Inventor : मुलांनो, आता पालकांची चिंता सोडा! नागपुरातील युवकाने तयार केले आजाराची पूर्वसूचना देणारे ‘डोझी’ यंत्र

राजेश रामपूरकर
Friday, 25 December 2020

डॉक्टर आणि परिचारक एका स्क्रीनवर रुग्णांच्या आरोग्यावर दुरस्थपणे देखरेख ठेवू शकतात. त्यामुळे परिचारिकांना प्रत्यक्ष तेथे जाण्याची आणि रुग्णांची तपासणी करण्याची गरज नाही. रुग्णांवर लक्ष केंद्रित करण्यास आणि सुधारित प्रोऍक्टिव्ह काळजी प्रदान करण्यात यांद्वारे मदत होणार आहे. 

नागपूर : करिअरच्या नवनवीन संधी मिळवण्यासाठी देशाबाहेर जाणे अनेकदा अनेक तरुणांसाठी अपरिहार्य ठरते. अशावेळी या मुलांना आपल्या पालकांच्या आरोग्याची चिंता सतावत असते. आता ‘डोझी’ हे नवीन यंत्र चिंतेतून मुक्त करण्यासाठी आले आहे. गादीमध्ये हे यंत्र लावल्यानंतर रिमोटच्या सहायाने शरीराला स्पर्श न करता ॲपद्वारे पालकांच्या आरोग्याची, पालकांना होणाऱ्या आजाराची पूर्वसूचना मिळणार आहे.

कोरोना काळात नागपुरातील मुदित दंडवते या युवकांने रिमोट मॉनिटरिंगच्या माध्यमातून ‘रिअल टाइम बॉडी व्हायटलन्स’ कॅप्चर करणारे ‘कॉन्टॅक्टलेस सेंसर’ गादीमध्ये लावून माणसाच्या हृदयाची गती, श्वसनाची क्षमता आणि ताण तणावासह इतर अनेक आजारांचे ९८.४ टक्के अचुकतेने निरीक्षण करणारे उपकरण तयार केले आहे.

हेही वाचा - वाहन चालकांनो, महामार्गावरील पिवळ्या, पांढऱ्या रेषांचा अर्थ आपणास माहीत आहे ना

याच्या माध्यमातून श्वास घेताना व सोडताना शरीरातील निर्माण होणाऱ्या सूक्ष्म लहरी, मांसपेशीतून मिळणारे ठोके, तसेच काही संसर्ग असल्यास बायोमार्करद्वारे संकेत या यंत्राद्वारे मिळण्यास मदत होईल.

सध्या या ‘डोझी’ यंत्राचा वापर भारतातील ३० पेक्षा अधिक खासगी आणि शासकीय रुग्णालयात केला जात आहे. यामुळे परिचारिका आणि डॉक्टरांना सोयीचे होत आहे. रुग्णसेवेत या यंत्रामुळे वेळ वाचवण्यास मदत होत आहे. विशेष असे की, आतापर्यंत विविध ठिकाणी पाच हजारांपेक्षा अधिक कोरोना बाधित रुग्णांवर या उपकरणाद्वारे देखरेख ठेवण्यात आली आहे.

डॉक्टर आणि परिचारक एका स्क्रीनवर रुग्णांच्या आरोग्यावर दुरस्थपणे देखरेख ठेवू शकतात. त्यामुळे परिचारिकांना प्रत्यक्ष तेथे जाण्याची आणि रुग्णांची तपासणी करण्याची गरज नाही. रुग्णांवर लक्ष केंद्रित करण्यास आणि सुधारित प्रोऍक्टिव्ह काळजी प्रदान करण्यात यांद्वारे मदत होणार आहे. 

अधिक माहितीसाठी - बाजारात स्टूल टाकून रुग्णांना तपासणाऱ्या डॉक्टरांनी वसंतदादा पाटलांनाच दिला होता धक्का

वापर सुरू

नागपूरमधील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) आणि इंदिरा गांधी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल (मेयो) व भारतातील प्रथम कॉन्टॅक्टलेस रिमोट हेल्थ मॉनिटरिंग कंपनीने यात भागीदारी केली आहे. डोझीने रुग्णांच्या निरंतर देखरेखीसाठी आणि वैद्यकीय व्यावसायिकांकडून कुठल्याही प्रकारच्या शारीरिक संपर्काची गरज न बाळगता २६० यंत्र लावले आहे.

संपादन - नीलेश डाखोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dozer machine inform you Prognosis of illness