आता सर्व उपग्रहांची स्थिती माहिती करणे होणार शक्य, नागपुरातील विद्यार्थ्यांची भन्नाट आयडिया

मंगेश गोमासे
Friday, 29 January 2021

जी.एच. रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेले नॅनो सॅटेलाईट वजन ३३० ग्रॅम असून लांबी व रुंदी १० सेंटीमिटर आहे. याशिवाय उंची ३.३ सेंटीमिटर आहे. हा 'नॅनो सॅटेलाईट' जमिनीपासून ४०० किलोमिटर अंतरावर पृथ्वीभोवती फिरेल.

नागपूर : तमिळनाडू राज्यातील रामेश्वर येथे ७ फेब्रुवारीला देशभरातील १ हजार विद्यार्थी १०० उपग्रह तयार करीत आहेत. हे सर्व उपग्रह ७ फेब्रुवारीला सोडण्यात येणार आहेत. या उपग्रहांची स्थिती आणि नियंत्रणासाठी शहरातील जी.एच. रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी 'नॅनो सॅटेलाईट' तयार केला आहे. हा उपग्रह २८ फेब्रुवारीला श्रीहरिकोटा येथून ते अवकाशात सोडण्यात येणार आहे. 

हेही वाचा - पँटची झीप उघडणे म्हणजे लैंगिक अत्याचार नाही; उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा

डॉ. एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाउंडेशन जागतिक विक्रमासाठी प्रयत्न करीत आहे. यात देशभरातून शालेय व महाविद्यालयीन युवकांची निवड केली जात आहे. शालेय जीवनात अंतराळ तंत्रज्ञानाविषयी जिज्ञासा निर्माण करून भविष्यात 'स्पेस टेक्नॉलॉजी'मध्ये विद्यार्थ्यांचे योगदान वाढावे यासाठी हा उपक्रम आहे. यात जगातील सर्वात कमी वजनाचे १०० उपग्रह बनवून ७ फेब्रुवारी रोजी ४० हजार मीटर उंचीवर सोडण्यात येणार आहे. सेंसर असलेले हे उपग्रह प्रत्यक्ष वातावरणाची माहिती घेऊन पृथ्वीवरील केंद्राला पाठवतील. यामध्ये प्रामुख्याने मॅपींग, हवामान, त्यातील वायु आणि पुंज (क्वॉंटम) यांचा समावेश आहे. मात्र, हे उपग्रह नेमके कुठे आहेत, ते कसे काम करीत आहेत याबाबत वेळोवेळी शास्त्रज्ञांना माहिती असणे गरजेचे आहे. त्यासाठी देशातील नऊ आयआयटीने आतापर्यंत नऊ 'नॅनो सॅटेलाईट' तयार केले आहेत. मात्र, त्यात आता देशातील एकमेव खासगी महाविद्यालयाचे नाव सामील झाले आहे. जी.एच. रायसोनी अभियांत्रिकीच्या विविध शाखेतील १५ विद्यार्थी आणि चार प्राध्यापकांनी एकत्र येत दोन वर्षाच्या मेहनतीनंतर हे 'नॅनो सॅटेलाईट' तयार केले आहे. त्यासाठी 'स्पेस प्रोग्राम डेव्हलपमेंट सर्बिया' आणि बंगरुळु येथील 'टीएसटी टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड' यांची मदत घेतली आहे. तसेच टेस्टींगसाठी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेची प्रयोगशाळेची मदत झाली. यासाठी गुरुवारी (ता.२८) जी.एच. रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयात ग्राउंड सॅटेलाईट स्टेशनचे उद्‍घाटन करण्यात आले. 

हेही वाचा - बाबासाहेबांच्या इंग्रजी खंडाचा मराठी अनुवाद थंडबस्त्यात, विविध राज्यातील प्रादेशिक भाषेत खंड...
 
४०० किमी अंतरावर फिरेल 'नॅनो सॅटेलाईट' - 

जी.एच. रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेले नॅनो सॅटेलाईट वजन ३३० ग्रॅम असून लांबी व रुंदी १० सेंटीमिटर आहे. याशिवाय उंची ३.३ सेंटीमिटर आहे. हा 'नॅनो सॅटेलाईट' जमिनीपासून ४०० किलोमिटर अंतरावर पृथ्वीभोवती फिरेल. त्यात हा उपग्रह भारताला ८ मिनिटे प्रदक्षिणा घालेल. यातून तो अंतराळातील सगळ्याच उपग्रहांच्या स्थानाबद्दल माहिती गोळा करेल. तसेच ती माहिती ग्राउंड स्टेशनला देईल. 

गेल्या दोन वर्षांपासून विद्यार्थी यासाठी संशोधन करीत होते. त्यामुळेच जी.एच. रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयासारख्या खासगी महाविद्यालयाला हा सन्मान मिळाला आहे. या 'नॅनो सॅटेलाईट'मुळे सोडण्यात येणाऱ्या सर्व उपग्रहांची स्थिती जाणून घेता येणे शक्य होणार आहे. 
-डॉ. महेंद्र गायकवाड, प्रकल्प संचालक, जी.एच. रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालय. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: raisoni college from nagpur student made nano satellite