कोरोनामुळे पोलिसांनी सोडले डॉन आंबेकरच्या भाच्याला; मात्र, तो होता या तयारीत...

अनिल कांबळे
सोमवार, 8 जून 2020

वाठोडा चौकाजवळ स्वामिनारायण मंदिराच्या बाजूला असलेल्या पेट्रोल पंपावर काही गुंड शस्त्रासह दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली. कुख्यात गुन्हेगार सुगत बागडे याच्या वाठोडा ले-आउट येथील घरात ते सर्व सन्नीच्या नेतृत्वात एकत्र येऊन योजना आखत होते. माहिती मिळताच गुन्हे शाखेने पथक सज्ज केले. 

नागपूर : कुख्यात डॉन संतोष आंबेकरच्या अनेक गुन्ह्याचा मास्टरमाइंड असलेला आणि डॉनचा "राईट हॅण्ड' म्हणून ओळखला जाणारा भाचा सन्नी वर्मा याचा गुन्हे शाखा पथक क्रमांक चारने मुसक्‍या आवळल्या. या कारवाईमुळे गुन्हे जगताला मोठा हादरा बसला आहे. डॉन संतोष आंबेकरच्या गोटात खळबळ उडाली आहे. सन्नी नुकताच मध्यवर्ती कारागृहाबाहेर आला होता आणि पेट्रोल पंप लुटण्यासाठी मोठ्या टोळीसह सापळा रचून होता, हे विशेष. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देशात कोरोनामुळे खबरदारीचा उपाय म्हणून मध्यवर्ती कारागृह प्रशासनाने राज्यातील जवळपास नऊ हजार कच्च्या कैद्यांना सोडण्याची व्यवस्था केली होती. न्यायालयाच्या आदेशाने कारागृहातील गुन्हेगारांची अटींवर सुटका करण्यात आली. यात संतोष आंबेकरच्या भाचा विकास ऊर्फ सन्नी वर्मा (वय 29, रा. दारोडकर चौक) याचाही समावेश होता. 

हेही वाचा - तुकाराम मुंढेंचा दणका : फडणवीस यांच्या कार्यकाळातील कर्मचाऱ्यांना केले पुन्हा बडतर्फ

काहीच दिवसांपूर्वी सन्नी कारागृहाबाहेर आला होता. बाहेर येताच त्याने पुन्हा गुन्हेगारी विश्‍वात आपला दबदबा कायम ठेवण्यासाठी दहा गुन्हेगारांची टोळी सक्रिय केली. गुन्हेशाखा युनिट क्रमांक 4 च्या पथकाकडून ऑपरेशन क्रॅकडाउन-2 राबवित असताना पथकाचे प्रमुख पीआय अशोक मेश्राम यांना गुप्तहेराकडून वाठोडा चौकाजवळ स्वामिनारायण मंदिराच्या बाजूला असलेल्या पेट्रोल पंपावर काही गुंड शस्त्रासह दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली. कुख्यात गुन्हेगार सुगत बागडे याच्या वाठोडा ले-आउट येथील घरात ते सर्व सन्नीच्या नेतृत्वात एकत्र येऊन योजना आखत होते. माहिती मिळताच गुन्हे शाखेने पथक सज्ज केले. 

घराजवळ रचला सापळा

पोलिसांनी सुगत बागडे याच्या घरासमोर सापळा रचला. अचानक छापामार कारवाई करून 10 आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून चार प्राणघातक शस्त्रे, 8 मोबाईल, रोख 10 हजार 800, मिरचीपूड, तीन दुचाकी वाहने जप्त केली. यातील बहुतांश आरोपी पोलिसांच्या रेकॉर्डवरील आहेत. त्यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल आहेत.

अधिक माहितीसाठी - नागपुरात विवाहासाठी आता फक्त 27 हजारांचे पॅकेज...खर्च कमी, सुरक्षेची हमी

हे आहेत दरोडेखोर

विकास ऊर्फ सन्नी वर्मा (29, रा. दारोडकर चौक) हा कुख्यात गुंड संतोष आंबेकर याचा भाचा असून तो नुकताच कारागृहातून बाहेर आला आहे. त्याच्यावर 13 गंभीर गुन्हे दाखल आहेत. यापूर्वी त्याला शहरातून हद्दपार केले होते. समीर ऊर्फ अजय चौरसिया (30, रा. भांडेवाडी) याच्या विरुद्ध अपहरण, बलात्काराच्या 3 गंभीर गुन्ह्यासह 6 गुन्हे आहेत. मोहसिन ऊर्फ बबलू खुजली रफीक शेख (30) याच्यावर 13 गंभीर गुन्हे दाखल असून, तो हद्दपार होता. इमरान उर्फ अरमान रौफ खान (26, रा. सद्भावनानगर) याच्याविरुद्ध 8 गुन्हे दाखल आहेत. यापूर्वी एमपीडीएअंतर्गत कारवाई करण्यात आली. गौरव मानमोडे (23, रा. गुरुदेवनगर), सुगत ऊर्फ धम्मदीप बागडे (25, रा. वाठोडा ले-आउट) याच्याविरुद्ध खुनाच्या दोन गुन्ह्यासह 5 गंभीर गुन्हे आहेत. अमर महाले (22, रा. वाठोडा) याच्यावर दुखापतीचे 6 गुन्हे दाखल आहेत. तुषार डहाके (19, रा. गजानननगर) याच्यावर जबरीचोरीच्या गुन्ह्यासह 4 गुन्हे आहेत. विजय चन्ने (40, रा. वाठोडा) याच्यावर दरोड्याच्या गुन्ह्यासह 19 गुन्ह्यांची नोंद आहे. रंजित धनावत (22, रा. जुनी मंगळवारी) याच्यावर खून, खंडणी, जबरी चोरीच्या गुन्ह्यासह 20 गुन्हे आहेत. तो सध्या हद्दपार आहे.

क्लिक करा - मुलींच्या वसतिगृहांच्या इमारतीत चालतयं तरी काय?

ऑपरेशन क्रॅकडाउन टू

आर्थिक कोंडी होत असल्याने गुन्हेगारी वाढत आहे. चोरी, लुटमारी, दरोडा आणि अत्याचार प्रकरणांची संख्या वाढत आहे. गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलिस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी ऑपरेशन क्रॅकडाउन-2 मोहीम सुरू करण्याचे आदेश दिले. याअंतर्गत पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या कुख्यात गुन्हेगारांच्या पोलिसांनी मुसक्‍या आवळल्या. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Don Santosh Ambekar's nephew arrested