पत्नीच्या जिद्दीसमोर हरला पती; मनावर दगड ठेऊन इच्छा पूर्ण करण्याचे ठरवले, मात्र...

अनिल कांबळे
सोमवार, 29 जून 2020

नसीम बेग यांनी पत्नीच्या त्रासाला कंटाळून कोणत्याही परिस्थितीत टीव्ही घेण्याचे ठरविले. त्यासाठी त्याने दोन ते तिन मित्रांना काही पैसे उधार मागितले. मात्र, पैसे मिळाले नाही. त्यामुळे निराश होऊन नसीम यांनी थेट घरच्या दोन दुभत्या गायी विकण्याचा निर्णय घेतला.

नागपूर : मिर्झा आयशा नसीम बेग (वय 32, रा. न्यू गणेशनगर, वाठोडा) हिने शुक्रवारी सकाळी साडेदहा वाजता पती घरी नसताना 10 महिन्यांची चिमुकली मिर्झा हबीबा आणि सहा वर्षांचा मुलगा मिर्झा अमन नसीम बेग या दोघांना कोंबड्यावरील रोग मारण्याचे विष पाण्यातून पाजले. त्यानंतर स्वतःही विष प्राशन केले. अमन हा घराबाहेर निघला असता त्याच्या तोंडातून फेस येत असल्याचे शेजारी राहणाऱ्या महिलेला दिसले. तिने लगेच अन्य शेजाऱ्यांसह घराकडे धाव घेतली. तिघांनाही रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर उपचार सुरू आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पती टीव्ही घेत नसल्यामुळे आयशा नेहमी वाद घालायची. मात्र, पती खिशातील पैसे आणि कुटुंबाची जबाबदारी बघता एक-दोन महिन्यात टीव्ही घेऊ असे आश्‍वासन पत्नीला देत होता. शेवटी त्याने जून महिन्यात नक्‍की टीव्ही विकत घेऊ, असे पत्नीला सांगितले. मात्र, या महिन्यातील शेवटचा आठवडा आला तरी पती टीव्ही घेण्याचे नाव घेत नसल्यामुळे पत्नी आयशा रोज वाद घालायला लागली. त्यामुळे पतीही त्रस्त झाला होता.

हेही वाचा - 'माया भाई' म्हणून मिरवायचा, विरोधकांना खटकायचे, त्यातूनच घडला हा प्रकार...

टीव्ही विकत घेण्यासाठी पत्नीने पतीला तगादा लावला. मात्र, आर्थिक स्थिती योग्य नसल्याचे सांगून पतीने टाळाटाळ केली. रागाच्या भरात पत्नीने सहा वर्षांच्या मुलाला आणि केवळ 10 महिन्यांच्या मुलीला विष पाजून स्वतःही आत्महत्येचा प्रयत्न केला. तिघांवरही शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे. चिमुकलीची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. ही खळबळजनक घटना नागपुरातील वाठोडा परिसरात उघडकीस आली. 

गायी विकून पैसे जमविले

नसीम बेग यांनी पत्नीच्या त्रासाला कंटाळून कोणत्याही परिस्थितीत टीव्ही घेण्याचे ठरविले. त्यासाठी त्याने दोन ते तिन मित्रांना काही पैसे उधार मागितले. मात्र, पैसे मिळाले नाही. त्यामुळे निराश होऊन नसीम यांनी थेट घरच्या दोन दुभत्या गायी विकण्याचा निर्णय घेतला. दोन दिवसांपूर्वीच त्याने दोन्ही गायी विकून टाकल्या आणि टीव्हीसाठी पैसे जमविले.

अधिक माहितीसाठी - नवविवाहितेचा सासूसोबत झाला वाद; 'तुमचे काम करून देतो' असे म्हणतं प्रीती दासने केली ही मागणी...

तो निर्णय चुकला

नसीम बेग याने गायी विकून आलेले पैसे घेतले आणि थेट टीव्हीचे दुकान गाठले. टीव्ही विकत घेत असतानाच शेजारी महिलेचा नसीमला फोन आला. तिने आयशाने मुलांसह विष घेतल्याची खबर दिली. नसीमला धक्‍का बसला. तो थेट रुग्णालयात पोहोचला. कुणालाही न सांगता घरात टीव्ही आणून आश्‍चर्याचा धक्‍का देण्याची योजना करणे नसीमला धोक्‍याचे ठरले. 

आर्थिक चणचण असल्याचे सांगून टाळाटाळ​

नसीम बेग हे दूध विक्रेता आहे. त्यांच्या घरी काही गायी आणि कोंबड्या पाळलेल्या आहेत. घरची आर्थिक स्थिती बेताची असल्यामुळे घरोघरी जाऊन दूध विकणे तसेच अंडे विकण्याचे काम ते करतात. त्यांची पत्नी आयशा ही गेल्या तीन महिन्यांपासून घरी टीव्ही घेण्यासाठी तगादा लावत होती. मात्र, आर्थिक चणचण असल्याचे सांगून पती टाळाटाळ करीत होता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Woman attempts suicide with two children for TV