खुशखबर!! ड्रॅगन पॅलेस टेम्पल स्थापनादिनी जनतेसाठी खुले करणार; तयारी अंतिम टप्प्यात

सतीश दहाट 
Sunday, 15 November 2020

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, बुध्द जयंती, धम्मचक्र प्रवर्तन इत्यादी कार्यक्रम मर्यादित पदाधिकारी व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत ड्रॅगन पॅलेस टेम्पल येथे संपन्न झाले. ड्रॅगन पॅलेस टेम्पलला प्रवेश बंद असल्यामुळे टेम्पलच्या नूतनीकरणाचे काम सुरू करण्यात आले.

कामठी (जि. नागपूर): कोरोनाच्या प्रार्दुभावामुळे संपूर्ण देशात मार्चपासून लॉकडाउन जाहीर करण्यात आले होते. शैक्षणिक संस्थांसह सर्व धार्मिक स्थळसुध्दा लोकांच्या प्रवेशाकरिता बंद करण्यात आले होते. पवित्र दिक्षाभूमींसह विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस टेम्पलसुध्दा लोकांकरिता बंद होते. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, बुध्द जयंती, धम्मचक्र प्रवर्तन इत्यादी कार्यक्रम मर्यादित पदाधिकारी व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत ड्रॅगन पॅलेस टेम्पल येथे संपन्न झाले. ड्रॅगन पॅलेस टेम्पलला प्रवेश बंद असल्यामुळे टेम्पलच्या नूतनीकरणाचे काम सुरू करण्यात आले. त्यामध्ये प्रामुख्याने ड्रॅगन पॅलेस टेम्पलच्या छतावर असलेले जुने इटालीयन मोजॅक टाईल्स हे पूर्ण पणे काढून नवीन इटालीयन मोजॅक टाईल्स लावण्यात आले. या कामाकरिता राजस्थान येथील कुशल कारागीरांनी हे टाईल्स लावण्याचे काम गेल्या सहा महिन्यांपासून केले व हे काम आता अंतिम टप्प्यात आहे.

हेही वाचा - आता दुपारच्या वेळी बिनधास्त झोपा; 'हे' आहेत दुपारी झोपण्याचे फायदे

तसेच ड्रॅगन पॅलेस टेम्पल येथील २० वर्षापूर्वी चार एकर जागेवर लावण्यात आलेले लॉनचे नूतनीकरण करण्यात आले आहे. तसेच जुना लॉन काढून नवीन लॉन लावण्याचे काम ड्रॅगन पॅलेस टेम्पलच्या समोर असलेल्या बगीच्याचे सुशोभिकरण करण्यात आले. पॅलेस टेम्पल परिसरात असलेले फवाऱ्यांचे नूतनीकरण व रंगबिरंगी लाईटिंगने सजविण्यात आले आहेत.

ड्रॅगन पॅलेस टेम्पल येथे भेट देणाऱ्या पुरूष व महिलांकरिता वेगवेगळे नवीन स्वच्छतागृह बांधण्यात आले आहे. टेम्पल परिसर हा नवीन स्वरूपात लोकांकरिता उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न टेम्पलच्या प्रमुख व ओगावा सोसायटीच्या अध्यक्षा अॅड. सुलेखाताई कुंभारे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे.

सविस्तर वाचा - ऐन लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तिघा भावांचे मृतदेह बघून अख्खे गाव हळहळले; तलावात बुडून झाला मृत्यू

ड्रॅगन पॅलेस टेम्पलचे काही कामे अंतिम टप्प्यात असल्यामुळे शासनच्या निर्णयाप्रमाणे सोमवारपासून सुरू न करता ३० नोव्हेंबरपासून सुरू करण्यात येईल.कार्तिक पौर्णिमेच्या पावन पर्वावर ३० नोव्हेंबर रोजी ड्रॅगन पॅलेस टेम्पलचा २१ व्या वर्धापन दिन साजरा करण्यात येणार आहे. याच वर्धापन दिनापासून लोकांकरिता ड्रॅगन पॅलेस टेम्पलमध्ये प्रवेश सुरू करण्यात येईल, अशी माहिती ड्रॅगन पॅलेस टेम्पलच्या प्रमुख व ओगावा सोसायटीच्या अध्यक्षा अॅड. सुलेखाताई कुंभारे यांनी पत्रकाद्वारे दिली.

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: dragon palace will be open on foundation day