महाकृषी ऊर्जा अभियानाचा धडाका, पहिल्याच दिवशी ४४० शेतकऱ्यांना कृषी वीजजोडणी

electric connection gives to 440 farmers at farm in nagpur
electric connection gives to 440 farmers at farm in nagpur

नागपूर : महाकृषी ऊर्जा अभियानाची नागपूर परिमंडळात धडाकेबाज सुरुवात झाली आहे. पहिल्याच दिवशी तब्बल ४४० शेतकऱ्यांना कृषीजोडण्या देऊन पाटात पाणी पोहोचविण्याची व्यवस्था करण्यात आली. 

प्रलंबित कृषीजोडण्यासंदर्भात शेतकऱ्यांची ओरड वर्षानुवर्षे सुरू आहे. ही समस्या मार्गी लावण्यासाठी राज्य सरकारने कंबर कसली आहे. नागपूर परिमंडळाचा विचार केल्यास सुमारे ८ हजार कृषीजोडण्या प्रलंबित आहेत. त्यातील ३० मीटरच्या आतील कृषीपंपांना तातडीने जोडणी देण्याचे निर्देश संबंधितांना देण्यात आले असून महावितरणने अंमलबजावणीही सुरू केली आहे. बुधवारी एकाच दिवसात नागपूर परिमंडळातील नागपूर शहर-५, ग्रामीण -२२० व वर्धा जिल्ह्यात-२१५ अशा एकूण ४४० शेतांमध्ये वीजजोडण्या देण्यात आल्या. त्यात महावितरणच्या मौदा व मोहपा उपविभागीय कार्यालयाकडून सर्वाधिक प्रत्येकी ३२ जोडण्या देण्यात आल्या. त्यापाठोपाठ भिवापूर-२४, रामटेक - २३, सावनेर-२२, कुही-१४, सावरगाव -१४, कन्हान-१३, कळमेश्वर-१०, कामठी-७, उमरेड-६, पारशिवणी -६, खापरखेडा -५, काटोल- ५, जलालखेडा- ५, नरखेड-२, बुटीबोरी-२, हिंगणा-२ व हुडकेश्वरमध्ये १ जोडण्या देण्यात आल्या आहेत. 

पहिल्या टप्प्यात वीजखांबापासून ३० मीटरच्या आत वीजजोडणीचा अर्ज असल्यास त्यांना तातडीने जोडणी दिली जाणार आहे. १९ फेब्रुवारीपर्यंत राज्यातील १० हजार शेतकऱ्यांना वीजजोडण्या देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. पुढच्या टप्प्यात ३० ते २०० मीटरपर्यंत अंतर असणाऱ्या शेतांपर्यंत केबल टाकून वीजजोडणी दिली जाणार आहे. त्यासाठी शेतकऱ्याने खर्च उचलल्यास खर्चाची रक्कम बिलातून वजा करून दिली जाणार आहे. यापूर्वीच्या सरकारच्या कार्यकाळात शेतीला पारंपरिक कृषीजोजणी देणे बंद करून उच्चदाब वितरणप्रणाली अंतर्गत जोडण्या देण्याची योजना सुरू केली होती. परंतु, त्यासाठी येणारा खर्च शेतकऱ्यांसाठी अडचणीची बाब ठरला होता. आता पारंपरिक पद्धतीसोबतच शेतकऱ्यांना सौरपंपांचेही वाटप सुरू करण्यात आले आहे. 

नवे कृषिधोरण शेतकऱ्यांच्या हिताचे आहे. अस्तित्वातील वीज यंत्रणेपासून ३० मीटर अंतरावर ताताडीने जोडणी दिली जाईल. पुढच्या टप्प्यातही २०० मीटर अंतरापर्यंतच्या शेतींना जोडण्या दिल्या जातील. या योजनेसह वीजबिलातही मोठी सवलत दिली जात आहे. त्याचाही शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा. 
-दिलीप दोडके, मुख्य अभियंता, नागपूर परिमंडळ, महावितरण. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com