पोलिस अधिकाऱ्यांची चलाखी; आवडीच्या ठिकाणी होतात उशिरा रुजू

अनिल कांबळे
Sunday, 9 February 2020

पोलिस अधिकाऱ्यांच्या सुपिक डोक्‍यातून निघालेल्या क्‍लृप्तीमुळे जवळपास एका वर्षाचा कालावधी आवडत्या शहरात घालवायला मिळत असल्याने अन्य अधिकाऱ्यांवर अन्याय होत असल्याची भावना निर्माण होते. अनेक अधिकारी बदल्यांबाबत नाराजी व्यक्‍त करतात.

नागपूर : आवडीच्या ठाण्यात बदली झाल्यावर तेथे आणखी काहीकाळ राहाता यावे यासाठी अनेक पोलिस अधिकारी उशिरा रुजू होतात. बदलीचा वहित कालावधी टळल्याने पुढील वर्षीच बदलीसाठी विचार केला जातो. हा फंडा अनेक अधिकारी वापरत असल्याचे समोर आले आहे. 

पोलिस महासंचालक कार्यालयाच्या वतीने सर्वसाधारण बदल्यांसाठी (जीटी) तीन वर्गवारी ठरविल्या जातात. यामध्ये विहित कालावधी पूर्ण झाल्याने बदली होणे, कालावधी पूर्ण नसल्यानंतरही मुदतपूर्व बदलीसाठी लेखी विनंती आणि प्रतिकुल अहवालावरून बदली करण्यात येते. ज्या पोलिस उपनिरीक्षक, सहायक निरीक्षक आणि पोलिस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांचा कालावधी पोलिस परीक्षेत्रात आठ वर्षे, मुंबई आयुक्‍तालयात 8 वर्षे मुंबई व्यतिरिक्‍त आयुक्‍तालयात 6 वर्षे सेवा बजावली आहे, अशा पोलिस अधिकाऱ्यांची बदलीची यादी 31 मे या तारखेपूर्वीच मागविण्यात येते. याच तारखेला बदलीसुद्धा केली जाते. 

हेही वाचा -  लाखनीत झाला शिक्षिकेच्या अपहरणाचा प्रयत्न; आरोपी व्हॅनटालकास अटक

मात्र, बदली झालेल्या ठिकाणावर केव्हा रुजू व्हावे, याबाबत पोलिस अधिकारी आपापल्या सोयीने निर्णय घेतात. जर आवडीच्या शहरात बदली झाली असेल तर बुद्धीचातुर्याचा वापर करणारे पोलिस अधिकारी जाणूनबुजून 10 ते 20 दिवस उशिरा रुजू (आमद) होतात. त्यामुळे रुजू झाल्याच्या दिनांकापासून त्या पोलिस अधिकाऱ्याची सेवा ग्राह्य धरली जाते. उशिरा रुजू होणाऱ्या अधिकाऱ्यांची नावे परीक्षेत्रात 6 वर्षांच्या सेवेचा कार्यकाल पूर्ण न झाल्याचे दर्शविण्यात येते. त्यामुळे तो अधिकारी पुन्हा एका वर्षांपर्यंत सार्वत्रिक बदलीस पात्र ठरत नाही. 

पोलिस अधिकाऱ्यांच्या सुपिक डोक्‍यातून निघालेल्या क्‍लृप्तीमुळे जवळपास एका वर्षाचा कालावधी आवडत्या शहरात घालवायला मिळत असल्याने अन्य अधिकाऱ्यांवर अन्याय होत असल्याची भावना निर्माण होते. अनेक अधिकारी बदल्यांबाबत नाराजी व्यक्‍त करतात. पोलिस अधिकाऱ्यांची ही चलाखी ओळखून गृहमंत्रालयाने बदली झालेल्या दिवसापासूनच सेवेचा कार्यकाल ग्राह्य धरल्यास वेळेवर रुजू होणाऱ्या अधिकाऱ्यांची संख्या वाढण्याची शक्‍यता आहे.

क्लिक करा - जात होते डॉक्टरकडे, वाटेत कर्दनकाळ ठरला ट्रक..

वरिष्ठ सोडत नाहीत हो...

जर पोलिस अधिकाऱ्याची बदली नावडत्या ठिकाणी (गडचिरोली किंवा नक्षलग्रस्त भाग) झाल्यास तर लगेच बदलीच्या ठिकाणी आमद दिली जाते. जेणेकरून सार्वत्रिक बदलीच्या (जीटी) यादीत लगेच समावेश व्हावा. परंतु, अनेकदा पोलिस उपनिरीक्षक किंवा सहायक निरीक्षकांना वरिष्ठ पोलिस अधिकारी बदली होताच "रिलिव्ह' करीत नाहीत. त्यामुळे अनेकांना उशिरा रूजू होण्याचा फटकाही बसतो. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police come late to the place of interest