धक्कादायक! शासकीय रुग्णालयाच्या शिशू काळजी कक्षात मोकाट कुत्र्यांची दहशत; अधिकाऱ्यांचं दुर्लक्ष 

केवल जीवनतारे 
Wednesday, 13 January 2021

२००७ मध्ये बेवारस कुत्र्यांनी बाळाचे लचके तोडले होते. हे प्रकरण तब्बल सात वर्षे हे न्यायप्रविष्ट होते. त्या प्रकरणाचा मेडिकल प्रशासनाने त्यावेळी कमालीचा धसका घेतला होता. मात्र अलीकडे मेडिकल प्रशासन कोलमडले. पुन्हा एकदा कुत्र्यांची दहशत पसरली आहे.

नागपूर ः शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) २००७ एका प्रसूत मातेचे बाळ बेवारस कुत्र्याने कुरतडल्याची घटना घडली होती. मात्र, रुग्णालय प्रशासनाने यातून कुठलाही बोध घेतला नाही. आताही मेडिकलमधील अतिदक्षता विभागात आवारातील बेवारस कुत्रे झुंडीने सर्रास फिरत आहेत.रुग्णालयातील कर्मचाऱ्यांबरोबरच येथे येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाइकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. 

२००७ मध्ये बेवारस कुत्र्यांनी बाळाचे लचके तोडले होते. हे प्रकरण तब्बल सात वर्षे हे न्यायप्रविष्ट होते. त्या प्रकरणाचा मेडिकल प्रशासनाने त्यावेळी कमालीचा धसका घेतला होता. मात्र अलीकडे मेडिकल प्रशासन कोलमडले. पुन्हा एकदा कुत्र्यांची दहशत पसरली आहे. मेडिकलच्या आवारात बेवारस कुत्र्यांची प्रचंड दादागिरी सुरू आहे. येथील वऱ्हांड्यापासून तर वॉर्डाच्या प्रवेशद्वाराच्या पुढे अतिदक्षता विभागात ही बेवारस कुत्रे दिवसाच नाही तर रात्रीही फिरत असतात. 

जाणून घ्या - बहिण भावाला बोलवायला गेली, खिडकीतून दृश्य बघताच मोठ्यानं किंचाळली

मेडिकलमध्ये अतिदक्षता वॉर्ड असो की प्रसूती कक्ष, येथील परिसरात नवजात शिशू वॉर्डात असतात. येथील वॉर्डांमध्ये ठेवण्यात येत असलेल्या जैविक कचऱ्यांमध्ये कुत्रे अन्न मिळेल या आशेने जातात. यामुळे काही प्रमाणात का होईना मानवी रक्त त्यांच्या तोंडाला लागण्याची शक्यता आहे. यामुळे २००७ मध्ये बाळ कुरतडल्याच्या घटनेची पुनरावृत्ती होण्याची भीती आहे. 

मेडिकलमध्ये सुमारे पन्नास वॉर्ड आहेत. येथील प्रत्येक वॉर्डसमोर तसेच वऱ्हांड्यात नातेवाईक झोपलेले असतात. बाजूलाच अन्नाचे डबेही ठेवलेले असतात. नातेवाईकांसाठी असलेल्या अन्नावर कुत्रे ताव मारतात. कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी वैद्यकीय अधीक्षक कार्यालयातून केली जाते; परंतु या निवेदनाला महापालिका प्रशासनाकडून खो दिला जातो. खुद्द वैद्यकीय अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे यांनी पाठपुरावा केला होता. परंतु, याची दखल महापालिका घेत नाही. 

नक्की वाचा - घरात लक्ष्मी आली म्हणून बाप वाटत होता पेढे, पण एक फोन आला अन् सर्वच संपलं

उपराजधानीत अवघ्या सहा महिन्यांत अडीच हजार व्यक्तींना कुत्रा चावल्याच्या तक्रारींची नोंद आहे. मेडिकलमध्ये कुत्रा चावल्यानंतर झालेल्या संसर्गाने (रेबीज)चे २० रुग्ण यावर्षी दगावले आहेत. ही बाब लक्षात घेत मेडिकल प्रशासनाने महापालिकेच्या हनुमाननगर झोनमध्ये संपर्क साधला होता. निवेदन दिले; परंतु मेडिकलच्या वैद्यकीय अधीक्षक कार्यालयातील तक्रारींकडे महापालिकेचे अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याची माहिती चर्चेतून पुढे आली.

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dogs are in Baby care Unit of Medical Hospital Nagpur Latest News