डाॅक्टरांच्या रूपात देवच आला धावून, निभावला माणुसकीचा धर्म

Thursday, 24 September 2020

प्रियंकाच्या प्रसूतीची वेळ जवळ आली आणि तिला कोरोनाचे निदान झाले. घरची परिस्थिती बेताची असल्याने सरकारी रुग्णालयाशिवाय पर्याय नव्हता. ती शासकीय रुग्णालयात गेली असता तेथे नव्याने चाचण्या सांगण्यात आल्या. यामुळे अखेर ती खासगी रुग्णालयात गेली. तिथे कुणीही दाद दिली नाही

नागपूर : कोरोना संकटाच्या काळात नागपुरातील विविध रुग्णालयांत प्रसूतीसाठी भटकंती करणाऱ्या एका गर्भवती मातेला दाखल करून घेत एकही रुपया न घेता या कोरोनाबाधित महिलेची सुरक्षित प्रसूती करण्याचा सेवाधर्म डॉ. दंदे रुग्णालयाने जोपासला. प्रियंका असे या गर्भवतीचे मातेचे नाव आहे.

प्रियंकाच्या प्रसूतीची वेळ जवळ आली आणि तिला कोरोनाचे निदान झाले. घरची परिस्थिती बेताची असल्याने सरकारी रुग्णालयाशिवाय पर्याय नव्हता. ती शासकीय रुग्णालयात गेली असता तेथे नव्याने चाचण्या सांगण्यात आल्या. यामुळे अखेर ती खासगी रुग्णालयात गेली. तिथे कुणीही दाद दिली नाही. दुसऱ्या रुग्णालयात अडीच लाखांचा खर्च सांगण्यात आला. प्रियंकाच्या पतीने नातेवाइकांकडे मदतीची विनंती केली. त्यांच्याकडून थोडीफार आर्थिक मदत मिळाली.

अधिक वाचा - रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी औषधे विकत घेऊ नका; आहारतज्ज्ञ डॉ. जयश्री पेंढारकर यांचा सल्ला
 

दरम्यान, बाधित महिला डॉ. दंदे रुग्णालयात आली. या दाम्पत्याने व्यथा सांगून डॉ. सीमा दंदे यांची भेट घेतली. डॉ. दंदे यांनी गर्भवतीला तपासले. तिच्याशी चर्चा केली. आर्थिक परिस्थिती समजून घेतली. यानंतर संचालक डॉ. पिनाक दंदे यांना हे दाम्पत्य भेटले. कोरोना काळात हतबल झालेला पती गर्भवती पत्नीला घेऊन वणवण फिरतोय हे समजल्यानंर डॉ. दंदे यांनी महिलेस मदत करण्यात येईल, असे आश्वस्त केले.

डॉ. दंदे फाउंडेशन व डॉ. दंदे हॉस्पिटलच्या पथकाने या महिलेची प्रसूती निःशुल्क करण्याचा निर्णय घेतला. २४ सप्टेंबर गुरुवारी तिची शस्त्रक्रियेने प्रसूती करण्यात आली. आई व बाळ दोघेही सुखरूप आहेत. प्रसूतीसाठी स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. वैशाली चांगोले, बालरोगतज्ज्ञ डॉ. मिलिंद मंडलिक, भूलतज्ज्ञ डॉ. गिरीश ठाकरे, गीता सिस्टर यांची साथ लाभली. प्रियंकाची सुरक्षित प्रसूती झाल्याचे सांगताच तिच्या पतीचे डोळे पाणावले. डॉ. सीमा आणि डॉ. पिनाक दंदे यांना दोन्ही हात जोडून आभार मानले.

 

कर्तव्य पार पाडणे हाच धर्म
सामाजिक बांधीलकी जोपासताना विविध सामाजिक उपक्रमांमध्ये आमचा नेहमीच सहभागही असतो. डॉक्टर म्हणून कर्तव्य पार पाडणे हाच या व्यवसायाचा धर्म आहे. माणूस म्हणून आपले कर्तव्य आहे. आमच्या दृष्टीने आम्ही डॉक्टरच्याच भूमिकेत आहोत.
-डॉ. सीमा व डॉ. पिनाक दंदे, संचालक, डॉ. दंदे हॉस्पिटल, नागपूर. 

संपादन  : अतुल मांगे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dr. Dande couple Delivery Corona Infected moterh not take money