नागरिकांनो, मेट्रोचा वापर करा, प्रदूषण टाळा; तब्बल दोन हजार टन कार्बन-डाय-ऑक्साईडची होणार घट   

राजेश प्रायकर 
Sunday, 29 November 2020

महामेट्रोची प्रवासी सेवा पर्यावरण पूरक आहे. सौरऊर्जेचा उपयुक्त वापर, विविध प्रजातीच्या झाडांचे रोपण, व्हर्टिकल गार्डन सारखे उपाययोजना करण्यात आल्या आहेत. त्यामुळे नागपूरकरांच्या आयुष्यात सकारात्मक परिणाम होणार आहे.

नागपूर ः निरोगी श्वसन प्रणालीसाठी पर्यावरणपूरक मेट्रोचा वापर करा, असे आवाहन शहरातील डॉक्टरांनी केले आहे. मेट्रोचा वापर केल्यास दुचाकी, चारचाकी वाहनांचा वापर कमी होऊन विषारी वायूचा उत्सर्गातही घट होईल. संपूर्ण नागपूरकरांना मेट्रोचा वापर केल्यास वाहनाच्या धूरातून निघणारा दोन हजार टन कार्बन डाय ऑक्साईड येत्या दोन वर्षात कमी होईल, असा दावाही करण्यात आला.

महामेट्रोची प्रवासी सेवा पर्यावरण पूरक आहे. सौरऊर्जेचा उपयुक्त वापर, विविध प्रजातीच्या झाडांचे रोपण, व्हर्टिकल गार्डन सारखे उपाययोजना करण्यात आल्या आहेत. त्यामुळे नागपूरकरांच्या आयुष्यात सकारात्मक परिणाम होणार आहे. मेट्रोतून प्रवासही पर्यावरणपूरक आहे. 

क्लिक करा - सावधान! .फेसबूकच्या `मार्केट प्लेस’वरून खरेदी करताय? होऊ शकते लाखोंची फसवणूक

प्रवासाकरता मेट्रो गाडीचा वापर केल्याने पेट्रोलियम पदार्थांचा वापर करून धावणाऱ्या वाहनांपासून होणारा कार्बनचा उत्सर्ग कमी होतो. मेट्रोचा वापर झाला तर इतर वाहनांचा वापर कमी होत साहजिकच कार्बन किंवा इतर विषारी वायूंचा उत्सर्ग कमी होईल. मेट्रोने प्रवास केल्याने रस्त्यावरील वाहनातून निघणाऱ्या विषारी वायूंचा त्रास होणार नाही, असे एम्सच्या मायक्रो बायोलॉजी विभागातील प्राध्यापिका डॉ. मीना मिश्रा म्हणाल्या. 

वाहनांतून कार्बन मोनो ऑक्साईड, नायट्रस ऑक्साईड, सल्फर ऑक्साईड, शिसे सारख्या तत्वांचा उत्सर्ग होतो. पर्यावरणासोबतच मानवी शरीरावर देखील याचा व्यापक परिणाम होत असल्याचे आजवर झालेल्या संशोधनातून सिद्ध झाले आहे. महामेट्रोने तयार केलेल्या सविस्तर प्रकल्प अहवालाप्रमाणे प्रवासाचे साधन म्हणून मेट्रोचा वापर केल्यास २०२२ पर्यंत ६८.४७ हजार टन कार्बन डाय ऑक्साईड व २.६२ हजार टन इतर वायूंचा उत्सर्ग कमी होणार आहे. 

हेही वाचा - काय सांगता! आज रविवार आहे, अंत्यसंस्कार विधी होणार नाही! ही आहे अडचण

पेट्रोलचा वापर करणाऱ्या वाहनांतून निघणाऱ्या धुरामुळे श्वसना संबंधी आजार होतात. त्यामुळे पारंपरिक पद्धतीचे इंधन वापर करून रस्त्यावर चालणाऱ्या वाहनांची संख्या जितकी कमी तितकेच चांगले, असे हृदयरोग तज्ज्ञ डॉ. शंतनू सेनगुप्ता म्हणाले. नागपूरकरांनी मेट्रोचा वापर करावा असे आवाहन देखील त्यांनी केले. 

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Doctors adviced to use metro to avoid air pollution In Nagpur