अन्यायाला वाचा फोडणाऱ्या मूकनायकचा शताब्दी महोत्सव

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 31 जानेवारी 2020

वंचित, शोषितांच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मूकनायक पाक्षिक सुरू केले. या पाक्षिकातून समाजातील वंचितांचे प्रश्न मांडण्याचे काम केले.

नागपूर : तत्कालीन प्रश्न, मानवी मूल्यांना स्थान देण्यासाठी मूकनायकने महत्त्वाची कामगिरी बजावली. मूकनायकतून बाबासाहेबांनी दलितांच्या समस्यांना वाचा फोडण्याचे काम केले, असे प्रतिपादन डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमीचे अध्यक्ष भदन्त नागार्जुन सुरई ससाई यांनी केले.

दीक्षाभूमी येथील डॉ. आंबेडकर महाविद्यालयाच्या मराठी विभागातर्फे मूकनायक शताब्दी महोत्सवानिमित्त आयोजित "डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता' या राष्ट्रीय चर्चासत्राच्या उद्‌घाटनप्रसंगी ते अध्यक्षस्थानावरुन बोलत होते. उद्‌घाटन ज्येष्ठ संपादक सुरेश द्वादशीवार यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमात डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे सदस्य एन. आर. सुटे, विलास गजघाटे, डॉ. आंबेडकर महाविद्यालयाचे प्राचार्य अरविंद भोयर, मराठी विभागप्रमुख प्रा. दीपककुमार खोब्रागडे उपस्थित होते.

सविस्तर वाचा - सायबर फिशिंग ः जामताऱ्याच्या हिटलिस्टवर "महाराष्ट्र'

भदन्त नागार्जुन सुरई ससाई म्हणाले की वंचित, शोषितांच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मूकनायक पाक्षिक सुरू केले. या पाक्षिकातून समाजातील वंचितांचे प्रश्न मांडण्याचे काम केले. ज्येष्ठ संपादक सुरेश द्वादशीवार म्हणाले, नायक हा बोलता असतो. परंतु बाबासाहेबांचा नायक हा मूक होता. समाजाला बोलते करण्यासाठी त्यांनी आपल्या पाक्षिकाला मूकनायक हे नाव दिले. संत तुकारामांचा अभंग ते मूकनायकमध्ये टाकायचे. मूकनायकाच्या पहिल्याच अग्रलेखात त्यांनी देशाला स्वातंत्र्य मिळत असून वंचित वर्ग मागे राहू नये अशी अपेक्षा व्यक्त केली होती. कार्यक्रमात विलास गजघाटे यांनीही आपले विचार व्यक्त केले. प्रास्ताविक प्रा. दीपककुमार खोब्रागडे यांनी केले. संचालन डॉ. रवींद्र तिरपुडे यांनी केले. आभार प्रा. अमित दुर्योधन यांनी मानले.

विचाराची, बोलण्याची संधी प्रत्येकाला हवी
विचार करण्याची आणि बोलण्याची संधी प्रत्येकाला असायला हवी. धर्म आणि समाजाचा प्रश्न येतो तेव्हा शास्त्रीय विचार मागे पडतो. समाजातील दोन चेहऱ्यांच्या माणसांमुळे प्रगती खुंटत चालली असल्याची टीका मेंदूरोगतज्ज्ञ डॉ. चंद्रशेखर मेश्राम यांनी समारोपीय कार्यक्रमात केली. ज्येष्ठ पत्रकार प्रकाश दुबे म्हणाले की, वृत्तपत्र हे शस्त्र आहे, मात्र ते एकांगी नको. भारताला प्रबुद्ध भारत बनविण्यासाठी आपली वाटचाल हवी. महापुरुषांनी तळागाळातील लोकांचा विसर पडू दिला नाही. सर्वसामान्यांना बळ देणारी डॉ. बाबासाहेबांची पत्रकारिता होती. ज्यांचे बोट धरून आपण मोठे झालो, त्याचा विसर पडू देऊ नका, असा विचार ज्येष्ठ पत्रकार श्रीपाद अपराजित यांनी मांडला.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dr. Ambedkar"s Muknayak is in 100 years