मेडिकलचे डॉक्टर म्हणतात, "सुटी घ्या आणि घरीच औषधं घ्या"; घाईत मिळतोय रुग्णांना डिस्चार्ज  

केवल जीवनतारे
Wednesday, 18 November 2020

सध्या कोरोना रुग्णांची संख्या रोडावली आहे. कमी प्रमाणात रुग्ण दाखल होत आहेत. मात्र केवळ न्यायालयाच्या आदेशाचे पालन व्हावे यामुळे १००० खाटा मेडिकलमध्ये उपलब्ध आहेत,

नागपूर ः कोविडमुळे इतर आजारांच्या रुग्णांसाठी खाटा शिल्लक नाहीत. अवघ्या १७ दिवसांत १६ हजार रुग्णांची बाह्यरुग्ण विभागात नोंद झाली. इतर आजाराच्या रुग्णांची गर्दी मेडिकलमध्ये वाढली. यामुळे काहीशी प्रकृती स्थिर होताच डॉक्टरांकडून खाटा शिल्लक नाही, असे कारण देत रुग्णांची बोळवण केली जाते. सुटी घ्या आणि घरीच औषधं घ्या, असा सल्ला देऊन रुग्णांना सुटी देण्यात येत असल्याचे प्रकार मेडिकलमध्ये पुढे येत आहेत.

सध्या कोरोना रुग्णांची संख्या रोडावली आहे. कमी प्रमाणात रुग्ण दाखल होत आहेत. मात्र केवळ न्यायालयाच्या आदेशाचे पालन व्हावे यामुळे १००० खाटा मेडिकलमध्ये उपलब्ध आहेत, असे सांगण्यात येत आहे. विशेष असे की, मेडिकलमध्ये मंगळवारी (ता.१७) एक हजार ७३९ इतर आजाराच्या रुग्णांची बाह्यरुग्ण विभागात नोंदणी झाली.

नक्की वाचा - दुर्दैवी! फराळाचे पदार्थ करताना अचानक घरात पसरला धूर आणि क्षणाधार्त संसाराची झाली राखरांगोळी

 याशिवाय कॅज्युअल्टीतही शंभरपेक्षा अधिक रुग्णांची नोंद झाली. यातील ११० च्या वर रुग्णांना एकाच दिवशी दाखल करण्यात आले. यामुळे इतर आजारांच्या आंतर रुग्णांची संख्या वाढली आहे. मात्र इतर आजारांच्या रुग्णांसाठी अवघ्या आठशे खाटा शिल्लक आहेत. त्यातही मेडिसीन विभागाच्या खाटांची संख्या कमी आहे. यामुळे रुग्णांना सक्तीची सुटी दिली जात आहे. गरीब रुग्णांचा कोणीही वाली नाही. डॉक्टरांकडून रुग्णांच्या हातावर डिस्चार्ज कार्ड हातावर ठेवण्यात येते. 

अवघ्या पंधरा दिवसात ६०० रुग्णांना मेडिकलच्या मेडिसीन विभागात दाखल करण्यात आले आहे. खाटांची संख्या अल्प असल्यामुळे रुग्णांना ठेवायचे कुठे हा सवाल येथील डॉक्टरांपुढे उभा ठाकला आहे. यामुळेच डॉक्टर सुटी देतात,जेणेकरून गंभीर रुग्णांना खाटा उपलब्ध होती, हा हेतू डॉक्टरांचा असतो, असे एका वरिष्ठांकडून सांगण्यात आले.

हे वाचाच - सुशील-कुणालची ‘सुपारी किलींग’? नागपुरात संशयातून दुहेरी हत्याकांड; गॅंगवॉर भडकण्याची शक्यता

कोविड वॉर्डात नुसत्याच परिचारिका

मेडिकलमधील अनेक कोविड वॉर्ड रिकामे आहेत. काही वॉर्डात रुग्ण दाखल नाहीत. तर काही वॉर्डात केवळ एक किंवा दोन रुग्ण आहेत. मात्र या वॉर्डात परिचारिकांची संख्या पाच पेक्षा वर असते. रुग्ण नसतानाही या वॉर्डात परिचारिका कर्तव्यावर असतात. तर दुसरीकडे इतर आजाराच्या रुग्णांना उपचार अर्धवट सोडून त्यांना घरीच औषधं घ्या असा सल्ला देत त्यांना सुटी देण्याची घाई होत असल्याचे प्रकार पुढे येत आहेत. कोविड वॉर्डांची संख्या सीमित करून ते वॉर्ड इतर आजाराच्या रुग्णांसाठी उपलब्ध करून देण्यात यावे अशी मागणी रुग्णांच्या नातेवाइकांकडून जोर धरत आहे.  

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: doctors are in hurry to discharge patients In Nagpur GMC