रखरखत्या उन्हात रस्त्यावर भूक, तहानेने व्याकूळ भिक्षेकऱ्याची तहान भागवण्यासाठी ते थांबतात रस्त्यावर...

केवल जीवनतारे
सोमवार, 25 मे 2020

डॉ. कोरेती मूळचे गडचिरोलीतील. प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत शिक्षण घेतलं. रस्त्यावरच्या बेवारसांना भेटून त्यांची तहानभूक भागवणारा हा खऱ्या अर्थाने गरिबांचा डॉक्‍टर म्हणून ते नावारूपास आले. त्यांना भेटलं की, कायम या बेवारस, बेसहारा, मनोरुग्णांची तहान भागविण्यासाठी, आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी आयुष्य वेचण्याचा यांचा संकल्प. डॉ. दिलीप कुमरे यांनी स्थापन केलेल्या विदर्भ ट्रायबल्स डॉक्‍टर असोसिएशनच्या माध्यमातून 15 पेक्षा अधिक डॉक्‍टरांची आदिवासींच्या वेदनांशी नाळ जोडून हे सेवादूताचे कार्य करीत आहेत.

नागपूर :  दिवस रविवार... एरवी सर्वांसाठी सुटीचा असतो... परंतु, आदिवासी समाजातील हा डॉक्‍टर मात्र त्याला अपवाद आहे... रखरखत्या उन्हात रस्त्यावर भूक तहानेने व्याकूळ भिक्षेकऱ्याची तहान भागवण्यासाठी तो रस्त्यावर थांबतो... त्यांना पाणी देतो... हा त्यांचा दर रविवारचा उपक्रमच... कोरोनोची आणीबाणी सुरू आहे... अशा संकटसमयी हा डॉक्‍टर रस्त्याच्या कडेवरील भिक्षेकऱ्याची, बेवारसांची तहान भागवतो... या सेवादूताचे नाव डॉ. आशीष कोरेती...

डॉ. कोरेती मूळचे गडचिरोलीतील. प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत शिक्षण घेतलं. रस्त्यावरच्या बेवारसांना भेटून त्यांची तहानभूक भागवणारा हा खऱ्या अर्थाने गरिबांचा डॉक्‍टर म्हणून ते नावारूपास आले. त्यांना भेटलं की, कायम या बेवारस, बेसहारा, मनोरुग्णांची तहान भागविण्यासाठी, आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी आयुष्य वेचण्याचा यांचा संकल्प. डॉ. दिलीप कुमरे यांनी स्थापन केलेल्या विदर्भ ट्रायबल्स डॉक्‍टर असोसिएशनच्या माध्यमातून 15 पेक्षा अधिक डॉक्‍टरांची आदिवासींच्या वेदनांशी नाळ जोडून हे सेवादूताचे कार्य करीत आहेत.

एखाद्या पाडावर जाऊन थांबतात. बाजूला असलेल्या गावाच्या चावडीवर, धार्मिक स्थळाच्या आवारात जागा मिळेल तिथे दोन खुर्च्या टाकून दवाखाना थाटून गावातील प्रत्येकावर उपचारासाठी पुढे येतात. कोरोनाच्या काळातही रस्त्यावर निघून तहान भागवण्यासाठी हा डॉक्‍टर सेंट्रल एव्हेन्यूवर दिसतो.

एरव्ही डॉक्‍टर्स ग्रामीण भागात सेवा द्यायला तयार होत नाहीत, अशी ओरड आपण ऐकत असतो. मात्र, विदर्भ ट्रायबल डॉक्‍टर असोसिएशनचे हे वीसपेक्षा अधिक डॉक्‍टर्स याला फाटा देऊन आदिवासी पाडे पालथे घालतात. गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा असो की, भामरागडसारखा दुर्गम भाग, की मेळघाट, किनवटमधील आदिवासी भाग. जिथे आरोग्य सेवा पोहोचली नाही, त्या ठिकाणी आदिवासी पाड्यांवर जाऊन या डॉक्‍टरांची टीम आदिवासींच्या वेदनांवर उपचारांची फुंकर घालते. लहानपणापासून आदिवासींचे दुःख, वेदना जवळून पाहिल्या असल्यानेच त्यांची नाळ गरिबांच्या वेदनांशी जुळली आहे.

अवश्य वाचा- बीपीएल कार्डधारक असलेल्या आंतरराष्ट्रीय खेळाडूंनाच मदत, मग इतरांनी उपाशी मरायचे का? क्रीडा खात्याच्या पत्रकावर तीव्र नाराजी

खासगीचा खर्च परवडणारा नाही

काळ कोणताही असो डॉक्‍टर हे साधे नाव काढले तरी खर्चाच्या धास्तीने गरिबांच्या काळजात धस्स होते. नको नको त्या शंका येतात. त्यात खासगी दवाखान्याची पायरी चढण्याची ऐपत त्यांच्यात नसते. तपासणी, चाचण्यांच्या फीपासून ते औषधांपर्यंत आवाक्‍याबाहेरचा खर्च बघून भोवळ येते. अशावेळी विदर्भातील आदिवासी भागात अहोरात्र झटत असलेले डॉक्‍टर स्वतःच्या खिशाला खार लावून हे रस्त्यावरील बेवारसापासून तर आदिवासींच्या वेदनांवर उपचारांची फुंकर घालतात.

सेवाभाव म्हणून काम करावे
रस्त्यावरच्या बेवारसांचे कोणी नाही, तेच दुःख आम्ही भोगले. ज्या लोकांच्या सहवासात बालपण गेले, त्यांच्या वेदना आम्हाला शहरात सुटाबुटात वावरताना स्वस्थ बसू देत नाही. कुठलाही आजार अंगावर काढण्याची आमच्या आदिवासींना सवय असते. शहरात उपचारासाठी येण्याची परिस्थिती नसते. त्यामुळे काळाची पावले ओळखून तरुण डॉक्‍टरांनी सेवाभाव म्हणून काम करावे.
- डॉ. आशीष कोरेती, वैद्यकीय अधिकारी, नागपूर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A doctor who quenches the thirst of beggars