ध्यास घेऊन ही स्वयंसिद्धा निघाली आहे.

दिव्‍यांग असूनही कोणावर ओझे न बनता ती कायमच स्वावलंबी आहे. हातात ई-रिक्षा नव्हती त्यावेळी महापालिकेच्या शाळेत खिचडी पुरवण्याचे काम करायची. त्यातून होत असलेल्या मिळकतीतून संसार सुरू होता. परंतु, शाळा बंद पडल्यामुळे व्यवसाय गेला. पती राजूही घरातच. अशा बिकट अवस्थेत लेडिज कपडे विकण्याचाही व्यवसाय करीत असल्याचे योगिताताई सांगतात.

दारिद्र्याने सजलेली जिंदगी

जीवनाचं हिरवं स्वप्न उराशी बाळगले आहे. ते पूर्ण करण्याची धडपड दाम्पत्याची सुरू आहे. ई-रिक्षा चालवताना सवारी मिळातील तर घरातील सांज भागते, नाहीतर काय होईल, कळत नाही. परंतु, अशाही स्थितीत रंजलेली गांजलेली दारिद्र्याने सजलेली जिंदगी सावरताना योगीता डोळ्यांत अश्रू येऊ देत नाही. संसाराचा गाढा ओढताना अनंत दुःख झेलताना सात वर्षांच्या ‘रियांक’च्या हाती उजेड देण्याचा ध्यास या मातेने घेतला आहे. लेकराले सायेब बनवण्यासाठी जीवाचा आटापिटा करण्यासाठी ही माय तयार आहे, त्या स्वयंसिद्धा मातेला सलाम.

सवारी मिळावी हीच इच्छा
पती राजू डोंगरे जिल्ह्यात जात होते. मी कपडे विकत होती. परंतु, कोरोनाने गरिबांच्या जगण्यावरच घाव घातला. ई-रिक्षा घेऊन निघते. परंतु, सवारीच्या प्रतीक्षेत असते. सवारी मिळावी हीच इच्छा मनात असते. कोणाला माझ्या ई-रिक्षातून प्रवास करायचचा असल्यास ९६७३२६५०७३ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा.
- योगिता डोंगरे, नागपूर

संपादन - नीलेश डाखोरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com