
सुरुवातीला नागपूर आणि सहा जिल्ह्यांतील मतपेट्या एकत्र करण्यात आले. त्यात २५ मतपत्रिकांचे गठ्ठे तयार करून एकूण मतदान मोजण्यात आले. या संपूर्ण प्रक्रियेला दुपारचे दोन वाजले. त्यानंतर दुपारी तीन वाजता २८ टेबलांवर एक हजार याप्रमाणे मोजणीला सुरुवात झाली.
नागपूर : नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघात ऐतिहासिक निकाल लागला. मात्र, दीड लाखांच्या मतपत्रिका मोजायला तब्बल ३० तास लावून निवडणूक विभागानेसुद्धा ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली. पदवीधरऐवजी लोकसभेची निवडणूक असती आणि याच गतीने मोजणी झाली असती तर निकालासाठी किमान पाच दिवसांची प्रतीक्षा करावी लागली असती.
मतमोजणीला गुरुवारी सकाळी आठ वाजता मानकापूर येथील विभागीय क्रीडा संकुलात सुरुवात झाली. मात्र, अधिकृत निकाल यायला दुसरा दिवस उजाडला. नागपूर विभागातील सहाही जिल्ह्यात एकूण एक लाख ३२ हजार ९२३ पहिल्या पसंतीक्रमातील मतांच्या मोजणीनंतर दुसऱ्या पसंतीक्रमासाठी २४ हजार २२० अशा एकूण एक लाख ५१ हजार १४३ मतांच्या मोजणीसाठी प्रशासनाला ३० तासांचा कालावधी लागला.
विभागीय आयुक्त संजीव कुमार यांनी बुधवारी (ता. २) सायंकाळी ५ वाजेपर्यंत कल पुढे येईल, असे सांगितले होते. प्रशासनाकडून मतमोजणीसाठी सुसज्ज यंत्रणा असल्याचा दावा त्यांनी केला होता. मोजणीची रंगीत तालीमही करण्यात आली होती. प्रत्यक्षात त्यांचा दावा फोल ठरला. सकाळी ८ वाजता मोजणीला सुरुवात होऊनही सायंकाळी साडेसहापर्यंत पहिल्या फेरीची आकडेवारी प्रशासनाकडे तयार नव्हती. आठ ते दुपारी एकपर्यंत गठ्ठे बांधण्याचेच काम झाले.
सुरुवातीला नागपूर आणि सहा जिल्ह्यांतील मतपेट्या एकत्र करण्यात आले. त्यात २५ मतपत्रिकांचे गठ्ठे तयार करून एकूण मतदान मोजण्यात आले. या संपूर्ण प्रक्रियेला दुपारचे दोन वाजले. त्यानंतर दुपारी तीन वाजता २८ टेबलांवर एक हजार याप्रमाणे मोजणीला सुरुवात झाली.
कर्मचाऱ्यांची गती संथ असल्याने पहिल्या पसंतीक्रमातील २८ हजार मतांच्या पहिल्या फेरीची आकडेवारी यायला सायंकाळी सात वाजले. यानंतर रात्री दहा वाजता दुसऱ्या तर तिसऱ्या फेरीच्या निकालाला रात्री बारा वाजले. त्यानंतर चौथ्या फेरीचा निकाल रात्री उशिरा दोन वाजता देण्यात आला.
मोजणी तसेच फेऱ्यांच्या अधिकृत आकडेवारीसाठी प्रचंड विलंब होत असल्याने विभागीय आयुक्त संजीव कुमार चांगलेच चिडले होते. त्यांनी कर्मचाऱ्यांना तंबीही दिली. दुसरीकडे मतमोजणीच्या कासवगतीवर उमेदवारांसह कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली. यंत्रणेवर बरेच आक्षेप घेण्यात आले.
संपादन - नीलेश डाखोरे