डॉ. होमी जहॉंगीर भाभा पुण्यतिथी विशेष: भारताचे ‘लिओनार्दो दा विंची‘ बैठकीसाठी आले होते नागपुरात

प्रशांत रॉय 
Sunday, 24 January 2021

संशोधन व वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्यासाठी सर सी. व्ही रामन यांनी १९३४ मध्ये इंडियन सायन्स अकादमीची बंगळूर येथे स्थापना केली. १९४० मध्ये भाभा यांनी या संस्थेत विश्वकिरण संशोधन विभागाचे प्रभारी प्रपाठकपद स्वीकारले.

नागपूर ः डॉ. भाभा केवळ शास्त्रज्ञ नव्हते. तर ते संगीत, कला, नृत्य व साहित्यामध्येही रुची असणारे अवलिया होते. खरे सांगायचे तर ते भारताचे ‘लिओनार्दो दा विंची' आहेत असे कोणाचेही कौतुक सहसा न करणारे उद्गार नोबेल पुरस्कार विजेते सर सी. व्ही. रामन यांनी काढले होते. १९४१ मध्ये नागपुरात झालेल्या इंडियन सायन्स अकादमीच्या वार्षिक बैठकीत डॉ. रमण यांनी डॉ. होमी जहॉंगीर भाभा यांची अशी ओळख करून दिली होती.

संशोधन व वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्यासाठी सर सी. व्ही रामन यांनी १९३४ मध्ये इंडियन सायन्स अकादमीची बंगळूर येथे स्थापना केली. १९४० मध्ये भाभा यांनी या संस्थेत विश्वकिरण संशोधन विभागाचे प्रभारी प्रपाठकपद स्वीकारले. दरवर्षी भारतातील विविध शहरांमध्ये संस्थेद्वारे संशोधनासंबंधी बैठक आयोजित केली जात असे. देशातील निवडक शास्त्रज्ञ, संशोधक आपले संशोधन, रिसर्च पेपर सादर करीत असत. २५ आणि २६ डिसेंबर १९४१ मध्ये नागपूर येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. ‘रिसेंट ॲडव्हान्स इन कॉस्मिक रे‘ या विषयावर डॉ. भाभा यांचा रिसर्च पेपर होता.

हेही वाचा - Video : शेतकरी आष्टणकर यांचा मंत्र; ‘पिकते ते विकण्यापेक्षा, जे विकते ते पिकवा’, वांगी उत्पादनातून...

भारतीय अणू कार्यक्रमाचे शिल्पकार डॉ. होमी जहांगीर भाभा यांचा जन्म ३० ऑक्टोबर १९०९ साली मुंबईतील एका पारशी कुटुंबात झाला. लहानपणापासूनच त्यांना विज्ञानावरील पुस्तकांच्या वाचनाची आवड होती. १९३० मध्ये त्यांनी केंब्रिज विद्यापीठातून इंजिनिअरची पदवी घेतली. १९४० साली डॉ. भाभा भारतात परतले व अणु ऊर्जा संशोधनावर काम सुरु केले. 

जे.आर.डी. टाटांशी संपर्क साधून मुंबईत टाटा फंडामेंटल रिसर्च सेंटरची स्थापना केली. १९४८ साली त्यांनी पंतप्रधान नेहरूंच्या सहकार्याने अणुऊर्जा आयोगाची स्थापना केली. डॉ. भाभांच्या प्रयत्नांमुळेच १९६ साली ट्रॉम्बे येथे आशियातील पहिली अणुभट्टी 'अप्सरा' उभारण्यात आली. २४ जानेवारी १९६६ ला व्हिएन्ना येथे आयोजित अणुऊर्जा परिषदेला उपस्थित राहण्यासाठी डॉ. भाभा निघाले होते. ते प्रवास करीत असलेल्या विमानाचा अपघात झाला. त्यात त्यांचा मृत्यू झाला.

विविध कलांमध्ये रुची

डॉ. भाभा यांना अभिजात पाश्चात्त्य संगीताची विलक्षण आवड होती. ते उत्तम चित्रकार होते. त्यांनी स्थापन केलेल्या बहुतांश संशोधन संस्थांमध्ये त्यांनी सुंदर आणि कलात्मक उद्यानेही उभी केली आहेत. या संस्थांच्या इमारतींसाठीची जागा निवडतानाही त्यांनी त्या परिसराच्या निसर्गसौंदर्यालाही महत्त्व दिलेले आढळून येते.

नक्की वाचा - असाही एक अवलीया... जमीन दान करून केले गरिबांचे स्वप्न पूर्ण; थाटला दहा बेघरांचा संसार

नोबेलसाठी पाच वेळा नामांकन

ऊर्जा, कृषी आणि मेडिसिन क्षेत्रात अणुऊर्जा कार्यक्रमाचा उपयोग व्हावा, असे डॉ. भाभांनी सांगितले होते. अणुशक्तीच्या अर्थशास्त्राचाही त्यांचा दांडगा अभ्यास होता. अणुशक्तीद्वारे निर्माण केलेली वीज किफायतशीर आहे हे त्यांनी दाखवून दिले होते. विशेष म्हणजे डॉ. भाभा यांना तब्बल पाच वेळा भौतिकशास्त्रामध्ये नोबेलसाठी नामांकन मिळाले होते. विज्ञानातील त्यांचे विलक्षण योगदान लक्षात घेता तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी मुंबईतील अणू संशोधन केंद्राचे नाव बदलून ते 'भाभा अॅटॉमिक रिसर्च सेंटर' असे केले.

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Doctor Homi Bhabha Death anniversary special visited Nagpur