प्रतिबंधित क्षेत्रात दुकाने सुरू ठेवण्याबाबत भेदभाव, या असोसिएशनने व्यक्त केला संताप

Discrimination against running shops in restricted areas in Nagpur
Discrimination against running shops in restricted areas in Nagpur
Updated on

नागपूर : इतवारी बाजारपेठेत एकीकडे किराणा दुकानांना परवानगी दिली. मात्र, किराणा ओळीमागील हार्डवेअरची दुकाने प्रतिबंधित क्षेत्राच्या नावाने बंद करण्यात आली आहेत. हार्डवेअरच्या दुकानांमुळे कोरोना पसरतो, हा प्रशासनाचा तर्क अनाकलनीय आहे. एकाच भागातील दुकानांबाबत भेदभाव केला जात असल्याबाबत हार्डवेअर डिलर्स असोसिएशनने संताप व्यक्त केला आहे. 

सतरंजीपुरा येथे कोरोनाबाधित मोठ्या संख्येने आढळून आले. त्यामुळे हा परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला. मात्र, या परिसरापासून एक किमी अंतरावरील इतवारीतील किराणा दुकानांना परवानगी देण्यात आली. किराणा दुकाने पूर्वीपासून निश्‍चित वेळेसाठी खुली करण्याची परवानगी आहे. परंतु, राज्य सरकारने शहराचा रेड झोनबाहेर समावेश केल्याने हार्डवेअर व्यावसायिकांसोबत इतर दुकानदारांच्याही आशा पल्लवित झाल्या होत्या.

मात्र, आयुक्त तुकाराम मुंढे यांनी राज्य सरकारला शहर रेड झोनमध्येच ठेवण्याची विनंती केली होती. राज्य सरकारने नवे आदेश काढून नागपूरचा रेड झोनमध्ये समावेश केला. त्यामुळे इतर दुकानदारांना चांगलाच धक्का बसला. विशेषतः इतवारी या विदर्भातील सर्वांत मोठ्या बाजारपेठेतील हार्डवेअर दुकानदारांत संताप व्यक्त केला जात आहे. इतवारीतील किराणा दुकानांना परवानगी असताना किराणा ओळीमागेच असलेल्या हार्डवेअरच्या दुकानांना परवानगी नाही आणि त्याचे कारण कुणी सांगत नाही, अशी तक्रार आहे. 

सतरंजीपुऱ्यातील कोरोनाबाधित परिसरापासून हे क्षेत्र एक किमी दूर आहे. येथील दुकानांना परवानगी नाही तर दुसऱ्या बाजूने लकडगंज झोनअंतर्गत सुनील होटल भंडारा रोडवरील काही दुकाने सुरू आहेत. ही दुकानेही कोरोनाबाधितांच्या परिसरापासून एक किमी अंतरावर आहेत.

कोरोनाबाधितांच्या परिसरापासून सारख्याच अंतरावर असलेल्या सतरंजीपुरा व लकडगंज झोनमधील दुकानांबाबत भेदभाव केला जात असल्याचा आरोप हार्डवेअर डिलर्स असोसिएशनचे उपाध्यक्ष गजानन गुप्ता यांनी केला आहे. सेंट्रल एव्हेन्यूवरील मोमिनपुरा परिसराला लागून असलेली दुकाने सुरू आहेत. गांजाखेत येथील विद्युत साहित्य दुकानेही सुरू आहेत. इतवारीतील हार्डवेअरच्या दुकानांतूनच कोरोना पसरतो काय, असा संतप्त सवालही त्यांनी केला.

'सकाळ'ची भूमिका

नागपूरसारख्या मोठ्या शहरात अशा प्रकारे व्यावसायिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला असेल तर तो दूर करण्याची आणि त्यांना कामधंदा करण्यासाठी सहकार्य करण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे. ज्यांना अधिकार आहेत, त्यांनी हा संभ्रम दूर केला पाहिजे. जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्त आणि महापालिका आयुक्त यांनी यासंदर्भात तातडीने खुलासा करावा, अशी अपेक्षा गैर नाही. 

व्यापाऱ्यांना वेठीस धरण्याचे धोरण 
काही अटींवर बांधकाम करण्याचे आदेश दिले आहेत. बांधकाम करताना फावडे आदी साहित्य आवश्‍यक आहेत. हार्डवेअरची दुकाने बंद असतील तर बांधकाम करणारे कसे काम करणार? बांधकामासाठी हार्डवेअरच्या दुकानांचे विशेष महत्त्व आहे. केवळ एका भागासाठी झोनमधील दुकाने बंद करून व्यापाऱ्यांना वेठीस धरण्याचे धोरण योग्य नाही. 
- मुरलीधर गुप्ता, 
अध्यक्ष, हार्डवेअर डीलर्स असोसिएशन.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com