जिल्हा परिषद विरोधी पक्षनेत्यांनी सभागृहात भिरकावली कागदपत्रे, विरोधकांचा सभात्याग

नीलेश डोये
Saturday, 23 January 2021

अध्यक्षांनी सभागृह शांत केले. नंतर अवंतिका लेकुरवाळे यांनी दोन विषय मांडताना लांबलचक प्रास्ताविक केले. यावर विरोधक पुन्हा आक्रमक झाले.

नागपूर : जिल्हा परिषदेच्या सभेत मुस्कटदाबी होत असून सत्ताधारी पक्षांच्या सदस्यांना बोलण्यासाठी वेळ देण्यात येत असल्याचा आरोप करीत विरोधकांनी सभात्याग केला. तत्पूर्वी विरोधी पक्ष नेते यांनी सभागृहात कागदपत्रही भिरकावली. मागील सभेवर विरोधकांकडून बहिष्कार टाकण्यात आला होता. 

हेही वाचा - 'मेडीकल'समोरील दृश्य पाहून डॉक्टरांचेही पाणावले डोळे, पण बघ्यांच्या भूमिकेशिवाय काहीच...

शुक्रवारी जिल्हा परिषदेच्या सभागृहात रश्मी बर्वे यांच्या अध्यक्षतेखाली सर्वसाधारण सभा पार पडली. या सभेच्या सुरुवातीलाच विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली. भ्रष्टाचाराचे मुद्दे उपस्थित केले. पालकमंत्री पाणंद रस्त्याच्या विषयावर माजी पालकमंत्र्यांवरच ताशेरे ओढत सत्ताधाऱ्यांनी विरोधकांना शांत केले. विरोधक बोलत असतात सत्ताधारी सदस्यांकडून मध्येच आवाज करण्यात येत होता. भाजपचे सदस्य राधा अग्रवाल, राजेंद्र हरडे, आतिष उमरे बोलण्यासाठी गळा फाडून ओरडत होते. त्याच वेळेस सत्ताधारी सदस्यांना बोलण्याची संधी मिळत होती. हरडे व डोंगरे यांच्यात शाब्दीक चकमकही उडाली. विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होतो, असा सूर काढत विरोधकांनी सभागृहात विषय पत्रिका हवेत भिरकावली. दरम्यान, अध्यक्षांनी सभागृह शांत केले. नंतर अवंतिका लेकुरवाळे यांनी दोन विषय मांडताना लांबलचक प्रास्ताविक केले. यावर विरोधक पुन्हा आक्रमक झाले. जिल्हा परिषदेशी संबंधित नसलेल्या विषयांवर बोलण्यासाठी सत्ताधारी सदस्यांना वेळ देता. विरोधकांनी एक शब्दात बोलण्यास सांगता. हे योग्य नाही, असे म्हणत विरोधकांनी सभात्याग केला. 

हेही वाचा - मुलाला खटकले आईचे प्रेमसंबंध अन् उचलले धक्कादायक पाऊल, आईने काढली समजूत

विरोधकांना बोलण्यासाठी कमी वेळ देण्यात येते. विषय मांडत असताना दोन-तीन सदस्य मध्येच अडथळे आणतात. भ्रष्टाचाराच्या मुद्यांवर चर्चा नको आहे. विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न आहे. सभेत तीन, चार जण अध्यक्षांची भूमिका बजावत आहे. त्यामुळे नेमके अध्यक्ष किती हे समजत नाही. 
-अनिल निधान, विरोधी पक्ष नेते. 

विरोधकांकडे कोणतेही मुद्दे नाही. त्यामुळे त्यांच्याकडून गोंधळ घालण्यात आला. उलट सुलट आरोप होत असल्याने सदस्य अध्यक्षांच्या बाजू बोलत होते. यात गैर काय? लोकप्रतिनिधी आहे. ते आपल्या क्षेत्रातील मुद्दे, समस्या मांडतात. त्यांचा तो अधिकार आहे. 
-मनोहर कुंभारे, उपाध्यक्ष व गट नेते. 

हेही वाचा - गृहमंत्र्यांकडून पोलिस भरतीचा संभ्रम दूर; दुसऱ्या टप्प्यात आधी शारीरिक चाचणी नंतरच लेखी परीक्षा

राष्ट्रवादीही आक्रमक -
सभेत राष्ट्रवादी सदस्यही आक्रमक दिसून आले. पहिल्यांदाच जवळपास सर्वच सदस्यांनी कामकाजात भाग घेत आक्रमकपणे मुद्दे मांडले. काँग्रेसचा मात्र एकही मुद्दा खोडून काढला नाही किंवा विरोध केला नाही. सलील देशमुख यांनी सर्व पक्षांसाठी कक्ष देण्याची मागणी केली. 

लेकुरवाळे यांचा बसूनच उपदेश -
सभागृहात उभे राहून बोलण्याची प्रथा आहे. परंतु, अवंतिका लेकुरवाळे बसूनच बोलत होत्या. त्यांना आपला माईकही दुसऱ्या कुणालाच देत नव्हत्या. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: dispute in nagpur zilla parishad meeting