स्वदेशी लस नको रे बाबा! कोव्हॅक्सिनऐवजी कोव्हिशिल्ड लसीची मागणी; अनेक डॉक्टरांचा नकार

Doctors in Nagpur Government Medical College asking for Covishield Vaccine
Doctors in Nagpur Government Medical College asking for Covishield Vaccine

नागपूर ः कोरोनाला पराभूत करण्यात डॉक्टरांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. किंबहुना रुग्णांच्या मनात काही संशय असेल तर तो दूर करण्याचीही जबाबदारी आहे. मेडिकल केंद्रावर पुण्याच्या सिरम इंस्टिट्यूटने तयार केलेली ऑक्सफोर्डची लस नसल्याचे कळताच काही डॉक्टरांनी स्वदेशी लस घेण्यास नकार दिला. आल्या पावली काही डॉक्टर परतले. यात काही महिला डॉकटर होत्या. शंभर पैकी ५३ जणांनी लसीकरण करून घेतले. मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा लस घेण्यासाठी आले होते, परंतु पोटाचा विकार असल्याने त्यांनी आज लस घेतली नाही. दोन दिवसानंतर ते लस घेतील, अशी माहिती आहे.

कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाची प्रतिक्षा शनिवारी संपली. सकाळी साडेदहा वाजता नागपूरात लसीकरणाला सुरूवात झाली. शहरात चार केंद्रांवर ऑक्सफोर्डची कोविशिल्ड आणि मेडिकलमध्ये भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन लस देण्यात येत होती. मेडिकलमध्ये वॉर्ड क्रमांक ४९ मध्ये लसीकरणाला प्रारंभ झाला. मात्र, कोविड अॅपवर नाव नोंदणी करूनही कोव्हिशिल्ड ऐवजी ऐनवेळी कोव्हॅक्सिन लसीचा डोस पुरविला गेल्याने मेडिकलमधील काही डॉक्टर आल्यापावली निघून गेले. 

राज्यातील सहा केंद्रांवर हैदराबाद येथील भारत बायोटेक निर्मित कोव्हॅक्सिनचा पहिला डोस देण्यात आला. यातील मेडिकल हे एक केंद्र होते. येथे १०० पैकी अवघ्या ५३ डॉक्टरांनी लस टोचून घेतली. कोव्हॅक्सिन लसीची अद्याप क्लिनिकल ट्रायल सूरू आहे. त्यामुळे अनेकांनी ही लस घेण्यास सहमती दिली नाही. मेडिकलमध्ये पुन्हा एकदा लसीकरण निरीक्षणासाठी ठेवण्यात येत असलेल्या वॉर्डात फाटक्या बेडशिटचे दर्शन झाले.

डॉ. रिना रुपारॉय कौर ठरल्या पहिल्या लाभार्थी

मेडिकलच्या सहयोगी प्राध्यापक डॉ. रिना रुपारॉय कौर कोव्हॅक्सिनच्या पहिल्या लाभार्थी ठरल्या. त्या लस टोचून घेण्यास पुढे आल्या. त्यांच्याशी संवाद साधला असता त्या म्हणाल्या, बदलत्या काळात बचपन आणि आता कोरोनाच्या काळात पचपनमध्ये लसीकरण महत्वाचे आहे. डॉक्टर या नात्याने लसीकरणाच्या या मोहिमेतून एक कर्तव्य पार पाडता आले, याचे समाधान अधिक आहे. लसीचे साईड इफेक्ट व्यक्तिनुसार बदलत असतात. डॉक्टर या नात्याने हे साईड इफेक्ट स्वत:हून तपासून पाहण्याची संधी यानिमित्ताने मिळेल. यानंतर डॉ. भालचंद्र मुरार, डॉ. मुकेश वाघमारे यांच्यासह ५३ जणांनी लस टोचून घेतली.

कोरोना नियंत्रण तसेच उपचार मोहिमेत मेडिकलमधील सारेच वैद्यकीय तज्ज्ञ लढत आहोत. आमच्यासाठी स्वदेशी कोव्हॅक्सिन असो की ऑक्सफर्डची कोव्हिशिल्ड या दोन्ही लसी विश्वासार्ह आहेत. यामुळे लस घेण्यासाठी डॉक्टरांनी पुढाकार दाखवला आहे. कोव्हॅक्सिच्या पहिल्या लाभार्थी म्हणून डॉ. रिना कौर रुपारॉय यांच्यासह ५३ जणांनी पुढाकार घेतला ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे.
- डॉ. अविनाश गावंडे, 
वैद्यकीय अधीक्षक, मेडिकल. 

संपादन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com