संतापाचा भडका : नागरिकांनी सुरक्षारक्षकाचे फाडले कपडे, कारण...

Dissatisfaction due to electricity bills
Dissatisfaction due to electricity bills

नागपूर : भरमसाट बिलामुळे वीजग्राहकांमध्ये प्रचंड असंतोष पसरला आहे. महावितरणच्या तुळशीबाग उपविभागीय कार्यालयात ग्राहकांच्या संतापाचा अचानक भडका उडाला. त्यातून सुरक्षारक्षकाचे कपडे फाडून मारहाण करण्यात आली. अतिरिक्त कार्यकारी अभियंतासुद्धा या रोषाला सामोरे जावे लागले, त्यांनासुद्धा धक्काबुक्की करण्यात आली.

लॉकडाउनचे नियम शिथिल होताच महावितरणकडून वीज ग्राहकांना मीटररीडिंग घेऊन छापील देयक वाटले जात आहेत. काही ग्राहकांना यावर आक्षेप असल्याने ते उपविभागीय कार्यालयात दुरुस्तीसाठी आणि माहितीसाठी जात आहेत. गर्दी टाळण्यासाठी ग्राहकांना टोकन देऊन क्रमानुसार आत पाठविले जाते. टोकन पद्धतीमुळे बाहेर असणाऱ्या ग्राहकांना तासन्‌तास वाट बघावी लागते. आत गेल्यावरही कोणतीच सुनावणी होत नसल्याचा ग्राहकांचा आरोप असून, हेच वादाचे प्रमुख कारण ठरले.

महावितरणच्या दाव्यानुसार, महाल येथे रहिवासी मनोज धोपटे तुळशीबाग उपविभागीय कार्यालयात आला होता. कार्यालयातील लिपीक पूर्वेश ठाकरे यांनी धोपटेचे समाधान करण्याचा प्रयत्न केला. परंतु, रागाच्या भरात बाहेर येऊन ते ग्राहकांना भडकवण्याचा प्रयत्न करू लागले. सुरक्षारक्षक चंद्रशेखर बनसोड यांनी आक्षेप घेतला. यामुळे मनोज धोपटे आणि त्यांच्यासोबत असणारा तन्मय भोसकरने हल्ला केला. कपडे फाडून लाथाबुक्‍यांनी मारहाण केल्याचा ठाकरे यांचा आरोप आहे.

तुळशीबाग उपविभागाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता प्रसन्न श्रीवास्तव कार्यालयात आले असता त्यांनाही धक्काबुक्की करण्यात आली. वादावादीच्या आवाजामुळे महावितरणचे कर्मचारी बाहेर आले असता त्यांनाही शिवीगाळ व धक्काबुक्की करण्यात आली. याप्रकरणी श्रीवास्तव यांच्या तक्रारीवरून कोतवाली पोलिसांनी धोपटे व भोसेकरच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

बिलासंदर्भात काहीच ऐकून घेतले जात नाही

उपस्थित ग्राहकांनी मात्र आरोप फेटाळून लावले. त्यांच्या दाव्यानुसार तन्मय भोसकर हे आजोबा माधवराव यांना घेऊन बिलासंदर्भातील तक्रार घेऊन आले होते. माधवराव एमएसईबीचे निवृत्त कर्मचारी असून, त्यांच्या पत्नी माया या भाजपच्या नगरसेविका राहिल्या आहेत. घटनेच्यावेळी तीनशेहून अधिक ग्राहक कार्यालयात होते. बिलासंदर्भात काहीच ऐकून न घेता ते भरण्यास सांगितले जात असल्याने संतापाचा भडका उडाला. त्यात सुरक्षारक्षकाने ज्येष्ठ नागरिक माधवराव यांना आढून घेतले. त्यातूनच मारहाणीचा प्रकार घडल्याचे उपस्थित सांगतात.

अधिकाऱ्यांचे आरोप खोटे

घटनेनंतर माधवराव यांची प्रकृती खालावली असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. अनेकांनी घटनेचे मोबाईलमध्ये चित्रीकरण केले. अधिकाऱ्यांचे आरोप खोटे असल्याचा दावा केला आहे. ग्राहकांकडूनही पोलिसांत तक्रार देण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com