राणा बंधू दुहेरी हत्याकांडातील चार आरोपींना जन्मठेप

rana bandhu murder case
rana bandhu murder case

नागपूर : जरीपटक्‍यात घडलेल्या राणा बंधू दुहेरी हत्याकांडातील चार आरोपींना जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. इतर दोन आरोपींना एक महिन्याची शिक्षा सुनावली. परिसरातील नालीच्या सफाईच्या वादातून धारदार शस्त्राने आरोपींनी इमरत राणा आणि ओरनलाल राणा या दोन भावांची हत्या केली होती. प्रशांत अर्जुन चमके (38), अंकुश झनक तोमस्कर (19), झनक मुन्नालाल तोमस्कर (41), शिवमोहन रामकृपाल मल्लिक (23) अशी आरोपींची नावे आहेत. मीना झनक तोमस्कर (37), वंदना हरवीर जैस (30) अशी इतर आरोपींची नावे आहेत. 

मूळचे बालाघाट येथील रहिवासी इमरत राणा आणि त्यांचे भाऊ ओरनलाल राणा कुटुंबीयांसह जरीपटक्‍यातील समतानगर परिसरात रहायचे. घटनेच्या दोन दिवसांपूर्वी आरोपी प्रशांत चमकेचा इमरत राणा यांच्या पत्नीसोबत नालीच्या साफाईवरून वाद झाला. ही बाब इमरत आणि ओरनलाल यांना कळाल्यावर त्यांनी आरोपी प्रशांत चमकेची समजूत काढली. 12 जून 2016 रोजी सकाळी इमरत आणि ओरनलाल राणा घरी होते. याच वेळी आरोपी प्रशांत चमके, त्याचा भाचा अंकुश तोमस्कर, झनक तोमस्कर, शिवमोहन मल्लिक, मीना तोमस्कर, वंदना जैस राणाच्या घरी आले.

काही कळायच्या आत घातक शस्त्र आणि काठ्या घेऊन राणा बंधूंवर तुटून पडले. इमरतची पत्नी वाचविण्यासाठी आली असता आरोपी गीता व वंदना यांनी केस ओढून त्यांना फरफटत नेले. या हल्यात इमरतचे शरीर आरोपींनी छिन्नविछिन्न केले. या हल्ल्यात ओरनलाल मेला असे समजून आरोपी फरार झाले. पोलिसांनी नातेवाइकांच्या मदतीने दोन्ही भावंडांना मेयो रुग्णालयात दाखल केले. मात्र, इमरतला डॉक्‍टरांनी मृत घोषित केले. तसेच, जखमी ओरनलालची सायंकाळी प्राणज्योत मालवली होती. 

सर्व बाजू तपासल्यानंतर न्यायालयाने प्रशांत चमके, अंकुश तोमस्कर, झनक तोमस्कर, शिवमोहन मल्लिक यांना कलम 302, 149 सुसार जन्मठेपेची शिक्षा, 2 हजार रुपये दंड व दंड न भरल्यास 1 वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली. कलम 143 नुसार 3 महिन्यांची साधी शिक्षा, 500 रुपये दंड व दंड न भरल्यास 15 दिवस सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. कलम 148 नुसार 1 वर्षे सश्रम कारावास, 100 रुपये दंड व दंड न भरल्यास 10 दिवसांच्या कारावासाची शिक्षा सुनावली. तर, आरोपी मीना तोमस्कर आणि वंदना जैस यांना कलम 323, 34 नुसार 1 महिन्याच्या साध्या कारावासाची शिक्षा सुनावली.

पोलिस निरीक्षक मुख्तार शेख, पोलिस निरीक्षक खुशाल तिजारे, सहाय्यक पोलिस निरीक्षक केशव वाघ यांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सरकारी वकील म्हणून ऍड. नितीन तेलगोटे यांनी, आरोपीतर्फे ऍड एस. एच. कुरेशी यंनी काम पाहिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com