तुकाराम मुंढे यांचे खासमखास डॉ. गंटावार यांना मिळाले प्रमोशन; त्यांच्यावर अपसंपदेचा गुन्हा

राजेश चरपे
Friday, 9 October 2020

महापौर जोशी यांनी त्यांना निलंबित करण्याचे आदेश दिले होते. मात्र, तत्कालीन आयुक्त मुंढे यांनी यास स्पष्ट नकार दिला होता. त्यानंतरच लाचलुचपत विभागाने त्यांच्या घरी धाड टाकली होती. ॲलेक्सिस इस्पितळात काही गुंडांना घेऊन त्यांनी धाड टाकल्याचाही संशय व्यक्त केला जातो. साहील सय्यदला याच प्रकरणात अटक करण्यात आली आहे.

नागपूर : महापौरांनी निलंबित करण्याचे आदेश दिलेल्या डॉ. प्रवीण गंटावार यांच्यावर कारवाई करण्याऐवजी महापालिकेने आरोग्य अधिकारी म्हणून अतिरिक्त पदभार सोपवून त्यांना पदोन्नती दिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. विशेष म्हणजे त्यांच्यावर लाचलुचपत खात्याने अपसंपदेचा गुन्हा दाखल केला आहे.

माजी आयुक्त तुकाराम मुंढे यांचे खासमखास समजले जाणारे गंटावारांच्या पदोन्नतीच्या प्रस्तावाला विद्यमान आयुक्त राधाकृष्णन बी यांनी मान्यता दिल्याचे कळते. महापालिकेच्या इंदिरा गांधी रुग्णालयात सहायक आरोग्य अधिकारी (जनरल सर्जन) या पदावर गंटावार कार्यरत आहेत. मुंढे आयुक्त म्हणून आल्यानंतर ते अचानक प्रकाशझोतात आले. त्यांना कोव्हीडचे समन्वयक करण्यात आले होते. त्यांची वागणूक, नगरसेवकांना उद्धट उत्तर देत असल्याने महापौर संदीप जोशी यांच्यासह सर्वच नगरसेवक त्यांच्यावर नाराज होते.

जाणून घ्या - हृदयद्रावक...रात्री सव्वा अकरा वाजता मायलेकींनी रेल्वे रुळावर झोपून संपविली जीवनयात्रा

त्यांच्या उद्धट वागणुकीचा फटका ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी यांनाही बसला होता. महापालिकेच्या सभेत गंटावार व पत्नीचे गैरव्यवहार तिवारी यांनी चव्हाट्यावर आणले होते. महापौर जोशी यांनी त्यांना निलंबित करण्याचे आदेश दिले होते. मात्र, तत्कालीन आयुक्त मुंढे यांनी यास स्पष्ट नकार दिला होता. त्यानंतरच लाचलुचपत विभागाने त्यांच्या घरी धाड टाकली होती. ॲलेक्सिस इस्पितळात काही गुंडांना घेऊन त्यांनी धाड टाकल्याचाही संशय व्यक्त केला जातो. साहील सय्यदला याच प्रकरणात अटक करण्यात आली आहे.

हेही वाचा - व्हॉट्सॲप ग्रुपवर कमेंट करणे जीवावर बेतले; घरात घुसून युवकाचा खून

डॉ. गंटावार व पत्नी एकाच ठिकाणी कार्यरत आहेत. पत्नीच्या सेवा पुस्तिकेची मागणी केल्यानंतरही ती सभागृहाला उपलब्ध करून देण्यात आली नव्हती. त्या मध्यप्रदेशात दुसऱ्याच नावाने काँग्रेसच्या नेत्या म्हणून वावरतात. काँग्रेसच्या नेत्यांसोबत असलेले फलकही दयाशंकर तिवारी यांनी महापालिकेच्या सभागृहात झळकावले होते.

संपादन - नीलेश डाखोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dr. Gantawar Corporation Health Officer