वादळांना शांत करण्याच्या प्रयत्नांचा प्रयोग

zunj.
zunj.

नागपूर : माणूस कीर्ती मिळविण्याच्या नादात वाटेल तसा वागतो. राष्ट्रीय पुरस्काराचा धनी होण्यासाठी कोणत्याही थराला जाण्यास तयार होतो. कृत्य करतो अन्‌ क्षणार्धात विसरतोही. प्रत्येकानेच थोडी बहुत अशी कृत्ये केली असतीलच. पण विचार करा, माणुसकीचा अंत पाहणाऱ्या कृत्याची आठवण यशाच्या विशिष्ट उंचीवर गेल्यानंतर कोणी करून देणारा भेटला तर काय होईल ? सामान्य माणसाच्या आयुष्यात उठलेल्या असंख्य वादळांना शांत करण्याच्या प्रयत्नांचा प्रयोग म्हणजे "एक झुंज वाऱ्याशी'.
नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाच्या भारत रंग महोत्सवाचे रविवारी उद्‌घाटन झाले. या महोत्सवात पुढील सात दिवस नागपूरकर रसिकांना सांस्कृतिक मेजवानी अनुभवता येणार असून, महोत्सवाचा पडदा पु. ल. देशपांडे अनुवादीत "एक झुंज वाऱ्याशी' नाट्यप्रयोगाने उघडला. मूळ रशियन नाटकाचा हा अनुवाद रसिक श्रोत्यांच्या मनात स्वतंत्र स्थान निर्माण करतो. हा नाट्यप्रयोग अस्सल मराठी मातीतला वाटत असून, पात्रांची निवड, वातावरण, घटना, संघर्ष, विचार व प्रयोगाची मांडणी सारेच जणू तुमच्या-आमच्या जीवनाचा एक भाग आहे की काय ? असे वाटते.

सविस्तर वाचा - पोलिस अधिकाऱ्यांची चलाखी, आवडीच्या ठिकाणी होतात उशिरा रुजू
रशियन नाटककार व्हॅलादलीन दोझोर्त्सेव यांच्या "द लास्ट अपॉइंटमेंट' या इंग्रजी नाटकाचा पु. ल. देशपांडे यांनी मराठीत अनुवाद म्हणजे "एक झुंज वाऱ्याशी'. पुलंच्या खास शैलीत या नाटकाचा बाज असून, मूळ नाटकाप्रमाणेच असामान्य संघर्ष हाच "एक झुंज वाऱ्याशी' या नाट्यकृतीचा गाभा आहे. आपल्या लिखाणातून कायम विनोदी शैलीचे दर्शन घडविणाऱ्या पुलंनी रसिक प्रेक्षकांना एका वेगळ्या विश्‍वात गुंतवले. राष्ट्रीय पुरस्कारासाठी वाटेल त्या थराला जाऊन रुग्णांच्या जीवाशी खेळणारा डॉक्‍टर, त्याने केलेल्या प्रत्येक कृत्याचा छडा लावण्याचा प्रामाणिक पत्रकाराचा प्रयत्न आणि या प्रयत्नामुळे पत्रकाराने गमावलेली नोकरी या विषयावर रसिकप्रेक्षकांना तब्बल दोन तास खिळवून ठेवणारा हा नाट्यप्रयोग. डॉक्‍टर अनेक कृत्य करून उपमुख्यमंत्री होतो खरा पण त्याच्याच कृत्यांची आठवण करून देण्यासाठी एक सामान्य माणूस त्याच्या कार्यालयात पोचतो अन्‌ उडते शाब्दिक चकमक. हाच या नाटकाचा गाभा आहे. संवादाची उत्तम बांधणी प्रसंग प्रत्यक्षात जीवंत करीत होती.
मुंबईतील एनसीपीएच्या रंगभूमी प्रकल्पासाठी नाटक पुलंना सादर करायचे होते. "माझा जवळचा मित्र रमेश राजहंस यांनी माझ्याकडे मूळ नाट्यसंहिता दिली अन्‌ मी झपाटल्यासारखा झालो', अशी आठवण पु. ल. देशपांडे सांगत. विशेष म्हणजे ही संहिता पुलंनी एक दोन नव्हे तर वारंवार वाचली अन्‌ याच नाटकाचा अनुवाद करायचे ठरवले. "एक झुंज वाऱ्याशी' ही नाट्यसंहिता पुलंच्या खास ठेवणीतील असली तरी ती अनुवादित करताना डॉ. अशोक रानडे यांचे त्यांना सहकार्य लाभले आहे.
सन 1988 मध्ये ज्येष्ठ नाट्यकर्मी पद्मश्री वामन केंद्रे यांनी दिग्दर्शित केलेली ही नाट्यकृती आज श्रीनिवास नार्वेकर यांनी तितक्‍याच दमदारपणे दिग्दर्शित केली आहे. बाबा पार्सेकर यांचे नेपथ्य व सिद्धेश नांदलस्कर यांच्या प्रकाशयोजनेने भारंगमच्या आयोजनाची उंची वाढली असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. पात्रांमध्ये डॉ. देशमुख ही भूमिका आशिष भिडे, डॉ. चौधरी यांची भूमिका आशुतोष घोरपडे, कॉमन मॅनची भूमिका श्रीनिवास नार्वेकर यांनी तर चित्राची भूमिका शोभना मयेकर यांनी साकारली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com