शासकीय दंत महाविद्यालयात दंत व्यंगोपचारामागे अर्थकारण?

केवल जीवनतारे
मंगळवार, 21 जानेवारी 2020

यासाठी रुग्णांच्या दातांवर विशिष्ट ब्रॅकेट अर्थात क्‍लिप चिटकवून वायर्सच्या साहाय्याने दातांवर दाब दिला जातो. मात्र, यासाठी नियमबाह्य पद्धतीने रुग्णांकडून वसुली केली जात असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. विशेष असे की, दंत व्यंगोपचारातून दातांना सौंदर्य प्राप्त होते. मात्र, या अर्थकारण शिजत असल्याची शंका येथे व्यक्त केली जात आहे.

नागपूर : विस्कळीत, पुढे आलेल्या किंवा वाकड्या दातांमुळे चेहऱ्याचा ढासळलेला तोल व्यक्तीच्या मनात न्यूनगंडाची भावना निर्माण करू शकतो. न्यूनगंड आल्यास व्यक्तीच्या सर्वांगीण विकासात बाधा येते. यावर मात करण्यासाठी शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयात दंत व्यंगोपचार (ऑर्थोडॉन्टिक ट्रीटमेंट) होतात.

अवश्य वाचा  - मैत्रीणीच्या लग्नात डीजेवर धरला ठेका अन निघाल्या तलवारी

यासाठी रुग्णांच्या दातांवर विशिष्ट ब्रॅकेट अर्थात क्‍लिप चिटकवून वायर्सच्या साहाय्याने दातांवर दाब दिला जातो. मात्र, यासाठी नियमबाह्य पद्धतीने रुग्णांकडून वसुली केली जात असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. विशेष असे की, दंत व्यंगोपचारातून दातांना सौंदर्य प्राप्त होते. मात्र, या अर्थकारण शिजत असल्याची शंका येथे व्यक्त केली जात आहे.

शासकीय दंत महाविद्यालयात डिजिटल तंत्राचा आधार घेऊन शल्यक्रियेचे अचूक नियोजन करीत दातांमधील व्यंग दूर करणे सहज शक्‍य झाले आहे. मात्र, यासाठी वापरण्यात येणारे "ब्रॅकेट किट' (क्‍लिप्स) शासनाकडून उपलब्ध होत नाही. अद्याप शासनाकडून बाबाआदमच्या जमान्यातील बेग अप्लायन्सेस उपलब्ध करून दिली जातात. या क्‍लिप्स कालबाह्य झाल्या आहेत. मात्र, अद्याप गरीब

शासनाकडून मिळत नाही ब्रॅकेट कीट

बीपीएलग्रस्तांवरील उपचारासाठी हेच साहित्य वापरतात. मात्र, यावर दंतच्या व्यंगोपचार विभागाने अफलातून प्रयोग सुरू केला आहे. उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांकडून "ब्रॅकेट' (क्‍लिप्स) खरेदी करण्याची नियमबाह्य पद्धती सुरू केली आहे. पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे पदव्युत्तर विद्यार्थी रुग्णांकडून तीन हजार, साडेतीन हजार, 4 हजार, 7 हजार, 6 हजार 800 रुपयांची मागणी करून ब्रॅकेट किट खरेदी करतात. ही एकप्रकारे अवैध वसुली आहे. विशेष असे की, पदव्युत्तर विद्यार्थी (डॉक्‍टर) मागणीनुसार पैसे देत असल्याचे रुग्णांकडून एका चिठ्ठीवर लिहून घेत असल्याची माहिती आहे. एका रुग्णाने केलेल्या तक्रारीद्वारे, दंत व्यंगोपचार विभागात अवैधरीत्या होत असलेल्या या खरेदीतून टक्‍क्‍यांचे अर्थकारण कुठपर्यंत पोहोचते, अशी जोरदार चर्चा दंतच्या वर्तुळात आहे. विशेष असे की, दंत व्यंगोपचार लहान मुलांप्रमाणे प्रौढांवरही करता येतात. यामुळे या विभागात प्रचंड गर्दी असते. वर्षभरात विभागात सुमारे पाचशे ते साडेपाचशे रुग्णांकडून अशी वसुली केली जाते.

दंत व्यंगोपचार विभागातील 104 क्रमांकाच्या विभागातून विद्यार्थ्यांमार्फत ही खरेदी प्रक्रिया होते. ही खरेदी प्रणाली राबविताना एकाच ब्रॅंडचे तसेच एकाच एजंटकडून खरेदी होत असल्याची चर्चा येथे रंगते. अधिष्ठाता डॉ. मंगेश फडनाईक यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या प्रकरणाची चौकशी करण्यात येईल तसेच विद्यार्थ्यांच्या माध्यमातून रुग्णांशी अर्थव्यवहार करणे योग्य नाही, असे सांगितले.

माहिती घेतल्यानंतर चर्चा करतो
शासनाकडून ब्रॅकेट किट खरेदीची प्रक्रिया सुरू आहे. मात्र, उपचारादरम्यान विद्यार्थ्यांमार्फत असे खरेदीचे प्रकार होऊ नये. यासंदर्भात माहिती घेतल्यानंतर चर्चा करतो.
- डॉ. विवेक पाखमोडे, सहसंचालक (दंत) वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभाग, मुंबई


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The Economy behind Dental Cure at Government Dental College?