अकरावी प्रवेश प्रक्रियेचा श्रीगणेशा एक जुलैपासून; पंधरापासून विद्यार्थ्यांची नोंदणी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जून 2020

अकरावीच्या जागा, माध्यम, शाखा, प्रवेश शुल्क आदींची माहिती महाविद्यालयांना द्यायची आहे. विशेष म्हणजे कनिष्ठ महाविद्यालयांना ही माहिती देण्यासाठी कार्यालयात येण्याची गरज नसून शाळांना मोबाईलवरच माहिती पाठवायची आहे. यानंतर 15 जुलैपासून शाळास्तरावर विद्यार्थ्यांच्या नोंदणीस सुरुवात होईल. 

नागपूर : राज्यात पाच शहरात राबविण्यात येणारी अकरावीची प्रवेश प्रक्रिया यंदाही ऑनलाइन पद्धतीने राबविण्याचा निर्णय घेतला आहे. बुधवारपासून प्रक्रियेच्या पहिल्या टप्प्यात शहरातील कनिष्ठ महाविद्यालयांची नोंदणी करण्यात येणार आहे. 15 जुलैपासून शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या नोंदणीस सुरुवात होईल. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे प्रथमच प्रवेश प्रक्रियेला उशिरा सुरुवात होत आहे. 

शहरातील 190 कनिष्ठ महाविद्यालयांमधील 58 हजार 240 जागांचा समावेश आहे. दरवर्षी दहावीचा निकाल जून महिन्यात लागतो. त्यामुळे अकरावीच्या प्रवेशास जून महिन्यात सुरुवात होते. तीन वर्षांपासून राज्यभरात अकरावीच्या प्रवेशासाठी ऑनलाइन प्रक्रिया राबविण्यात येत असल्याने या प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी राज्यात सर्व शाळेतील विद्यार्थ्यांकडून अर्जाचा पहिला टप्पा भरून घेतल्या जातो.

हेही वाचा - पत्नीच्या जिद्दीसमोर हरला पती; मनावर दगड ठेऊन इच्छा पूर्ण करण्याचे ठरवले, मात्र...

निकालानंतर अर्जाचा दुसरा टप्पा भरण्यात येतो. यानंतर समितीमार्फत अकरावीच्या प्रवेशाची यादी टक्‍केवारीच्या आधारावर प्रकाशित करून महाविद्यालयांना जागेचे अलॉटमेंट करण्यात येते. राज्यभरात दहावीसाठी जवळपास 16 लाखावर विद्यार्थी नोंदणी करतात. यापैकी जवळपास 75 ते 80 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण होतात. राज्यभरातील दोन हजारांवर महाविद्यालयांमध्ये ही प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते. राज्यात कोरोनाचे सावट गडद असल्याने जुलै महिन्याच्या शेवटी दहावीचा निकाल लावण्यात येईल असे बोर्डाकडून सांगण्यात येत आहे. 

त्यानुसार 23 जूनला शिक्षण विभागाने अकरावीचे पाच शहरातील प्रवेश ऑनलाइन पद्धतीने घेण्याचे ठरविले. त्यानुसार 1 जुलैपासून प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी कनिष्ठ महाविद्यालयांना नोंदणी करायची आहे. शिवाय अकरावीच्या जागा, माध्यम, शाखा, प्रवेश शुल्क आदींची माहिती महाविद्यालयांना द्यायची आहे. विशेष म्हणजे कनिष्ठ महाविद्यालयांना ही माहिती देण्यासाठी कार्यालयात येण्याची गरज नसून शाळांना मोबाईलवरच माहिती पाठवायची आहे. यानंतर 15 जुलैपासून शाळास्तरावर विद्यार्थ्यांच्या नोंदणीस सुरुवात होईल.

अधिक माहितीसाठी - Video : फार्महाऊसवर सहा जणांनी पतीसमोर केला पत्नीवर बलात्कार

निकालानंतर दुसरा टप्पा

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर केंद्रांवरून माहिती पुस्तकांच्या विक्रीची मुभा न देता विद्यार्थ्यांना ऑनलाइन माहिती पुस्तिका बघून अर्ज भरावयाचा आहे. यासाठी ऑनलाइन शुल्कच भरावे लागणार आहे. मात्र, केंद्रावर विद्यार्थ्यांना बघण्यासाठी केवळ पाच माहिती पुस्तिका ठेवण्यात येणार आहे. साधारणत: दहावीचा निकाल लागल्यावर प्रक्रिया सुरू करण्यात येईल. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे दहावीचा निकाल अद्याप लागला नाही. 31 जुलैपर्यंत तो अपेक्षित असून निकालानंतर दुसऱ्या टप्प्यास सुरुवात होण्याची शक्‍यता आहे. 

  • एकूण जागा - 58,840 
  • केंद्रीय समितीमार्फत प्रवेश - 30,009 
  • आरक्षित जागांचे प्रवेश - 7,529 
  • एकूण प्रवेश - 37,558 
  • रिक्त जागा - 21,282 
  • प्रवेशाची टक्केवारी - 51.04 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The eleventh admission process will start from July one