खनिजसाठ्यांचे वरदान असलेल्या विदर्भातून डोलामाईट झारखंडकडे  

योगेश बरवड
Monday, 12 October 2020

विदर्भाला वनांसह खनिजसाठ्यांचे वरदान मिळाले आहे. निर्जल कार्बोनेट खनिज असणाऱ्या डोलामाईटचेही प्रचंड साठे आढळून येत आहेत. त्याला मोठी मागणीही आहे. माहितीअभावी केवळ काही टन खनिज रस्ते मार्गे पाठविले जायचे.

नागपूर  ः विदर्भात सर्वदूर डोलामाईट प्रचंड प्रामाणात साठा असून, देशाच्या विविध भागातील उद्योगांना त्याचा पुरवठा केला जातो. अजवर रस्तेमार्गानेच डोलामाईटची वाहतूक केली जात होती. रेल्वे अधिकाऱ्यांनी प्रयत्नपूर्वक डोलामाईट उत्पादकांना रेल्वेतून वाहतुकीसाठी राजी करून घेतले आहे. शनिवारी वणी येथून डोलामाईटची पहिली खेप झारखंडकडे रवाना झाली. एकूण ४५ वाघिणींमधून २ हजार ८०० टान खनिज पाठविण्यात आले आहे.

विदर्भाला वनांसह खनिजसाठ्यांचे वरदान मिळाले आहे. निर्जल कार्बोनेट खनिज असणाऱ्या डोलामाईटचेही प्रचंड साठे आढळून येत आहेत. त्याला मोठी मागणीही आहे. माहितीअभावी केवळ काही टन खनिज रस्ते मार्गे पाठविले जायचे. मध्य रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक आणि व्यवसाय विकास पथकाचे विभागीय अध्यक्ष सोमेश कुमार यांनी डोलामाईटच्या पुरवठ्यासंदर्भात पुढाकार घेतला.

ठळक बातमी -  मुलाला असलेले मोबाईलचे वेड बेतले वडिलांच्या जीवावर; कुटुंबातील कर्त्या पुरुषाने उचलले टोकाच पाऊल
 

वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक कृष्णार्थ पाटील व अन्य अधिकाऱ्यांनी वणी परिसरात जाऊन खाण मालकांशी संपर्क साधला. सुरक्षित मालवाहतुकीची हमी दिली. त्यानंतर शनिवारी २८०० टन डोलामाईट मालगाडीने झारखंडसाठी रवाना झाले. ४५ वाघिणी भरलेली मालगाडी दपूम रेल्वेच्या आदरा विभागातील बंडीडी रेल्वेस्थानकासाठी निघाली आहे.
 

डोलामाईटचा वापर

डोलामाईटचा वापर सजावटीसाठी वापरण्यात येणाऱ्या दगडाच्या स्वरूपात होते. याशिवाय काँक्रिट एकत्रित करणे आणि मॅग्नेशियम ऑक्साईडचा स्रोत म्हणून तसेच मॅग्नेशियमच्या उत्पादनासाठी पिडॉन प्रक्रियेमध्ये होतो. लोखंड आणि स्टील फ्लोट ग्लासच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात प्रोसेस्ड डोलामाईट वापरले जाते. देशाच्या विविध भागातील उद्योगांना डोलामाईटची गरज आहे.
 

रोजगाराच्या प्रचंड संधी

नागपूरसह संपूर्ण विदर्भात डोलामाईट खनिजाचा साठा मोठ्या प्रमाणावर आहे. देशभरातून या खनिजाला मोठी मागणी आहे. योग्य नियोजन केल्यास प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगाराच्या अनेक संधी निर्माण होऊ शकतात. आजवर या खनिजाची रस्तेमार्गे वाहतूक केली जात होती. रेल्वेने वाहतूक सुरू झाल्याने रेल्वेचा महसूल वाढण्यासोबतच नागपूर विभागाचे असणारे महत्त्वही अधिक वाढू शकेल.

संपादन  : अतुल मांगे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dolamite from Wani sailed to Jharkhand