ऐकावे ते नवलच! वारंवार सिग्नल जम्प करणाऱ्या वाहनचालकावर आली ऐंशी चालान भरण्याची नामुष्की

अनिल कांबळे
Friday, 6 November 2020

पीआय खापरे यांनी चालकाला तब्बल ८० चालान ठोकले. त्याला दंडाची रक्कम ताबडतोब भरण्यास सांगितले. वाहनाच्या चालकाने चूक कबूल केली. ८० चालानचा १८ हजार ८०० रुपये दंड चालकाकडून वसूल करण्यात आला. यानंतर कोणताही सिग्नल जम्प करणार नाही, असे आश्‍वासन चालकाने दिले.

नागपूर : एक वाहन वारंवार सिग्नल जम्प करीत होते तसेच मर्यादेपेक्षा जास्त वेगाने धावत होते. वाहतूक पोलिसांना गुंगारा देत चालक वाहतुकीचे नियम तोडत होता. मात्र, तो सक्करदरा वाहतूक पोलिसांच्या तावडीत सापडला आणि त्याची कुंडलीच बाहेर आली. त्यात तब्बल ८० वेळा त्याने वाहतूक नियमांचा भंग केल्याचे दिसताच वाहनचालकाला ८० चालान ठोकून १८ हजार ८०० रुपये दंड वसूल करण्यात आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाहतूक शाखेचे नवनियुक्त पोलिस उपायुक्त सारंग आवाड यांनी शहरातील वाहतूक व्यवस्थेचा आढावा घेतला. त्यानंतर विशेष अभियान राबविण्याचे आदेश दिले. त्यानुसार सक्करदरा वाहतूक शाखेच्या पोलिस निरीक्षक आशालता खापरे या पथकासह खरबी चौकात वाहतूक नियंत्रित करीत होत्या.

अधिक वाचा - बेपत्ता 'वीर' 12 तासांत आढळला; घुग्घुस ते नागपूर प्रवासाचे गूढ गुलदस्त्यात

दरम्यान, एमएच ४६ बीबी १२३१ क्रमांकाचे वाहन भरधाव येताना दिसले. वाहतूक पोलिसांना बघून चालक आणखी भरधाव वाहन पळवत होता. वाहतूक पोलिसांना वाहनाचा पाठलाग केला आणि काही अंतरावर वाहनाला थांबविले. वाहनाला ताब्यात घेऊन वाहतूक शाखेत नेण्यात आले. ई-डीव्हाईसमधून वाहनाची माहिती संकलित केली असता आतापर्यंत या वाहनाने ७९ वेळा वाहतूक नियम तोडले असल्याचे समोर आले.

पीआय खापरे यांनी चालकाला तब्बल ८० चालान ठोकले. त्याला दंडाची रक्कम ताबडतोब भरण्यास सांगितले. वाहनाच्या चालकाने चूक कबूल केली. ८० चालानचा १८ हजार ८०० रुपये दंड चालकाकडून वसूल करण्यात आला. यानंतर कोणताही सिग्नल जम्प करणार नाही, असे आश्‍वासन चालकाने दिले. शहर वाहतूक शाखेतील आजवरची ही सर्वात मोठी कारवाई ठरली.

जाणून घ्या - नियम शिथिल नागरिक बिनधास्त! वाहनांचा वेग वाढला; अनेकांना गमवावा लागतोय जीव

वाहतूक नियमांचे पालन करा
वरिष्ठांच्या आदेशाने विशेष अभियान राबविणे सुरू आहे. शहरात सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत. त्यामुळे वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे. ई-डीव्हाईसमध्ये चालानची नोंद होत असते. त्यामुळे आज आम्ही ताब्यात घेतलेल्या वाहनावर तब्बल ७९ चालान ॲड झाले होते. नागरिकांनी दंडाच्या रकमेपासून वाचण्यासाठी वाहतूक नियमांचे पालन करावे.
- आशालता खापरे,
महिला पोलिस निरीक्षक, सक्करदरा वाहतूक शाखा

संपादन - नीलेश डाखोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Eighty challans hit the same vehicle by the traffic police