सुशील-कुणालची ‘सुपारी किलींग’? नागपुरात संशयातून दुहेरी हत्याकांड; गॅंगवॉर भडकण्याची शक्यता

अनिल कांबळे 
Wednesday, 18 November 2020

कुणाल सुरेश चरडे (वय २९) व सुशील सुनील बावने (वय २४) ,अशी मृतांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाळू दुधनकर हा आधी बीट्स गॅंगचा सदस्य होता. पैशाच्या वादातून त्याने गॅंग सोडली.

नागपूर : कारागृहात बंद असलेल्या कुख्यात ठवकरने आपल्या प्रतिस्पर्धी गॅंगमधील कुख्यात सुशील बावणे आणि कुणाल चरडे या दोघांचा ‘सुपारी’ देऊन ‘गेम’ केल्याची चर्चा समोर येत आहे. त्यामुळे दोघांची सुपारी किलींगची चर्चा असल्यामुळे आता दिघोरी-हुडकेश्‍वरमध्ये गॅंगवॉर भडकण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

दुहेरी हत्याकांड प्रकरणात कुही पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. तिघांनाही पोलिसांनी मंगळवारी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने तिघांची २० नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी केली. बाल्या ऊर्फ बाळू जागेश्वर संतोषराव दुधनकर (वय ३३ ,रा. निलकमलनगर), राहुल श्रावण लांबट (वय २७ ,रा.भांडेवाडी) व निशांत प्रशांतराव शहाकार (वय २३ ,रा. शक्तीमातानगर, खरबी),अशी अटकेतील मारेकऱ्यांची नावे आहेत. 

हेही वाचा - जेवण बेतले जीवावर; शहराबाहेर जेवण करण्यास गेलेल्या युवकांचा जागीच मृत्यू 

कुणाल सुरेश चरडे (वय २९) व सुशील सुनील बावने (वय २४) ,अशी मृतांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाळू दुधनकर हा आधी बीट्स गॅंगचा सदस्य होता. पैशाच्या वादातून त्याने गॅंग सोडली. त्याने स्वत:ची टोळी तयार केली. विजू मोहोडच्या हत्येनंतर दिघोरी व हुडकेश्वर परिसरात स्वत:चा दबदबा निर्माण करण्यासाठी बाळू हा धडपडत आहे. बिट्स टोळीचे सदस्य कारागृहात असल्याने बाळूने दिघोरी व हुडकेश्वर परिसरात गुन्हेगारी वर्तुळात आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यास सुरुवात केली. 

कुणाल हा कधी काळी दिलीप ठवकर याचा साथीदार होता. तेव्हापासूनच कुणाल व बाळूमध्ये वाद सुरू आहे. अनेकदा बाळूने त्याला मार्गातून हटण्यासाठी दम दिला होता. मात्र कुणाल हा त्याला वरचढ ठरायला लागला. रविवारी सायंकाळी बाळू व त्याचे साथीदार दिघोरीतील पानठेल्यावर गेले. तेथे कुणालही आला. त्याचा बाळूसोबत वाद झाला.अन्य युवकांनी मध्यस्थी केल्याने वाद निवळला. काही वेळाने बाळू हातात तलवार घेऊन पानठेल्यावर आला. कुणाल हा त्याला दिसला नाही. 

दरम्यान, कुणाल व सुशील हे दारू पिऊन बाळूच्या घरी गेले. यावेळी बाळू घरी नव्हता. दोघांनी बाळूच्या नातेवाइकांना शिवीगाळ केली. कुणाल व सुशीलने घरी जाऊन शिवीगाळ केल्याचे बाळूला कळाले. तो तलवार घेऊन घरी येत होता. रस्त्यात त्याला कुणाल दिसला. कारागृहात असलेल्या ठवकरने हत्येची सुपारी दिली. त्यामुळे तू माझ्यासोबत वाद घालत आहे, असे बाळू कुणाल याला म्हणाला. कुणाल याने बाळूसोबत वाद घातला. बाळूने साथीदारांच्या मदतीने कुणाल व सुशीलला कारमध्ये डांबले. त्यांना घेऊन बाल्या पाचगाव कुही मार्गावरील डोंगरगाव येथे आला. तेथे चाकू व तलवारीने दोघांवर वार केले. सिमेंटच्या दगडाने डोके ठेचून दोघांची हत्या केली.

नक्की वाचा - दुर्दैवी! फराळाचे पदार्थ करताना अचानक घरात पसरला धूर आणि क्षणाधार्त संसाराची झाली राखरांगोळी

सोमवारी सकाळी हे दुहेरी हत्याकांड उघडकीस आले. माहिती मिळताच पोलिस अधीक्षक राकेश ओला, अतिरिक्त अधीक्षक राहुल माकणीकर , पोलिस उपअधीक्षक संजय पुरंदरे यांच्यासह पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. पोलिसांनी तिघांना अटक केली. कुही पोलिसांनी मंगळवारी तिघांना न्यायालयात हजर केले. न्यायालयाने तिघांची २० नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी केली. या दुहेरी हत्याकांडात आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा तपास स्थानिक गुन्हेशाखा पोलिस करीत आहेत. 

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: possibility of Gang war in nagpur as 2 men are no more